गुरुपौर्णिमेनिमित्त एक किस्सा

आज गुरुपौर्णिमा. आमच्या तात्यांच्या अण्णांनी म्हणजेच आदरणीय पंडित भीमसेन जोशींनी सांगितलेला एक किस्सा आठवेल तसा सांगावासा वाटतो.



अण्णा एक दिवस भीमपलास गात होते. त्यातला खर्जातला गांधार नीट लागत
नव्हता. बराच वेळ रियाझ केला. पण गांधार काही आवाक्यात येत नव्हता. शेवटी
त्यांनी आपली चारचाकी काढली. नेहमीप्रमाणे सुसाट वेगाने तळजाईच्या पठारावर
नेली आणि तिथे आपल्या पहाडी आवाजात मोठमोठ्याने तो राग आळवायला सुरवात
केली. त्यांच्या गुरूवर्यांची, सवाई गंधर्वांचीच शिकवण होती. मोकळ्या,
निवांत जागी जाऊन स्वराधना केल्याने गळाही साफ होतो, आवाज मोकळा होतो.


१० मिनिटे झाली. १५ मिनिटे झाली. तो खर्जातला गांधार काही सापडेना. अचानक
त्यांना दुरून कुत्रेकुई ऐकू आली. त्या विल्हाळण्यात त्यांना त्यांचा
खर्जातला गांधार सापडला.

 
माणसाला गुरू कुठेही भेटू शकतो. त्याच्याकडे फक्त शिष्याची नम्रता आणि दृष्टी हवी. हीच आमच्या अण्णांची शिकवण.


ह्या शिवाय, अण्णांचा आणखी एक सुविचार मी मनात कोरून ठेवलेला आहे. ते एकदा म्हणाले होते, "एखाद्याचे व्याकरण उत्तम आहे म्हणून तो काही श्रेष्ठ कवी होईलच असे नाही. त्याचप्रमाणे एखाद्याला रागदारीचे उत्तम ज्ञान आहे म्हणून तो श्रेष्ठ गवई होईलच असे नाही."

तर, ह्या गुरुपौर्णिमेला मी माझ्या सर्व ज्ञात-अज्ञात, जिवंत-मृत, मनुष्य आणि मनुष्येतर गुरुवर्यांना अभिवादन करतो.



चित्तरंजन भट

अवांतर

भीमपलास ह्या रागात कुठले स्वर लागतात हे मला माहीत नाही. अण्णा तळजाईच्या पठारावर गेले होते की नाही हेही आता आठवत नाही. बऱ्याच ठिकाणी स्वातंत्र्य घेतले आहे. बाकी हा किस्सा खरा आहे, एवढे मात्र सांगतो.