वाचावे ते नवलच २ - केरळमधील सोवळी देवालये

केरळमधील सोवळी देवालये
जयमाला नांवाच्या कुण्या कानडी नटीने आपण भगवान अय्यप्पाच्या मूर्तीचे दर्शन घेतले असल्याचा गौप्यस्फोट केला आणि जणु आभाळच कोसळले. यानंतर अशा प्रकारच्या बातम्या, पत्रे, लेख, अग्रलेख वगैरेंचा पाऊस पडला. आता म्हणे तो देव आणि ते देवालय यांचे वर्षभर शुध्दीकरण चालणार आहे.
साक्षरतेमध्ये संपूर्ण भारतांत आघाडीवर असलेल्या याच केरळ राज्याच्या राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरमध्ये ऐकलेला एक विनोद सांगतो. इथल्या ख्रिश्चनांच्या समोर हिंदू लोकच काय पण त्यांचा देवसुध्दा ताठपणे उभा राहू शकत नाही म्हणून तो इथल्या सुप्रसिध्द पद्मनाथस्वामींच्या मंदिरात शयनावस्थेत पहुडला आहे. या देवळाला ख्रिश्चनांचेच काय तर युरोपियन पोशाखाचेसुध्दा वावडे आहे. शर्टपॅंट काढून ठेऊन फक्त लुंगी वा धोतर नेसूनच तिथे प्रवेश मिळतो.
ज्या पतितपावन परमेश्वराने रामावतारात शबरी भिल्लिणीची उष्टी बोरे चवीने खाल्ली त्याचीच ही रूपे आहेत कां ?  का आले पूजा-यांचे मना तेथे कोणाचे चालेना अशी परिस्थिति आहे ?