राजीवांनो

भ्रमर जाता दूरदेशी
तव सौरभा उधळू नका
झाकून ठेवा रूपरंग
अरसिकांपुढे दवडू नका
राजीवांनो, व्यर्थ तुम्ही, कर्दमी उमलू नका               ।धृ।


झिंग आहे दो दिसांची
फुटती धुमारे नवनवे
ऋतुराज येता उपवनी
मन कोवळे ते पालवे
सावरा त्याला जरासे, स्वैर त्या सोडू नका


दाविता आमिष तुम्ही
परिमळाचे मधुकराला
जागतो धर्मास त्याच्या
प्राशितो मधुशर्करेला
अलीकृपे फळला तरू जर, बोल त्या लावू नका


चंद्रासवे भरती नको
अन् नको ओहोटी पुन्हा
भिजवला कितीदा किनारा
तरी कोरडा उरतो पुन्हा
आवरा उर्मी मनातील, सागरा ढवळू नका