राजस्थान २ ( डेझर्ट एक्स्पेडिशन ) एक संस्मरणीय अनुभव

मला स्वतःला ट्रेकिंग मनापासुन आवडते. अत्तापर्यंत मी महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या. ' ट्रेक ' म्हटला की माझ्या डोळ्यांसमोर निव्वळ सह्याद्रितील किल्ले आणि डोंगररांगा येतात. पण हा राजस्थान ट्रेक वाळवंटी प्रदेशातील आहे म्हणून माझी उत्सुकता वाढली आणि एक वेगळा अनुभव मिळेल म्हणून मी आणि बाबांनी या ट्रेकसाठी आमची नावे दिली. चार दिवस आधी आम्ही ट्रेकची तयारी सुरू केली. आमचा ट्रेक २८ डिसेंबर २००५ ते २ जानेवारी २००६ पर्यंत होता.



  •      २६ डिसेंबर २००५ रोजी दुपारी तीन वाजता आम्ही बांद्रा टर्मिनर्सहून निघालो. या प्रवासात ट्रेनमधे आम्हाला आमच्या बरोबरच ट्रेकला येणारी इतर माणसे भेटली. त्यापैकी एक म्हापुसकर काका हे कोकणातील श्रीवर्धन येथील होते. तर बाकीचे दोघे मुंबईतीलच होते. ( तांबे आणि दिवेकर ) तसेच सात जणांचा असा आणखी एक मोठा ग्रुप आमच्याबरोबर होता. त्यापैकी पाच बायका रिझर्व्ह बँकमधे काम करत होत्या . त्यामुळे पुढील ट्रेकमधे त्यांना ' रिझर्व्ह बँकवाले ' असेच नाव पडले. रात्री ट्रेनमधे असतानाच मी आणि बाबांनी त्यांच्याशी ओळख करून घेतली. पुढे गप्पाही वाढ्ल्या आणि प्रवासात नवी रंगत आली.                                                                   २७ तारखेला सकाळी दहाच्या सुमारास आम्ही जोधपुरला पोहोचलो. स्टेशनजवळील गोविंद होटेलमधे राहिलो. गोविंद होटेलचे मालक मुंबईत ताडदेव येथे २० वर्षे राहात होते त्यामुळे त्यांच्याशी मराठीत गप्पा मारल्या. तासाभरात सर्व काही आवरुन आम्ही जोधपुर शहर पहाण्यासाठी बाहेर पडोलो. आता जोधपुर पहाण्यासाठी आम्हाला आणखी दहा साथीदार मिळाले होते. जोधपुरमधे सर्व प्रथम आम्ही ' जोधपुर फोर्ट ' पाहिला. येथील स्थानीक लोक आपल्या घरांना फ्क्त निळ्या रंगानेच रंगवितात. ही शेकडो नीळी घर पाहून जोधपुरला ' ब्ल्यू सीटी ' का म्हणतात ते लक्षात आले.

तेथुन आम्ही ' जसवंत सिंग थाडा ' येथे राजे-महाराजे यांच्या समाध्या पहाण्यास गेलो. आम्ही सर्वांनी येथील प्राचीन जैन मंदिर पाहिले. हे मंदिर सुस्थितीत होते. मंदिरावरचे कोरीवकाम, त्याच्या घुमटाकार कमानी सर्वांची नजर खिळवून ठेवत होत्या. हे मंदिर फार प्रेक्षणीय होते.  त्यासाठी आम्हाला २० रू. चे तिकीट काढावे लागले. त्या मंदिराला हा सर्वात मोठा मिळकतीचा मार्ग आहे. तेथील कोरीवकाम डोळयांचे पारणे फेडणारे आहे.


नंतर मण्डोर गार्डन येथे पोहोचलो. तेथे काही जुनी मंदिरे' एखादी समधी आहे आणि ती ही आता मोडकळीस आलेली आहे. पहाण्यासारखे विशेष काही नाही.


