आवाज...

ही कथा / पात्र सर्व काल्पनिक आहे हे सांगायला नकोच!

संध्याकाळची वेळ झाली होती व चिंगी तिच्या काकांच्या घराच्या अंगणात तिच्या बाहुलीला घेऊन तिच्या आईची वाट पाहत उभी होती. ते सकाळीच त्यांच्या कडे आले होते. महिन्यातून एक फेरी त्यांची तिच्या आवडत्या रमेश काकांकडे व्हायचीच. नेहमी तिचे बाबा बरोबर असत पण आज त्या दोघीच आल्या होत्या, ति व तिची आई. तिच्या बाबांची जंगलातल्या कामावर बदली झाल्यानंतर ही महिन्यातली रमेश काकांकडची फेरी म्हणजे तिचा विरंगुळा होता.
"नीट काळजी घे, मी जाते" आईने निराकाकूला सांगितलेलं चिंगीने ऐकले. काकूला थोड्याच दिवसांत बाळ होणार होतं. त्याच्याची खेळाच्या विचाराने चिंगी स्वत:शीच हसली. 'पण त्याला माझी बाहुली नाही देणार..'चिंगीने हातातल्या बाहुलीवर पकड घट्ट केली. संध्याकाळच्या सावल्या आता गडद होऊ लागल्या होत्या व सूर्य मावळतीकडे वेगाने सरकू लागला.
"आजची रात्र राहतेस का? या जंगलातून ह्यावेळेला जायचं म्हणजे.." काकूने वाक्य अर्धवटच सोडलं. हवेतल्या गारव्याने चिंगी शहारली.
"अगं जवळच तर जायचंय. अर्ध्या तासात पोहचू आम्ही. रात्री राहण्याचं काही नाही गं, पण अरविंदला सकाळी लवकर जायला लागतं, त्याचा डबा वगैरे असतो, सगळाच घोळ होईल. तू आमची काळजी करू नकोस स्वतःला जप.. चल मी जाते.."
"शाल व बॅटरी बरोबर घेतलीस ना?"
"हो.. घेतली आहे"
चिंगीच्या आई ने चिंगीचा हात धरला व त्या दोघी जंगलातल्या वाटेने त्यांच्या घरी निघाल्या.


