सहज छेडीले पावसाने..

 


     भरुन आले नभ


 विचारांची दाटी झाली


आठवांचे शब्द लेवुन भरजरी


 मनाच्या देव्हारी अवतरली


  तु दिलेल्या खुणा


 पैंजण सावरीत होते


 गुणगुणले मीही जराशी


   हातात तुझे गीत होते!


       अंधारुन आलेही मग


   नर्तनात रत पाऊस होता


 छत्रीखालच्या ओंजळीत


   चिमुकला थेंब स्तब्ध निजला होता!


          ती वेडी धडधड हृदयाची


     अन स्पर्श तुझा ओला


       थेंबाथेंबात ओवुन घेत


          माझा पाऊस श्रीमंत झाला!!