एक प्रवासवर्णन आमचेही!!! - अंतिम.

जरा ऊशीरच झाला हा लेख लिहायला, त्याबद्दल क्षमस्व.

भाग - ६

साधारणपणे तासाभरात आमच गड पाहून झाला होता.  कारण धुके असल्यामुळे सगळीकडे जाणे शक्य नव्हते.
मेणा दरवाजा, राण्यांचे महाल वगैरे, नगारखाना, बाजार, काही ढासळलेले बुरूज, अन्नाची कोठारे, महाराजांचे सदर वगैरे सर्व पाहून झाले.

गडावर मजबूत वारा होता आणि प्रचंड धुकेदेखिल, अधुनमधुन पाऊस आपल्या अस्तित्वाची जाणिव करुन देत होता. आता जवळजवळ १ वाजत आला होता. आणि आम्ही शिवरायांना वंदन करून परतीच्या प्रवासास लागलो. गडावर MTDC ची रहायची सोय आहे पण आमच्या गाईडने सांगितले की पावसाळयात ते हॉटेल बंद असते.

खाली उतरुन आता आम्ही "शिवथर घळई" कडे जायला निघालो. त्यासाठी परत एकदा महाडला जावे लागते आणि महाडवरुन थोडे पुढे गेलो की महाड पुणे रस्ता लागतो. हे अंतर साधरणपणे ३० किमीचे आहे. आणि साधरणपणे ३० मिनिटात कापता येते. या रस्त्यावर बरसगाव करुन एक पाटी लागते आणि तिथुन शिवथर घळीस जायचा रस्ता लागतो. मजल दरमजल करुन आम्ही बरसगाव पर्यंत पोचलो आणि शिवथरघळईस वळलो आणि हा रस्ता एवढा सुरेख आहे म्हणुन सांगू की....! मला क्षणभर असे वाटले की मी महारष्ट्रात आहे का कुठे स्वर्गात...!! (आईशप्पथ..) तुम्हाला अनुभवावाच लागेल स्वतःला. कोणी वर्णन करून कदाचित पुरणार नाही.


छोटासा रस्ता, डोक्यावर ढग भरुन आलेले पडण्यास आतुर, हिरवी डोलणारी शेते, दुरवर उभे डोंगर आणि प्रत्येकी किमान ४ असे त्यावरून कोसळणारे शुभ्र धबधबे. थंड हवा, असे वाटले की बास....कधी परतुन जाऊच नये ईथुन, आरामत लोळत पडावे एखाद्या बाजेवरती आणि हे सर्व काही मनसोक्त अनुभवावे.




हळुहळू डोंगर जवळ येत होते आणि धबधबे जवळुन दिसायला लागले होते, पण वाट वळणावळणाची असल्यमुळे आपण नेमके कुठे जाणार ते कळत नव्हते. आणि शेवटी एका वळणानंतर आम्ही शिवथर घळईस पोचलो होतो.

शिवथर घळईस म्हणजे समर्थ रामदासांचा निवास आणि दासबोधाचे जन्मस्थान. येथे आता एक मठ बनवला आहे आणि मठाच्या मागच्या भागात आपल्याला एक गुहा सद्रूष्य जागा दिसते आणि तिथुन या प्रचंड महाकाय धबधबा अनुभवता येतो. दुरवर उभे राहूनही आपल्याला पुर्णतः भिजता येईल एवढे तुशार उडत असतात. साधारणपणे आम्ही तासभर हे वातावरण अनुभवून परत जायला निघालो इथपासून अंदाजे २०० कि.मी. वर पण पाय बाहेर निघतच नव्हता हे सर्व सोडून परत सिमेंटच्या जंगलात परतायला.

ज्यांना हा Video बघायचा असेल त्यांनी येथे टिचकी मारावी.

समाप्त.