११ सप्टेंबरची अमेरिका

नमस्कार,


अमेरिकेतील रविवारच्या संध्याकाळी म्हणजे सप्टेंबर १०, २००६ ला मनात आले ते लिहीत आहे. कारण अर्थातच सप्टेंबर ११ हे आहे.


याच दिवशी १८९३ साली स्वामी विवेकानंदांनी शिकागोला झालेल्या पाहिल्याच सर्वधर्मपरीषदेत "उपकार" म्हणून दिल्या गेलेल्या काही क्षणांचा बोलायला वापर करून तमाम श्रोत्यांची मने जिंकली. इतकी की याच धर्मपरीषदेत त्यांची नंतर वेळापत्रकात नसूनही अजून व्याख्याने झाली. ज्या अवस्थेत ते पैसा गोळा करून आले, इथे येऊनही संन्यासी असल्यामुळे अथवा व्यवहारात राहण्याची जाण नसल्यामुळे चुका करूनही आणि सर्व फासे विरुद्ध जाऊनही दृढ निश्चयापासून न ढळता एखादा चमत्कार वाटावा अथवा अदृश्य शक्तीची इच्छा, या पद्धतीने ते शिकागोला पोचले आणि स्वतःच्या गुरुला स्वामी रामकृष्णांना त्यांच्या पश्चात दिलेल्या मानसवचनाची परिपूर्ती केली आणि अमेरिकेत हिंदुत्वाची अथवा हिंदू धर्माची म्हणून नव्हे किंवा धर्मांतर करण्याच्या कोत्या हेतूने म्हणून नव्हे, तर खऱ्या अर्थाने वैश्विक आणि कालातित तत्वज्ञानाची ओळख करून मुहूर्तमेढ रचली. आज अमेरीकेतला एक विशिष्ट अमेरिकन - अ-हिंदू समाज पाहताना देखील लक्षात येते की ते रूढार्थाने नव्हे, पण तत्त्वज्ञान आचरण्याच्या दृष्टीने हिंदू धर्माच्या जवळ आले आहेत. मला याचे एक चांगले उदाहरण देयचे आहे पण ते नंतर लिहीन...विवेकानंद स्वतः संन्यस्त होते पण कर्मठ हिंदू नव्हते, म्हणूनच एकदा ते म्हणाले की पुढच्या (भारतीय) पिढीला गीतेचे तत्त्वज्ञान समजावून देयचे असेल तर त्यांना मैदानात जाऊन फुटबॉल खेळूदेत... (कदाचित हे बंगाली लोकांनी नंतर फारच मनावर घेतले!)


११ सप्टेंबर १९०६, महात्मा गांधींनी (त्यावेळेला त्यांना महात्मा ही पदवी मिळाली नव्हती), जोहान्सबर्गला तमाम भारतीयांकडून द,आफ्रिकेतील गोऱ्या लोकांच्या अत्याचाराच्या विरुद्ध अहिंसेचा मार्गाने लढा पुकारला. पुढचा आवडणारा तर कधी न आवडणारा इतिहास आपल्याला माहिती आहेच. गांधीजी व्यक्तिगत आयुष्यात कर्मठ हिंदू होते, पण सामान्यांना सामावून घेण्यासाठी म्हणून अहिंसाच योग्य या मताने चळवळीचा पाया रोवला. त्याचे पुढे भारतात आणि जगभरात अनेक प्रयोग झाले. अमेरिकेतपण मार्टीन ल्यूथर किंग यांनी अहींसेच्यापायावरच १९६०च्या दशकात "सिव्हील राईट्सची" चळवळ उभारली. गांधीजींच्या ह्या चळवळीच्या बीजाचे ही शताब्दी आहे, हे मला समरव्हील नावाच्या बॉस्टन जवळील एका शहराच्या स्थानिक वर्तमानपत्रात कोणीतरी (अमेरिकन्स, भारतीय नव्हे!) छोटेखानी सोहळा करायचे ठरवले हे वाचले तेंव्हा कळले! आधी विश्वास बसला नाही. पण जेंव्हा शोध घेतला आणि नक्की केले तेंव्हा कळले की ते खरे आहे आणि जरा लाजही वाटली की भारतीय असून आपल्याला हे माहीतही नाही. (मी काही रूढार्थाने गांधीवादी अथवा गांधीजींचा अंधभक्त नाही तरीही!)


२००१ मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि इतर ठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आता पाच वर्षे पूर्ण होत आहेत. जगात हैदोस घालणारा अतिरेकी धार्मिक मूलतत्त्ववाद काय आहे याचा प्रत्यक्ष दुर्दैवी अनुभव वर्षानुवर्षे समृद्धीच्या आणि सैन्यबळाच्या कोशात राहणाऱ्या अमेरिकन जनतेला आला. या हल्ल्याचे वैशिष्ट्य एव्हढेच की ह्यात अमेरिकेतील सर्वप्रकारचा समाज कुठल्या न कुठल्यातरी पद्धतीने बळी ठरला. आज बूश आणि त्याचा गोतावळा याचा उपयोग करून जगभर दादागिरी करत आहेत. त्या हल्ल्यात जेव्हढे निष्पाप जीव गेले असतील त्याच्यापेक्षाही ह्या बूश महाशयांच्या महत्त्वाकांक्षेने गेले आहेत (सैनिक असले तरी त्यातील अनेक होमगार्डस आहेत आणि भिऊन नाही पण विरुद्ध लढत आहेत)


११ सप्टेंबरचा अमेरिकेवर  झालेला हा असा परिणाम - एकदा विवेकानंदांनी येऊन केला, गांधीजींनी नकळत पण स्व-कर्तुत्त्वाने केला - आणि बिन लेडनने द्वेषाने आणि धार्मिक मूलतत्त्ववादाच्या साहाय्याने केला.