चिंगीने तिच्या अंगावर शाल लपेटून घेतली व आईच्या हातावरची पकड घट्ट केली. मागच्या आठवड्यात झालेल्या अवेळी पावसाने, रस्त्यांची दुर्दशा केली होती. चालणं कठीण असल्यामुळे त्यांचा वेग मंदावला. त्या दोघी आलेल्या रस्त्यानेच परत जात होत्या. अंतर जास्त न्हवतं पण वळणा वळणाच्या रस्त्यामुळे जास्त चालल्यासारखं वाटत होतं.
"खूपच गार वाटतंय नाही?" चिंगी ने विचारलं.
"हं..अवेळी पावसाने भलताच गारवा आलाय." आईने हातातली बॅटरी चालू करत सगींतलं.
सूर्य अस्ताला गेला होता, व आजूबाजूची झाडं जास्तच जवळ आल्या सारखी वाटत होती. चिंगीला एखाद्या बोगद्यातून चालल्या सारखं वाटत होत. थोड्या वेळातच त्यांच्या भोवतीचा काळोख वाढला. पानांच्या सळसळीत, घुबडाच रडणं लपत न्हवत. आता चंद्रही वर आला होता पण त्याच्या भोवतीच खळं जास्तच गडद झाल्यामुळे त्याचा मिणमिणता प्रकाश जास्तच भयप्रद वाटत होता. आजूबाजूला रात्रीच्या वेळेस येणारे किर्र भेसूर आवाज येऊ लागले. पायाखालची वाट लांबच लांब वाटायला लागली. चिंगीला आईच्या हाताची ओढ चांगलीच जाणवत होती. आईच्या वेगाबरोबर तिला चालता येईना. अंधारात तिच्या पायाला काहीतरी हुळहूळलं.. "आई.." ती जोरात ओरडली..
"काय गं? काय झालं?"
"माझ्या पायाखाली काहीतरी आहे" भेदरलेल्या आवाजात चिंगीने सगींतले.
आईने बॅटरीच्या प्रकाशात बघितले, पायाखाली काही सुद्धा न्हवते. तिच्या लक्षात आले की पोर घाबरलं आहे. तिने तिला जवळ घेतलं.
"थांबू या का थोडं? "घे, पाणी पी.." आईने पाण्याची बाटली चिंगीला दिली. चिंगी पाणी पीत असताना तिने तो आवाज पहिल्यांदा ऐकला.."आई, आपल्या मागून कोणतरी येतंय का गं?" आईने बॅटरी सगळीकडे फिरवली "बघ, कोणी सुद्धा नाही..अंधारात घाबरल्या सारखं होतं त्यामुळे तसं वाटतं. चल लवकर! आता दहा मिनटात आपण घरी पोहचू."
चिंगी आईचा हात धरून चालू लागली. थोडं पुढे जाताच चिंगीला तो आवाज वाढल्या सारखा वाटला. एखादा माणूस जड बूट घालून चालतोय असा तो आवाज होता. "आई मागून कोणीतरी येतंय गं" आईने तिला जवळ ओढून घेतलं व ति काहीच न बोलता पुढे चालू लागली. चालता चालता चिंगीला काहीतरी विचित्र जाणवलं. काय ते तिच्या पहिल्यांदा लक्षात येईना, नंतर तिला कळलं, तिच्या भोवती निरव शांतता होती. इतकावेळ येणारे किर्र भेसूर आवाज बंद झाले होते, घुबडाचं ओरडणं ही ऐकू येत न्हवतं. आता मात्र एकच आवाज तिला खूप जोरात येऊ लागला.. धप..धप..कोणीतरी नक्कीच त्यांच्या मागे होते.
"आई.." तिने आईचा हात ओढला. तिला कळत न्हवतं, आईला काहीच कसं ऐकू येत नाही, कारण आवाज तर आता खूप जवळून आल्या सारखा वाटत होता. तेवढ्यात आईने मागे वळून बॅटरीचा प्रकाश टाकला. चिंगीला आता चांगलंच कुडकुडायला झालं. आईचा चालण्याचा वेग वाढला होता.
"आई.."
"हं.."
"शाळेत आम्हाला नवीन प्रार्थना शिकवली आहे"
"हो..का? मग म्हण ना..मलाही ऐकूदे.."
चिंगीने प्रार्थना म्हणायला सुरवात केली. तिच्या आवाजातली थरथर आईला जाणवत होती. चिंगीला मागचा आवाज वाढल्यासारखा वाटत होता. काही वेळा नंतर एक वळण घेताच त्यांना त्यांच्या घराचे मिणमिणते आश्वासक दिवे दिसले. मागचा आवाज आता खूपच मोठा झाला.
"वाघ्या.." आईने जोराने त्यांच्या कुत्र्याला हाक मारली. "बघ, वाघ्या आता येईलच. आता तर घाबरायचं काही कारण नाही ना?" आईने अचानक परत बॅटरीचा प्रकाश मागे टाकला. एवढ्यात वाघ्या धावत आलाच. त्याच्या भुंकण्याचा आवाजाने चिंगीला हायसं वाटलं. तो त्यांच्या मागे जंगला कडे बघून भुंकत राहिला.
"चल.. वाघ्या.. घरी चल." आई मागे वळून न बघता घरा कडे चालू लागली. एवढ्यात चिंगीचे बाबा तिथे आलेच..त्यांनी चिंगीला उचलून घेतलं "काय सगळं ठीक ना?" त्यांनी आईकडे बघुन विचारलं "हो.." आई म्हणाली.


रात्री उशिरा जेवण करून चिंगी झोपायला गेली तरी तिला तिच्या आई-बाबांचा आवाज ऐकू येत होता. आई बाबांना सांगत होती.." मी ही तो बुटांचा आवाज ऐकला होता, पण चिंगी अजून घाबरली असती. मी ही खूप घाबरले होते. जंगलाच्या शेवटी जेव्हा मी बॅटरीच्या प्रकाशात मागे वळून बघितलं तर मला ते दिसलं.."
"काय?"
"एक नुसतंच धड आमच्या मागे आवाज करत येत होत.."
"नुसतंच धड? त्याला शीर न्हवतं.."
"अहं.."
"हा.. हा.. म्हणजे तू जबरदस्त घाबरली असणार.. कारण घाबरल्यानेच असे भास होतात"
"नाही अरविंद..खरंच मला दिसलं"
"बरं..बरं.. चल झोप आता.. मला सकाळी लवकर जायचंय.."
मध्यरात्री केव्हातरी अरविंदला जाग आली. कुठूनतरी रडण्याचा आवाज येत होता. त्याने चिंगी व तिच्या आईकडे बघितलं, तर त्या गाढ झोपल्या होत्या. आवाज बाहेरुनच येत होता. तो हळूच उठला व त्याने खिडकीतून बाहेर बघितलं. कुंपणाच्या बाहेर, वाघ्या जंगलाच्या बाजूला तोंड करून रडत होता. तेवढ्यात त्याने एक आवाज ऐकला..धप..धप..कुणाच्यातरी बुटांचा आवाज. तो आवाज जवळ-जवळ येत होता..थोड्यावेळातच अरविंदच्या लक्षात आलं, तो आवाज त्याच्या दरवाजाच्या समोर येऊन थांबलाय व कुंपणाबाहेर वाघ्या निपचीत पडलाय...
                                 *****

राहुल