शांघाई की अंगडाई

मी लिहिलेल्या प्रत्येक लेखाच्या नांवात "की" हा शब्द आलाच पाहिजे असं काही नाही, पण तरीसुद्धा शांघाईच्या प्रवासवर्णनाला हे नाव दिल्याशिवाय राहवलं नाही! त्यातुन 'भाषां' च्या विनंतीला पडत्या फ़ळाच्या आज्ञेप्रमाणे मानून लेखनातूर झालेला मी आज "साहित्य" ह्या सदराखाली चक्क  लेख लिहायला निघालोय तेंव्हा ह्या लहानसहान गोष्टींकडे कानाडोळा करतोय.




तर शांघाई शहरांत जाताना मला भरपूर कुतुहल होतं. नव्या जगातील उगवता सूर्य - चीनच्या आर्थिक राजधानीला जाण्याची उत्सुकता भरपूर होती. पहिली गोष्ट मला जाणवली म्हणजे शांघाईला जाण्यासाठी असलेले मुबलक पर्याय. माझ्या प्रवासाचा आरखडा नीट ठरत नव्हता, पण मी ज्या ज्या अमेरिका आणि कॅनडामधील शहरांतून जायचा विचार केला, तिथून सगळीकडून  शांघाईला परस्पर न थांबता जाणारी विमाने होती, आणि बरेचदा दिवसांत अनेक होती. ह्यावरून शांघाई आजकाल किती महत्वाचे ठिकाण झाले आहे हे समजते. ह्याउलट भारतात परस्पर जाणारे एकमेव विमान शिकागोहून दिल्लीला जाते, आणि ते सुद्धा रोज जात नाही.

प्रवास करत करत, म्हणजे माणसांचा सुळसुळाट असलेल्या एका धुमस्त्या वारुळातून दुसऱ्या वारुळात झेप घेत घेत मी अखेर शांघाईला पोहोचलो. 'अनिवासी' भारतीय ह्या नावाला शोभेलअसा माझा प्रवास चालला होता.

शांघाईला विमान उतरलं, नेहमीच्या कस्टम्स, इत्यादी प्रकारातून बाहेर पडल्यावर मला घ्यायला आलेल्या जि-जिंग ची ओळख पटली आणि आम्ही तासाभराच्या टॅक्सी प्रवासाला लागलो. आजूबाजूची धुरकट हवा बघितल्यावर आधी वाटलं की धुकं दिसतय, पण बाहेरची गरमी बघता समजलं की धुकं नव्हे, चक्कं धूर आहे. शिवाय मांस मच्छी अत्सम काहितरी अप्रीय वास पण येत होता. एकंदर  मनात म्हटलं, अशात आपण तीन दिवस कसे काढणार कोणास ठाऊक. एकिकडे जि-जिंग साहेब मला चीन आणि शांघाई मध्ये टिकाव कसा करायचा ह्याचे महत्वाचे सल्ले देत होते - पहिली गोष्ट म्हणजे तिथे कोणालाही, म्हणजे जवळ्जवळ कोणालाही इंग्रजी येत नाही. तेंव्हा हॉटेल मधून कचेरी आणि परत ह्याखेरिज कुठेही एकट्याने फ़िरू नये असे समजले. मधुन मधुन जि-जिंगचा फ़ोन वाजत होता. फ़ोनच्या घंटीची चाल परिचयाची होती, पण त्याच्या फ़ोनमध्ये आहे हे लगेच काही वेगळं वाटलं नाही. थोड्या वेळानी लक्षांत आलं की चक्कं 'साथिया' चित्रपटातली एक चाल त्याच्या फ़ोनची रिंगटोन होती!

पू डाँग ह्या शांघाईच्या झगमगीत भागांत शिरल्यावर कमाल वाटली, एखाद्या प्रगत देशाच्या शहरात जर भारतातल्या मोटरसायकली, स्कूटरी आणि परदेशातल्या गाड्या टाकल्या तर कसं दिसेल, तसं वाटलं. रस्ते बिस्ते एकदम प्रशस्त पण वहानं अगदी भारतासारखी. त्यातून सर्व टोलेजंग इमारती काही केल्या मनात बसत नव्हत्या. सर्व इमारतींत काहितरी चुकलय असं वाटत होतं. त्यातून माझी सोय अशियातल्या सर्वात ऊंच 'जिन् माओ' नावाच्या इमारतीत असलेल्या हॉटेल मध्ये कंपनी सरकारच्या कृपेनी झाली होती. जिन् माओ म्हणजे सुवर्ण स्थळ असं मला सांगण्यात आलं. माझ्या खोलीतून समोर शांघाईत असलेला सुंदर टी. व्ही टॉवर दिसत होता, आणि त्यापलिकडे शांघाईतून वाहणारी नदी. नदीपलिकडील प्रांत जरा जास्त गजबजलेलाआणि मुंबईसदृश दिसत होता, म्हणून मी नंतर जि-जिंगला जरा खोदून विचारलं तेंव्हा तो म्हणाला कित्या भागाला 'पू शी' असं म्हणतात आणि तो जुन्या शांघाई चा भाग आहे.


जेट लॅग मुळे म्हणा किंवा सवयीने म्हणा दुसऱ्या दिवशी पहाटेच्या मंद प्रकाशाने मला जाग आली. समोरच्या नदितला बोटींचा निरंतर प्रवाह मंदावला होता, टि. व्ही. टॉवर वरचे झगमगीत दिवे बंद होते आणि पू शी मधले शांघाईकर अजून साखरझोपेत होते. 


आल्या आल्या अंगावर येणारं शांघाई का कोणास ठाऊक त्या क्षणापासून मला थोडे आपलेसे, म्हणजे भारताप्रमाणे कष्टाचे पण अमेरिकेप्रमाणे धडाडीचे वाटू लागले...

क्रमशः