राजस्थान ( रजपुतांची वीरगाथा)

राजस्थानचा इतिहास म्हणजे रजपुत वीरांचा इतिहास , पराक्रमाचा इतिहास.पण हे रजपुत ( राजपुत ) कोण? रजपुत हे वैदिक आर्यांचेच वंशज असून प्रथम ते पंजाब व गंगा खो-यात राहत होते. शक, कुशाण, हुण आणि शेवटी तुर्क यांच्या पुन्हा पुन्हा झालेल्या राक्षसी आक्रमणांमुळे प्राणाहून प्रिय असलेले आपले स्वातंत्र्य व धर्म यांचे रक्षण करण्यासाठी शतकानुशतके ते दक्षिणेकडे राजस्थानच्या डोंगराळ प्रदेशात उतरत राहिले . आक्रमणे झेलीत, नपरतवीत शतकानुशतके येथेच त्यांनी आपला धर्मध्वज फड्कवत ठेवला . अशा ह्या तेजस्वी आर्यक्षत्रियांना आपण ' रजपुत ' म्हणतो . बाराव्या शतकाच्या अखेर पर्यंतीचा काळ राजस्थानला तसा सुखशांतीचा गेला. या काळात गुहिलोत वंशाच्या ' रावळ ' आणि ' राणा ' दोन शाखा झाल्या . ' राणा ' शाखेने शिसोदा येथे आपले स्वतंत्र राज्य उभारले . त्यामुळे पुढे ही वंशवेल ' शिसोदिया ' या नावाने ओळखली जाऊ लागली . ( छ्त्रपती शिवाजी महाराज हे याच शिसोदिया कुळातील  होते असे इतिहासकार सांगतात.) मात्र तेरावे शतक राजस्थानसाठी संकटाची मालिकाच घेऊन आले. राजस्थानची वाताहत झाली .  राजस्थानच्या तेजस्वी इतिहसातील एक अनमोल नररत्न म्हणजे ' राणा संग ' . तो राणा कुंभ याचा नातु . सन १५१७ मधे इब्राहिम लोदी दिल्लीच्या गादीवर आला. मोठा फौजफाटा घेऊन त्याने राणा संग  याच्यावर स्वारी केली . पण पराक्रमी राणा संग़ याने स्वतःच पुढे जाऊन त्याच्यावर उलट चढई केली . लढाईत आपला निभाव लागत नाही असे पाहून इब्राहिम लोदीने पळ काढला . दिल्लीच्या बाद्शाहा विरुद्ध राणा संग विजयी झाला. ( मोगल शाहीचा संस्थापक बाबर आणि राणा संग़ यांचा कालखंड साधारणपणे एकच आहे.) खुद्द बाबरने आपल्या आत्मचरित्रात राणा संगच्या शौर्याचे , परक्रमाचे व पुरुषार्थाचे गुण मुक्त कंठाने आळविले आहेत.


क्रमशः