अनिलांच्या दशपदी कविता

Day 4 Durango Silverton Scenic Train Ride 122


तळ्याकाठी


अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते


जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही


सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी, मधूनच वर नसते येत


पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो


हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!

-- अनिल


कवी अनिल तथा 'आत्माराम रावजी देशपांडे' हे मराठीत मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून अधिक प्रसिद्ध असले, तरी त्यांनी प्रचलित केलेला 'दशपदी' हा काव्यप्रकार देखील तितकाच लक्षणीय आहे. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच दशपदी कवितेत दहा ओळी असतात. अनिलांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले आहे. त्यांच्याच 'तळ्याकाठी' आणि 'जुई' या दोन दशपदी कविता येथे देत आहे.


या दोन्ही कविता इतक्या साध्या, अकृत्रिम शैलीत आपल्या डोळ्यासमोर ते चित्र, तो प्रसंग उभा करतात की त्यांना अधिक भाष्याची काहीच गरज नाही.


जुई


पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती
इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती


आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला
ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला


तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे
जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे

कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत
शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत


मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते
सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जगतेपणी पडते!