खग्रास चंद्रग्रहण २००६

खग्रास चंद्रग्रहण (७-८ सप्टेंबर २००६)


लवकरच  खग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी आपल्याला लाभणार आहे गुरूवार, ७ सप्टेंबरच्या रात्री.


प्रत्यक्ष ग्रहणाच्या वेळा खालील प्रमाणे आहेत.मुंबई आणि पुण्याच्या वेळांमध्ये फारसा फरक नसल्याने मुंबईच्या वेळा देत आहे. घरच्या दिनदर्शिकेमध्ये स्थानिक वेळा मिळतील.


ग्रहण स्पर्श     रात्री  ११:३४
ग्रहण मध्य            ००:२१ 
ग्रहण मोक्ष            ०१:०८   



आपल्या पृथ्वीचा नुसता व्यासच चंद्राच्या चौपट आहे.त्यामुळे तिची प्रचंड सावली चंद्रावरून जाण्यास १ तासाहून अधिक वेळ लागतो.      


ग्रहणाला सुरूवात झाल्यावर पृथ्वीच्या परीघाची सावली चंद्राच्या पृष्ठभागावर दिसू लागेल. तेव्हा एका गोष्टीचे निरीक्षण करावे. हा वर्तुळाकार सावलीचा तुकडा (Arc) दोन्ही बाजूंनी आकाशात वाढवा आणि कल्पनेने एक वर्तुळ पूर्ण करा. या वर्तुळाच्या विस्तारावरून चंद्राच्या तुलनेत पृथ्वीची भव्यता जाणवेल. संपूर्ण खग्रास स्थितीत चंद्र दिसेनासा होणार नाही किंवा पूर्ण काळाही पडणार नाही तर तांबूस-तपकिरी दिसू लागेल. जेम्सच्या रंगीत गोळीचे वरचे आवरण निघून गेल्यावर जशी चॉकलेटी दिसते तसा चंद्र दिसेल.सूर्याचा संपूर्ण प्रकाश अडवला जाऊनही चंद्राला हा प्रकाश कुठून मिळ्तो?


चंद्रग्रहण हे फक्त पौर्णिमेलाच दिसू शकते. त्याचवेळी चंद्रावर मात्र पृथ्वीची अमावस्या असेल आणि पृथ्वीने सूर्यबिंब पूर्ण झाकून गेले असेल.थोडक्यात चंद्रावरून खग्रास सूर्यग्रहण दिसेल.
 संध्याकाळी चंद्राची कोर पाहिली असेल तर चंद्राचा अप्रकाशित काळा भागही थोडा धुसर दिसतो आणि अनेकदा त्यावरील सशासारखी आकृतीही दिसून येते.हा हलका प्रकाश म्हणजे असते पृथ्वीचे चंद्रावर पडणारे चांदणे. पण खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळेस आपल्याकडील अमावस्येसारखी स्थिती चंद्रावर असल्याने पृथ्वीची लहानशी कलाही दिसू शकत नाही. मग हा लालसर दिसणारा प्रकाश कुठून येतो? याचे उत्तर आहे पृथ्वीच्या वातावरणातून. पृथ्वीचा सूर्यप्रकाशित भाग त्यावेळेस चंद्राच्या विरूद्ध दिशेला असल्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वर उल्लेख केलेला परावर्तित प्रकाश चंद्रावर पोचू शकत नाही. पण पृथ्वीचे वातावरण मात्र प्रकाशाचा काही भाग परावर्तित करते हाच तो चंद्राला खग्रास अवस्थेतही उजळवणारा तांबूस प्रकाश.


खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळची सूर्य - पृथ्वी - चंद्र यांची सापेक्ष स्थिती.


 



ख्रग्रास चंद्रग्रहणाच्या काही अवस्था. (४ मे २००४ ला दिसलेल्या चंद्रग्रहणाच्या )