सुखदुःख कां ? लक्ष्मण गुह संवाद -

        कैकयीला दिलेल्या वचनाप्रमाणें दशरथानें श्रीरामाला चौदा वर्षे वनवासाची आज्ञा दिली. त्याच्याबरोबर सीता व लक्ष्मणही वनांत जावयास निघाले. कोसल प्रदेशाची सीमा ओलांडून तिघेही श्रृंगवेरपुरास पोचले. तिथे निषादराजा गुह राज्य करीत होता. तो लगेच श्रीरामाला भेटायला आला. पण श्रीरामचंद्रादिकांच्या अंगावर वल्कले पाहून त्याला मनस्वी दुःख झाले. त्याने त्वरीत उत्तम अन्न पेय वगैरे वस्तूंची व्यवस्था केली. पण ते नाकारत श्रीरामाने त्याला समजावलें कीं 'वनवास समयीं मी फक्त वल्कलं व मृगचर्म धारण करून फलं व मुळं यांचाच आहार घेतो'. नंतर त्यांच्यासाठी गुहाने बनविलेल्या तृणशय्येवर राम व सीता निद्राधीन झाले आणि लक्ष्मण व गुह धनुष्यबाण घेऊन पहारा करीत बसले.
       रामाला अशा अवस्थेत निजलेला पाहून गुहाच्या डोळ्यांत अश्रु दाटून आहे. तो लक्ष्मणाला म्हणाला, नेहमी भव्य राजमंदिरात मऊ मऊ बिछाने असलेल्या सुवर्णमंडित पलंगावर निजणारे राम पहा कसे आज दर्भ पर्णांनी बनलेल्या शय्येवर भूमिवर निजले आहेत. विधात्याने कैकयीला कारण बनवून श्रीरामावर कशी ही दुःखद स्थिती निर्माण केली. त्या कैकयीनें मंथरेच्या भ्रष्ट बुद्धिवर विश्वास ठेवून निश्चितपणे हे पापकर्म केले आहे. गुहाच्या ह्या विधानावर लक्ष्मणाने गुहास जो उपदेश केला तो व्यासकृत अध्यात्मरामायणांतील अयोध्याकाण्ड, सर्ग सहावा यांतील ४ ते १५ ह्या श्लोकांत आलेला आहे.


तच्छृत्वा लक्ष्मणः प्राह सखे श्रृणु वचो मम ।
कः कस्य हेतुर्दुःखस्य कश्च हेतुः सुखस्य वा ॥ ४ ॥


        लक्ष्मण गुहाला म्हणाला, मित्रा मी काय सांगतो ते नीट ध्यान देऊन ऐक. कोणाच्या दुःखाचे कोण कारण आहे ? आणि कोणाच्या सुखाचे तरी दुसरे कोण कारण आहे ? अर्थात् कोणीच नाही. मनुष्याचे पूर्वकृत कर्मच त्याच्या सुखाचे वा दुःखाचे कारण होत असते.
        आतां प्रश्न उद्‍भवेल की पूर्वी असे काय घडले असेल की रामाला मानव जन्म घ्यावा लागला. ह्यावर पुराणांत बऱ्याच कथा आहेत. एकदा सनत्कुमारास विष्णूने शाप दिला तर लगेच सनत्कुमारानें विष्णूस प्रतिशाप दिला की, ' तुलाही आपले नेहमी असणारे सर्वज्ञत्व कांही काळ सोडून देऊन किंचित् अज्ञानी राहावें लागेल '. भृगुने विष्णूला एकदा शाप दिला की, ' तुझाही भार्येबरोबर वियोग होईल '. असाच शाप एकदा जलंधर दैत्याची पतिव्रता भार्या वृंदा हिनेंही दिला होता, तसेच नृसिंहावतारामध्ये देवदत्ताच्या भार्येनेही असाच शाप दिला होता. अर्थात् ह्या तिन्ही ठिकाणी विष्णूने काहीतरी उचापत्या केलेल्या असणार. नारदानेही एकदा विष्णूला शाप दिला होता म्हणून त्याला मनुष्य जन्म घेणें भाग होते. मनू-शतरूपा ह्यांना "पुत्ररूपाने जन्माला येईन" असे वचन दिल्यामुळें पुढें त्या दोघांच्या दशरथ-कौसल्या जन्मी त्यांचा पुत्र होऊन हे वचन पूर्ण केले. पण प्रत्येक वेळी उदार अंतःकरणाच्या भगवंताने एकतर भक्ताच्या कल्याणासाठी किंवा भक्तांचे उद्‍गार खरे करण्यासाठी मनुष्य जन्म घेतला असा संदेश असतो.


