दगडी

   दगडी मुकाट राहायची. गावंढळ भाषेत अगदी थोडंसंच बोलायची. मला आठवतंय जशी ती माझ्या लहानपणी दिसायची तशीच ती पुढे कितीतरी वर्षे होती. ती नऊवारी लुगडे नेसायची. दिसायला ती अगदीच काळी होती, उंचीलाही ती ठेंगू होती. ती तंबाखू खायची अन मिशेरी लावायची. तिने कधीच चप्पल घातल्याचे मी पाहिलेले नाही. आणि तिला वैतागल्याचेही मी कधी पाहिलेले नाही.


   दगडी आमच्याकडे मोलकरीण म्हणून बरीच वर्षे होती. अगदी माझ्या बाबांच्या लहानपणापासून, म्हणजे गेली ६० वर्षे जवळपास. आमचे गाव अगदीच खेडेगाव, जवळपास ५००० लोकवस्ती. बामणाचा गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध. शेती, मास्तरकी आणि भिक्षूकी ही उपजीविकेची साधने. आजोबांच्या काळात शेती गेली, त्यांच्या पिढीने बाकी २ साधनांवर भागवून नेले. वडील पिढी इतर बारीक सारीक उद्योगांवर आणि शहर-गाव अशी फरफटत जगली. आमच्या पिढीला मात्र शिक्षण होताच गाव सोडून शहर गाठावे लागले. एका अर्थाने बरेच झाले, जीवन आधुनिक बनले, 'ग्लोबल' झाले, स्वतंत्र आणि व्यक्तिगत झाले. पण याबरोबरच काही-काही नाती कायमची तुटली. दगडी त्यातलीच.


   दगडी जातीने रामोशी होती. ती आमच्या घरी पडेल ते काम करायची. ती आमच्या स्वयपाकघरात व देवघरात कधीच येत नसे. तिला आई रोज वाढणं द्यायची, त्याचेही एक ठरलेले ताट होते. ती ओसरीत जेवायची. तिला दुपारी सगळ्यांबरोबर चहा मिळे तोही एका विशिष्ट कपात. तो कप आम्ही कधीही वापरत नसू. मला लहानपणी या गोष्टींचे वेगळेपण ध्यानात येई पण समाधानकारक उत्तरे कधी मिळत नसत. आजोबा ती खालच्या जातीतली आहे असे सांगत. पण त्याने काय होते हे कधी मला उमगले नाही. जातीयता अशीच रक्तात भिनते. असो. पण त्याने दगडीच्या आणि माझ्या नात्यात कधी फार फरक पडला नाही. मला दगडी आवडायची याचे कारण ती मला कधीच रागवायची नाही, तिच्या कमरेवर बसून मी तिच्याबरोबर भटकत असे. मी तिला लहानपणी 'दगई' म्हणत असे. तिला त्रासही खूप देत असे. ती खूप काम करायची, अगदी न बोलता. सकाळी सगळ्यांसाठी आडाचे पाणी काढायची (आजोबा पूजेसाठी पाणी घ्यायला आले की ती बाजूला व्हायची), स्ट्यांडवर जाऊन सकाळच्या गाडीने आलेला पेपर घेऊन यायची, बाबांची टपाले टाकायची आणि घेऊन यायची, धुणे धुवायची, भांडी घासायची, दळण गिरणीत टाकायची आणि घेऊन यायची. आणि याशिवाय सणावाराची व इतर पडेल ती कामे करायची. मला आठवतंय तिला पगार दरमहा कायम २० रुपये होता आणि दरवर्षी गावच्या बाजारातील एक लुगडे!


   सगळ्यांना आणि तिलाही ती आमच्याच घराचा भाग असल्यासारखे वाटे. तसा तिचा हक्क ही होता. आम्ही गावाला गेलो की तिच्याकडे घराची किल्ली असे. शेजारी किल्ली ठेवून गेलो तर तिला राग येई. ती आईला तसे बोलूनही दाखवी. आईला ती वैनी म्हणे. आमच्या बागेतली फुले किंवा उन्हाळ्यात आमच्या आडाचे पाणी शेजाऱ्यांनी नेलेले तिला खपत नसे. माझे मित्र व मी आमच्या घरात जो धुडगूस घालत असू तो तिला आवडत नसे. दगडीला तशी ५ मुले झाली. त्यातला एकच जगला. त्याचे नाव कोंड्या होते. तो नेहमी उनाडक्या करी. कारण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नसे. तो माझ्यापेक्षा बराच मोठा होता. पण तो शाळेत गेल्याचे मला कधी आठवत नाही. पुढे तो दारुड्या झाला आणि शहरात परागंदा झाला.


   माझ्या दहावीनंतर आम्ही सर्व उठून शहरी गेलो आणि शहरी झालो. गावातील घर कुलूपबंद झाले. मला खात्री आहे की दगडीने स्वतासाठी म्हणून कधीच उघडले नसेल. आता फक्त कधीतरी गावी जाणे उरले. पुढे उच्चशिक्षण, नोकरी या नादात गावी जाणे जवळपास बंदच झाले. मागच्या महिन्यात गावी जाणे झाले. एकटाच गेलो होतो. बदललेले गाव आणि लोक बरेच वेगळे वाटले. दगडीची चौकशी केली, तर कळले, दगडी .. गेली! ... सर्रकन अंगावर काटा आला. इतके वर्षे गृहीत धरलेली ही दगडी मला न सांगता गेलीच कशी असे वाटून गेले. एखाद्याने आपल्यासाठी इतके करावे, आपल्या जीवनाचा भाग व्हावे, आणि ती व्यक्ती मरताना देखील आपण तिथे नसावे या जाणीवेने माझ्या डोळ्यात पाणी आले. बराच वेळ आडाच्या रहाटाजवळ मी तिच्या आठवणी उगाळत खिन्न बसून होतो.


   वाटायला लागले की जिन्यात, रस्त्यात, ऑफिसात अनेक अनोळखी लोकांना मी, हाय-हॅलो करतो. दहादा धन्यवाद, थँक्यू करतो. आणि दगडी आमच्यासाठी मर-मर मेली तिचे कधीच मी आभार मानू शकलो नाही. तिच्यासाठी कधीच काही करू शकलो नाही. या जाणीवेने मला दुःख म्हणजे काय असते हे कळले.  तिथे थांबणे माझे मलाच जड जाऊ लागले आणि शहराच्या गर्दीत तोंड लपवायला मी संध्याकाळची एस.टी. पकडली.


-भाऊ