दगडांची खिचडी

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट.
एका गावात एक गरीब शेतकरी राहत असतो. त्याची एकुलती एक मुलगी दूरच्या गावी सासरी राहायची. एकदा काय होते, शेतकऱ्याला तिची फार  आठवण यायला लागते. तो ठरवतो की आता तिला जाऊन एकदा भेटून यावे.  शेतकरी दुसऱ्या दिवशी भल्या पाहाटे उठून प्रवासाला निघतो. 


लहानसहान गावे, ओढे, नाले ओलांडत तो चालत राहतो. होता होता दिवस कलतो आणि तो एका गावात येऊन पोहोचतो. तरी अजून सूर्य मावळायला अंमळ वेळच असतो, म्हणून तो तसाच चालत राहतो. गावकरी म्हणतात की अरे दादा आता अंधार होईल, इथेच देवळात झोप आणि उद्या पुढे जा. पण याला मात्र लेकीला भेटायची घाई झालेली असते. तो तसाच चालत राहतो. पण सूर्य काय याच्यासाठी थांबणार काय, त्याला ही आता घरी जायची घाई झालेली असते आणि पाहता पाहता काळोख दाट होतो.


"आत काय करावे बरे?", शेतकरी विचारात पडतो. पुढे तर जंगल आहे आता आसरा शोधावा हेच बरे. असा विचार करून तो आसपास पाहू लागतो. दूर त्याला एक लहान दिवा लुकलुकताना दिसतो. चला बरे झाले कोणा शेतकऱ्याचे घर दिसते आहे, असा विचार करतच तो थकलेला शेतकरी घरापाशी पोहोचतो.


घर लहानसे असते, पुढे छोटा फळभाज्यांचा मळा वगैरे असतो. शेतकऱ्याला भूकही फारच लागलेली असते.
तो दार ठोठावतो.आतून म्हाताऱ्या बाईचा आवाज येतो,"कोण आहे बाबा?".
शेतकरी म्हणतो,"मी एक वाटसरू आहे आजीबाई, लेकीकडे निघालोय, पण आता काळोख झाला. म्हटले आपल्याकडे जरा रात्र काढतो आणि पुढे जातो."
म्हातारी दार उघडते.  ती म्हणते,"आलायस तर राहा बाबा. मी म्हातारी अजून काय करणार तुझ्यासाठी?" मग ते दोघे बाहेरच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसतात. म्हातारीचा घरधनी कधीचाच वारलेला असतो आणि तीनही मुली आपापल्या सासरी. एकटीच राहत असते बिचारी.


रात्र होऊ लागते तशी शेतकऱ्याच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. पण म्हातारी जेवण्याखाण्याचे नावच काढायला तयार नाही.  आता काय करावे बरे, असा विचार करतच शेतकरी म्हणतो,"आजीबाई, दिवसभर चालून थकलो आहे. भूकही फार लागली आहे ". म्हातारी थोडी कातावते," बरं तर? अरे माझी परिस्थिती पाहतोयस ना? माझ्याकडे काह्ही म्हणजे काह्ही नाही रे. मी तरी कुठे जेवलेय? तू बरोबर काहीच आणलेले दिसत नाहीयेस ते?". शेतकरी काय ते समजतो. म्हातारी भोळसट असते पण फार कंजूष. शेतकरी चतुर असतो. त्याला एक युक्ती सुचते.
तो म्हणतो,"आजीबाई आपण दोघे भुकेले आहोत. मी झक्कास दगडांची खिचडी बनवतो. तुलाही आवडेल नक्की." म्हातारी आश्चर्याने म्हणते, "दगडांची खिचडी? मी तर कधीच ऐकले नाही ते! पण पाहा हं माझ्याकडे काही म्हणजे काही नाही बरं, तू आपले मळ्यातले दगड उचल कसा." शेतकरी मनातल्या मनात हसतो. खरंतर आता म्हातारीला ही भूक लागलेली असते.


मग शेतकरी दोन आपल्यासाठी आणि दोन म्हातारीसाठी, असे चांगले गुळगुळीत दगड निवडतो, ते स्वच्छ धुऊन घेतो. मग म्हातारीकडून एक पातेले घेऊन त्यात ते दगड ठेवून चूल पेटवतो. मग म्हणतो, "आजीबाई थोडे तेल असेल तर काय मजा येईल, दगड चांगले परतता येतील." म्हातारी जरा त्राग्यानेच तेल देते. मग हा म्हणतो,"वा! आता दगड चांगले परततो. अरेच्च्या! पण मोहरी आणि जिरे असेल तर काय मजा!" म्हातारी वैतागते. पण शेतकरी म्हणतो,"आजीबाई, फोडणी वाचून का खिचडी बनलीये कधी?" तेही बरोबरच असे म्हणून मोहरी जिरे, आलं वगैरे समान ती त्याला देते. मग हा म्हणतो,"छेः हे सगळं ठीक. पण मुगाची डाळच नसेल तर कसली आलीये खिचडी!" मग म्हातारी डाळ सुद्धा देते. आता डाळ परतल्याचा खमंग वास सुटतो आणि म्हातारीच्या तोंडालाही पाणी सुटते. मग तीच थोडा मसाला देते.


चतुर शेकरी म्हणतो,"वा वा! आता तर दगड छान परतून झाले. थोडे पाणी घालून शिजवले की मस्त खिचडी तयार. पण.. भरीला मूठभर तांदूळ घातले तर काय बहार येईल!" म्हातारीला ते पटते. मग ती चार मुठी तांदूळ देते. असे म्हणता म्हणता खिचडीचे सगळेच आवश्यक जिन्नस म्हातारीच्या नकळत त्यात जातात आणि सुंदरशी चमचमीत खिचडी अर्ध्या तासात तयार होते. मग शेतकरी हळूच झाकण काढतो आणि खिचडी ढवळण्याच्या निमित्ताने त्यातले दगड काढून टाकतो.


मग दोघे जेवायला बसतात. म्हातारी म्हणते,"वा! काय छान झालीये रे खिचडी! अरे पण ते दगड कुठे दिसले नाहीत ते?.." त्यावर चतुर शेतकरी म्हणतो, "आजीबाई सगळे दगड चांगले शिजून एकजीव झालेत. त्याचीच तर इतकी छान चव आलीये."
म्हातारी आश्चर्य करत असते आणि शेतकरी मनातल्या मनात हसत भरपेट खिचडीचा आस्वाद घेऊन मस्त ढेकर देत असतो.


--लिखाळ.