नंतर आम्ही उमेद भवन पॅलेस येथे पोहोचलो. येथे राजा उमेद सिंग यांचे निवासस्थान आहे. येथील अर्धा भाग पंचतारंकित होटेलला आणि काही भाग म्यूझियमला दिला आहे. त्यावरून राज-महाराजा यांच्या सद्ध्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येते. म्यूझियममधे त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे दालन केले आहे, घड्यांसाठी वेगळे दालन, क्रॉकरीचे वेगळे दालन. हे सर्व पाहून परतताना आम्ही त्यांच्या पूर्वीच्या ऐश्वर्याची आणि रहाणीमानासंबंधीच चर्चा करत होतो. सगळ्यांबरोबर जेवण घेतल्यावर माझी आणि बाबांची रात्री अकराची ट्रेन असल्याने आम्ही सर्वांचा निरोप घेतला. ' जैसलमेर कॅम्पवर भेटू उद्या ', असे सांगून निघालो. आमची अकराची ट्रेन प्रत्यक्षात मात्र एक वाजता सुटली.


        २८ तारखेला  आम्ही पहाटे साडेपाचच्या सुमारास जैसलमेर स्टेशनवर पोहोचलो. आमचा बेस कँम्प शहरच्या बाहेर असल्याने सरळ रीक्षाने आम्ही निघालो. कँम्पवर पोहोचेपर्यंत तेथील थंडीची जाणीव झाली. कडकडून थंडी वाजत होती. सात वाजता कॅम्पवर पोहोचल्यावर आमच्या हातात बराच वेळ मोकळा होता(तब्बल दीड दिवस) कॅम्पवर जे लोक उपस्थित होते त्यांच्याशी ओळखी झाल्या आणि आम्ही आमचा एक छोटासा आठ/नऊ जणांचा ग्रुप बनवून जैसलमेर पहायला कॅम्प बाहेर पडलो. यावेळेस आमच्याबरोबर वेगळे मेंबरस होते. त्यापैकी ' ओक ' पती-पत्नी व त्यांची मुलगी मानसी बरोबर आले होते. मानसी माझ्याच वयाची असल्याने मलाही ट्रेकमधे चांगली कंपनी मिळाली. बाकी सर्वजण आमच्यापेक्षा वयाने आणि ट्रेकिंगमधील अनुभवने ही मोठे होते.  


जैसलमेरमधे आम्ही शहरकडे न जाता एक वेगळीच दिशा धरली. आमच्या कॅम्पपासून थोड लांब काही गावं होती. सर्व प्रथम आम्ही तेथे गेलो. त्यातील पहिले गावं ' उमरसागर'. तेथे आम्हाला एकाच ठिकाणी बरीच मंदिरे पहाण्यास मिळली. राजस्थानमधील छोट्या छोट्या उजाड भकास गावांमधे एवढी सुंदर नक्षीकाम केलेली प्राचीन शिल्पे पाहून मन थक्क झाले. कारण तिथवर पोहोचेपर्यंतचा संपूर्ण रस्ता उजाड माळरानाचा होता. तिथे दूरवर एकही गाव दिसत नव्हते. तीन/चार घर एका ठिकणी दिसत आणि पुढे नजरेच्या टप्प्यात एकही घर आढळत नव्हते. कसे रहत असतील हे लोक? कसं आयुष्य जगत असतील? राहून राहून मनात हा एकच विचार येत होता. पुढे आम्ही 'लुद्रा' आणि 'कुलथरा' या गावांना भेटी दिल्या. यापैकी 'कुलथरा' गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.


                      कुलथरा (empty village)