स्वकर्माजितकर्मैव कारणं सुखदुःखयोः ॥ ५ ॥
  सुखस्य दुःखस्य न कोऽ दाता
        परो ददातीति कुबुद्धिरेषा ।
  अहं करोमीति वृथाभिमानः
        स्वकर्मसूत्रग्रथितो हो लोकः ॥ ६ ॥


        सुख दुःख भोगांचे कारण म्हणून अन्य कोणी जबाबदार नसतो. (कधी कधी  शास्त्रांमध्ये अशा प्रकारच्या द्विरुक्ति तो मुद्दा ठसविण्याकरितां असतात). दुसरा कोणी आपल्या सुख-दुःखाचे कारण आहे असे समजणे ही दोष बुद्धि झाली. तसेच सद्य कर्माचा मी कर्ता आहे हा अभिमान असणेही वृथा आहे. कारण सर्व प्राणिमात्र आपल्या पूर्वजन्म कृत घडलेल्या कर्माच्या सूत्रानें बांधलेले असतात.
        ह्या श्लोकाच्या अर्थाचा आशय असलेले भगवद्‍गीतेंतील अध्याय ५ मधील श्लोक १४ व १५ मननीय आहेत. तिथें श्रीकृष्ण म्हणतात, सृष्टीकर्त्या परमेश्वराने लोकांची कर्मे, लोकांचे कर्तव्य किंवा कर्मफळ यांचा संबंध, यांपैकी कांही उत्पन्न केले नाही. कर्म, कर्तृत्व व कर्मफळसंयोग या सर्वरूपानें प्रकृतिच परिणाम पावते (स्वभावस्तु प्रवर्तते ५.१४). परमेश्वर कुणाचे पाप घेत नाही  वा पुण्यही घेत नाही. प्राण्यांना आत्मस्वरूपाचे जे अज्ञान असते, त्या अज्ञानाच्या भ्रांतीमुळे हे कर्म, हा मी कर्ता (आता ह्यावरून 3.27 हा श्लोक आठवला - अहंकारविमूढात्मा कर्ताहम्‌ इति मन्यते- पण विस्तार नको), त्याचे फळ, व ते मी भोगतो अशा व्यर्थ भ्रांत कल्पना प्राणी करतात - (५.१५). (मूळ श्लोकात 'जन्तवः' शब्द वापरलाय म्हणून मी इथे मनुष्य ऐवजी प्राणी शब्द वापरलाय).


सुहृन्मित्रर्युदासीन द्वेष्यमध्यस्थबांधवाः ।
स्वयमेवाचरन्कर्म तथा तत्र विभाव्यते ॥ ७ ॥


        मनुष्य आपल्या आवडी निवडीप्रमाणे इतरांशी व्यवहार करून त्यांना आपले सुहृद, मित्र, शत्रु, बंधु इ. मानतो. तो कोणावर प्रीति करतो, तर कोणाचा द्वेष करतो तर कोणाच्या बाबतीत उदासीन असतो. ज्याचे जसे आचरण (म्हणजेच दुसर्‍यांबद्दल आपल्या मनांत होणाऱ्या प्रतिक्रिया) असेल तद्‌नुसार दुसरे त्याला मित्र वा शत्रु आढळतात.


        जर पूर्वसंचित कर्मानुसार प्रारब्ध घडते आणि त्यानुसार सुखदायक वा दुःखदायक प्राप्त फळ भोगावे लागते, तर ह्या चक्रामधून सुटण्याचा काही मार्ग आहे की नाही ? श्लोक ८ ते १५ मध्यें लक्ष्मणाने जे गुहाला सांगितले ते पुढच्या भागात.