कारली व कैरीची भाजी (कोकणी पद्धतीची)

  • ३ कारली
  • १ कैरी
  • १/२ चहाचा चमचा लाल तिखट (किंवा चवीप्रमाणे)
  • ३ मोठे चमचे गूळ (किंवा चवीप्रमाणे)
  • १ चहाचा चमचा तेल
  • ५-६ लसणाच्या पाकळ्या, सोललेल्या
  • मीठ, चवीप्रमाणे
३० मिनिटे
३-४ जणांसाठी

ही पाककृती मी नव्यानेच माझ्या सासूबाईंकडून शिकले आहे.  मंगळूरकडची कोकणी पद्धतीची भाजी आहे.  लसणाच्या स्वादाने भाजीत मस्त रंगत येते.  कारली आवडत असल्यास ही भाजी नक्की आवडेल.

कारली धुऊन घ्या.  लांब बाजूने मधोमध दोन तुकडे करा.  टणक बिया असल्यास काढून टाका.  अर्धगोलाकृती दिसतील अशा चकत्या चिरा.  ह्या चकत्या एखाद्या कापडी किंवा कागदी रुमालावर ठेवा.  चकत्यांवर मीठ भुरभुरा.  रुमाल बंद करून ठेवून द्या.  कारल्याच्या रसाने रुमाल ओला झाल्यावर चकत्या काढून घेऊन एका पातेल्यात अर्धा कप पाण्यात शिजायला ठेवा.  कैरी धुऊन, तिचे तुकडे करून घ्या.  कोय घेऊ नका.  कारली अर्धी शिजल्यावर कैरीचे तुकडे घाला.  लागल्यास आणखी १/४ कप पाणी घाला.  दोन्ही पूर्ण शिजत आल्यावर तिखट व गूळ घाला.  एकदा चव घेऊन, लागल्यास मीठ घाला. (आधी घातलेलं आहे.)  मध्यम आचेवर मंद उकळू द्या.  दुसऱ्या बाजूला एका पळीत तेल तापवा.  पुरेसं तापल्यावर लसणाच्या पाकळ्या ठेचून घाला व सोनेरी पिवळ्या होऊ द्या.  ही फोडणी शिजलेल्या भाजीवर घाला.  लगेच पातेल्यावर झाकण ठेवून जाळ बंद करा.

पोळी/फुलके किंवा गरम भात-आमटीसोबत वाढा.

ह्या पाककृतीच्या इंग्रजी आवृत्तीसाठी व रंगीत प्रकाशचित्रांसाठी इथे टिचकी मारा.

सासूबाई