फार फार वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे ८०० वर्षांपूर्वीची ही कथ आहे. येथील राजाला त्या गावातील एका ब्राम्हण मुलीशी लग्न करयचे होते. पण त्या सर्व ब्राम्हणांनी मिळून राजाचा विरोध केला. कारण एक तर हे ब्राम्हण आणि तो रजपुत आणि दुसरं कारण असं सांगतात की ती मुलगी फक्त १६ वर्षांची होती आणि राजाचं वय ६० वर्ष. गावक-यांना तयार करण्यासाठी  राजाने त्यांच्यावर अत्त्याचार सुरू केले. भरपूर कर लादण्यास सुरवात केली. तरीही ब्राम्हणांनी हार मानली नाही. अखेर राजाच्या त्रासाला कंटाळून सर्व ब्राम्हण रातोरात गाव सोडून निघून गेले. त्यांच्यात एवढी एकजूट होती की त्यांनी एका रात्रीत ८४ गावे खाली केली. ते राजस्थान सोडून निघून गेले. परंतु त्यांची घरे अजूनही तेथे आहेत. आता ती पार मोडळीस आलेली आहेत. तिथे वर्षानुवर्षे कोणीही राहत नाही. म्हणूनच त्या गावांना ( एम्टी व्हिलेजेस ) म्हणतात. अशी ही आख्यायिक आहे आणि त्यावर आधारित अनेक उलटसुलट गोष्टी गाईडने आम्हाल्या सांगितल्या. हे सर्व आटपेपर्यंत संध्याकाळ होत आली. म्हणून आम्ही सर्व बेस कॅम्पवर परतलो.  जेवणात आम्हाला डाल-राइस, पापड-लोणचं,बटाट्यांचा रस्सा होता. जेवण गरम गरम मिळाल्याने जेवणाची लज्जत वाढली. जेवणानंतर कॅम्प फायर होता. कॅम्प फायरच्या वेळी कोणी गाणी,जोक्स सांगितले,कोणी नाचून दाखविले.त्यापैकी मराठी गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला.   देशभक्तीपर गीते --- "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती , जयोस्तुते , जय जय महाराष्ट्र माझा" अशा अनेक गाण्यांनी वातावरण भारावून गेले होते. त्यारात्री आमचे कॅम्प लीडरस सुद्धा आमच्यात सामील झाले होते आणि त्यांनी त्याची रंगतच वाढवली. थंडीमधे आम्ही गारठून गेलो होतो त्यामुळे नंतर येणा-या गरम गरम बोर्न व्हिटाचा आस्वाद घेताना बरं वाटलं.  त्या रात्री आम्ही शांतपणे झोपू शकलो नाही. कारण थंडीची आणि टेंट्मधील लोकांच्या घोराण्याची दोन्हीची सवय नव्हती.

अजून आमचे जैसलमेर बघायचे बाकी होते.सकाळी चहा-न्याहारी झाल्यावर आम्ही कॅम्पच्या बाहेर पडलो. सर्व प्रथम आम्ही फोर्ट पाहिला. या फोर्टवरून शहर फार सुंदर दिसते‍. जैसलमेरच्या परिसरात पिवळ्या रंगाचा दगड विपुल प्रमाणात सापडतो. तोच घर बांधणीसाठी वापरतात. दुपारच्या उन्हात घरं सोनेरी रंगात न्हाऊन निघतात. म्हणूनच जैसलमेरला ' गोल्डन सिटी ' ,        ' सन सिटी ' म्हणतात.

येथील पटवा हवेली आपल्याला बाहेरुनच पाहता येते . त्या हवेलीतील छप्पर आतून सोन्याचे आहे . तिचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे अजूनही पटवांची सातवी पिढी राहते.       या नंतर नथमल सिंग हवेली आणि सालेम सिंग हवेली बघितली.           गढिसर लेक पहण्यासाठी आमच्याकडे फार वेळ उरला नव्हता. पण जैसलमेरज्या तलावाकाठी वसले आहे तो वाळवंटातील ओऍसिस बघण्यासाठी तेथे गेलो. काही फोटो काढले आणि तडक कॅम्पवर परतलो. तोपर्यंत जोधपूरची मंडळी आली होती. त्याच दिवशी आमचा ट्रेक सुरु होणार होता. काही ट्रेकपूर्वीच्या सूचना बाकी असल्याने आम्हाला जेवणापूर्वी अर्धा तास आधी कॅम्पवर बोलावले होते. नंतर एकत्र जेवण घेऊनच कॅम्प सोडायचा होता. सगळे जण निघायला उत्सुक होते.                                   

क्रमशः