प्रतिसाद देताना

महाजालावर मराठी वाचकाला मराठीतून वाचन करायचे असेल तर अनेक मराठी संकेतस्थळे उपलब्ध आहेत. पण प्रतिसाद देणे-घेणे हे मोजक्या संकेतस्थळांवरच करता येते. प्रतिसादांची देवाण घेवाण हे 'मनोगत'चे सौंदर्यस्थान तसेच बलस्थान आहे असे वाटते.


चर्चा, गद्य, पद्य यापैकी कोणत्याही लेखनप्रकाराची प्रतिसादांच्या संख्येची (सामान्यतः ८५) मर्यादा ओलांडून गेली नसेल तर प्रतिसाद देता येतात.


प्रतिसादांचे दोन प्रकार आहेत.
१. मूळ लेखनाला प्रतिसाद
२. प्रतिसादाला प्रतिसाद किंवा उप-प्रतिसाद


===


१. मूळ लेखनाला प्रतिसाद


असा प्रतिसाद देणे सोपे असते आणि लवकर पार पडते. ज्या लेखनाला प्रतिसाद द्यायचा आहे त्या पानाच्या सर्वात खाली जावे. शीर्षक द्यावे. प्रतिसाद लिहावा. या चित्रावर टिचकी मारून शुद्धलेखन तपासावे आणि प्रतिसाद पाठवण्याकडे कुच करावी.


२. प्रतिसादाला प्रतिसाद किंवा उप-प्रतिसाद


असे प्रतिसाद देता येणे ही 'मनोगत'वरची सर्वात मोठी सोय आहे असे वाटते. या चित्रावर टिचकी मारून असा प्रतिसाद देता येतो. टिचकी मारल्यावर इतर कृती मुद्दा. क्र. १ प्रमाणेच. टिचकी मारल्यावर नवीन पान उघडत असल्याने या प्रकारे प्रतिसाद देण्याचा वेग कमी-जास्त असू शकतो.


अशा उपप्रतिसादांची साखळी केल्यास प्रतिसादांची तिरकी भांजणी होते म्हणून काही सदस्य याला 'तिरके-तिरके' प्रतिसाद देणे म्हणतात.


अशा उपप्रतिसादांचा योग्य तो वापर केल्याने



  • कुठल्याही चर्चेतून मुद्द्याचे नानाविध धागे निघतात त्यांचे आपोआपच संकलन आणि धृवीकरण घडून येते.
  • वाचकाला आपल्या चर्चेचा, मुद्द्यांचा अधिक प्रभावीपणे आस्वाद घेता येतो.
  • एकाच प्रकारच्या मुद्द्यांवर अशी 'तिरकी-तिरकी' चर्चा झाल्याने चर्चा वाचताना गतिरोधक आल्यासारखे वाटत नाही.
  • वाचकाच्या मनातल्या विचारांना योग्य ती चालना, दिशा मिळून त्याच्याकडूनही चर्चेत भर पडू शकते.

अर्थात 'तिरक्या-तिरक्या' प्रतिसादांचा अतिरेक झाल्यास 'मनोगत'वरच्या प्रतिसादांची मांडणी वाकडी झाल्यासारखी वाटते.


एका आकडेवारीनुसार दि. ७ जुलै २००६ पर्यंत 'मनोगत'वरच्या ६००० सदस्यांपैकी तब्बल ६४९ सदस्यांनी लेखन केलेले आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की 'मनोगत'वर अंदाजे १०% लोक विविध प्रकारचे लेखन करतात. बाकी ९०% पैकी निम्मे लोक केवळ वाचक आहेत असे मानले तरीही 'मनोगत'चा वाचकवर्ग हा लेखनकर्त्यांपेक्षा मोठा आहे असे म्हणता येईल.


महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज झालेले गद्य-पद्य लेखन, चर्चा हे केवळ सद्यकालीन वाचकांच्या बरोबरच भविष्यकालीन (१-४-५-९-१४-२३-३७... महिन्यांनी येणाऱ्या) वाचकांनासुद्धा तितकाच रसास्वाद द्यावे असे वाटत असेल तर आपले प्रतिसाद योग्य त्या साखळीत येणे हितावह ठरावे.


लेखन-चर्चा करणाऱ्यांना आपल्या प्रतिसादातून आपले 'मनोगत' प्रकट करण्याचा आनंद मिळतोच. पण तोच आनंद वाचकांनाही द्यायचा असेल तर आपला प्रतिसाद हा मूळ लेखनाला आहे की एखाद्या प्रतिसादाला आहे हे लक्षात घेऊन योग्य त्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा असे वाटते.


बाकी, 'मनोगत'वरचे सदस्य सुजाण आहेतच, अधिक सांगणे न लगे!