नाममाहात्म्य

      'ऋतू हिरवा' या कार्यक्रमाचे निवेदन करताना प्रा. प्रवीण दवण्यांनी गदिमांची एक आठवण सांगितली. गदिमा म्हणाले होते वस्तूच्या वापरावर तिचे नाव ठरते. लाकडाची पट्टी तीच. पण भिंतीवर ठोकली की ती खुंटी बनते आणि जात्यावर ठोकली की ती खुंटा बनते.
      यावरून निवेदक अशोक शेवड्यांची आठवण आली. त्यांनी एकदा वस्तूंना देखिल व्यक्तिमाहात्म्य कसे लाभते हे सांगताना म्हटले होते की साधी चामड्याची पादत्राणे. पण ती कुणी, कुठल्या ठिकाणी, कुठल्या निमित्ताने वापरलीत यावरून त्यांचे नामकरण होत जाते.पुण्यामुंबईच्या लोकांनी घातल्या की त्या चपला होतात, गावाकडच्यांनी वापरल्या की  त्या पायताणं होतात.त्यांनी कुण्या अगोचराचे मुखकमल रंगले की ती खेटरं बनतात. मुलीसाठी वरसंशोधन करताना झिजले की ते जोडे बनतात आणि शंकराचार्यांसारख्या वंदनीय व्यक्तीने ती घातली की लगेच त्या पादुका बनतात.
                                                                 वैशाली सामंत.