अशी ही बनवाबनवी (भाग दुसरा)

 ही घटना आहे २३-२४ वर्षांपूर्वीची. बँकेचे संगणीकरण होण्यापूर्वीची. खात्यामध्ये डेबिट/क्रेडिटची नोंद करताना किंवा बेरीज/वजाबाकी करताना काही चूक झाली तर वेळीच लक्षात यावे म्हणून एस. बी. लेजर्स महिन्यातून एकदा बॅलंस करावी लागत.इतरवेळी सगळी लेजर्स एकाच दिवशी बॅलंस करणे शक्य नसे. पण क्लोजिंगच्या दिवशी सगळी लेजर्स पुन्हा बॅलंस केली जात. एका क्लोजिंगला असे झाले की सगळी लेजर्स स्वतंत्रपणे(इण्डिविज्युअली) टॅली झाली परंतु सगळ्या लेजर्सचा एकत्रित बॅलंस आणि एस. बी.चा ट्रायल बॅलंस यात दहा हजाराचा फरक आला. लेजर्स टॅली झाल्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नव्हते. परंतु कुठल्याही क्षणाला स्टॅच्युटरी ऑडिट सुरू होणार होते.त्यात शेरा नको म्हणून हा फरक शोधण्याला प्राधान्य द्यायचे मी ठरवले.
     माझ्या डिपार्टमेंटला भास्कर नावाचा एक दक्षिण भारतीय मुलगा होता. ७-८ महिन्यापूर्वीच तो बँकेत लागला होता.पण आकडेमोडीत तो तरबेज होता. त्याला मी म्हटले,"भास्कर, थोडा वेळ तुझा काउंटर बाकीचे सांभाळतील. ट्रायल बॅलंसला दहा हजारांचा फरक येतोय. तो जरा मिळतो का पाहा."
      तो चमकून माझ्याकडे पाहतच राहिला. मी विचारले,"काय झालं रे?"
      तो म्हणाला,"आज किती गर्दी असेल? सगळ्यांनाच त्रास होईल.'"
      मी त्याला म्हणाले,"फारच गर्दी झाली तर तुला बोलावून घेईन. पण ऑडिट सुरू व्हायच्या अगोदर टॅली झालं तर बरं होईल." तो मनाविरुद्ध उठला.
      त्या दिवशी खूप गर्दी होती. पण 'मुलांच्या' आणि ग्राहकांच्याही सहकार्याने दिवस पार पडला. त्या गडबडीत भास्करकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. दुसरे दिवशी बघितले तर भास्कर सगळी पुस्तके उघडून बसला होता पण
त्याचे कामात बिलकुल लक्ष नव्हते. मी अधून मधून त्याला विचारून येत होते,
" काही प्रगती आहे का रे?" "काही मदत हवी आहे का? फिगर्स कॉल आऊट करू का?" माझ्या प्रश्नांना तो "नाही" "नको" अशी एका शब्दात उत्तरे देत होता.त्या दिवशी भास्कर वेळेअगोदरच सटकला होता. मला खूप आश्चर्य वाटले. आजपर्यंत मला 'बाय' केल्याशिवाय तो कधीही गेला नव्हता.
      दुसऱ्या दिवशी भास्करच्या मित्राचा फोन आला की भास्कर आजारी आहे म्हणून तो कामावर येणार नाही. त्याच दिवशी ऑडिटही चालू झाले. टाळत होते तो शेरा आला म्हणून मग तातडीने हातात घेतलेले काम बाजूला पडले. त्या नंतरचे १०-१२ दिवस खूप धामधुमीत गेले.  
      एके दिवशी दैनंदिन काम संपल्यावर डिफरंस शोधायचे काम हाती घेतले. कितीही उशीर झाला तरी आज या प्रकरणाचा निकाल लावायचाच असे ठरवले. साधारण पाचचा सुमार होता. बँकेत आम्ही ७-८ जणच होतो. तेवढ्यात एक बाई मला भेटायला आली व म्हणाली," तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. जरा बाहेर येता का?"
      मी म्हटले,"बाहेर? इथेच बोला ना"
      दोन टेबलांपलीकडे बसलेल्या माझ्या सहकाऱ्याकडे बघत ती म्हणाली,"थोडं खासगी आहे."  
      मी तिला कँटिनमध्ये घेऊन गेले. खुर्चीत बसताच ती म्हणाली,'मी भास्करची आई. भास्करच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. तुम्हाला माहीत आहेच की त्याने दहा हजार रुपयांची अफरातफर केली आहे. पण ही त्याची  पहिलीच चूक आहे. त्याला तुम्ही पोलिसात दिले तर तो कायमचा आयुष्यातून उठेल. प्लीज त्याला माफ करा."
      मी चक्रावूनच गेले. मी तिला म्हणाले,"मला कसं माहीत असणार? आणि माफ करायला ते काही माझे पैसे नाहीत. शिवाय माझ्याकडे एवढे अधिकारही नाहीत."
      "असं म्हणू नका. तुम्हीही आई आहात, एक आईच दुसऱ्या आईची व्यथा जाणू शकते" 
      मी म्हणाले,"मी बघते काय करता येतं ते. पण त्या आधी मला भास्करशी बोलावं लागेल. नक्की काय झालंय ते मला कळलं पाहिजे."
      इतक्या सगळ्या मुलांमध्ये मी भास्करलाच फरक शोधायचे काम दिल्यामुळे त्याचा असा समज झाला की मला काही संशय आला आहे. त्यामुळे घाबरून तो घरीच बसला. 'कारणाशिवाय घरी का बसला आहेस' असे आईने खोदून खोदून विचारल्यामुळे त्याने आईकडे कबुली दिली . त्या रात्री त्याने फोनवर मला सगळी माहिती दिली.चार महिन्यापूर्वी त्याला दहा हजारांची गरज  पडली . त्याने मित्राच्या मदतीने दोन बेनामी खाती उघडली. एक आमच्या बँकेत आणि एक दुसऱ्या बँकेत. आमच्या बँकेचा चेक दुसऱ्या बँकेत जमा करून त्याने पैसे काढले. क्लिअरिंगमधून चेक जेंव्हा आमच्याकडे आला तेंव्हा त्याने तो फाडून टाकला आणि आमच्या कडच्या पुस्तकात आवश्यक ते फेरफार केले. लेजर्स वेगवेगळ्या दिवशी टॅली होत असल्यामुळे त्याची लबाडी उघडकीला आली नाही त्यामुळे आपण सुटलो असे त्याला वाटले. पण क्लोजिंगच्या दिवशी दहा हजारांचा फरक येताच तो हादरला. यातून बाहेर कसे पडायचे ते त्याला कळेना.
      झाला प्रकार मी चीफ मॅनेजरांच्या कानावर घातला. त्यानंतर भास्कर आणि त्याची आई त्यांना भेटली. दहा हजारांकरता बँक पोलिसात गेली नसती पण भास्कर बडतर्फ नक्कीच झाला असता आणि त्याला पुढे दुसरी नोकरी मिळवणे कठीण गेले असते. चीफ मॅनेजरांना भास्करच्या आईची दया आली म्हणून त्यांनी भास्करला मदत करायचे ठरवले. त्यांनी भास्करकडून दहा हजार वसूल केले आणि त्याच्याकडून राजीनामा लिहून घेतला.ही गोष्ट बँकेतल्या फक्त ३-४ जणांनाच ठाऊक झाली. भास्करने तडकाफडकी नोकरी का सोडली यावर इतरांच्यात चर्चा होत राहिली. आज भास्कर कुठे आहे, काय करतोय मला काहीच माहीत नाही. तो एकच गुन्हा त्याच्या हातून घडला की त्याची प्रवृत्तीच गुन्हेगारीची होती हेही मला माहीत नाही. आम्ही जे केले ते चूक की बरोबर हे मला अजूनही ठरवता आले नाही  आहे.
                                                                   वैशाली सामंत.