ती

तिची माझी मैत्री खूप जुनी. अगदी लहानपणापासूनची. एकत्रच खेळ, अभ्यास, शाळा. लहानपणाची लटकी भांडणं, लपंडाव, उन्हाळ्याच्या सुट्टीत कैर्‍या, चिंचा खाणं सगळं तिच्या साथीनं झालेलं. मग का कुणास ठाऊक, कॉलेज सुरू झाल्यावर संपर्क कमी झाला. भेट व्हायची, पण आधीसारखी जवळीक राहिली नाही. पीएचडी संपल्यानंतर कामासाठी इथे इटलीत आलो आणि संपर्क जवळजवळ तुटलाच.


अचानक पाच-सहा महिन्यापूर्वी ती परत भेटली. मी धक्क्यातून सावरलो आणि विचारलं,
"अग, तू इथे कुठे?"
"अरे, मी गेली दोन वर्षे इथे मनोगतावरच असते."
"खरं की काय?"
"मग काय? तू मला विसरलास, पण मी नाही विसरले. शेवटी मी तुझी पहिली भाषा आहे ना."
तिला पाहून मला अपराधी वाटत होतं.
" "
"का रे? एकदम गप्पसा झालास?"
"अग काही नाही. मधल्या काळात मी संपर्क नाही ठेवला.."
"अरे एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. मी आपलं गमतीनं म्हटलं.
आणि मी तुला चांगली ओळखते. आपला संपर्क जरी नसला तरी तुझ्या अंतर्मनात मीच होते."
"हे कशावरून?"
"तुला आठवतंय? मागे तुझ्या हाताचं हाड मोडलं होत?"
"ते कसं विसरेन? इतक्या वेदना झाल्या होत्या.."
"तेंव्हा तुझ्या मनात, ओठावर मीच होते ना?"
"हो."
"मग? तुला जरी वाटलं की तू मला विसरलास तरी तसं नाहीये."
"ए, एक विचारू?"
"विचार ना."
"मध्ये मी इंग्रजी शिकलो, सध्या इटालियन शिकतोय. तुला राग नाही आला?"
"अरे त्यात राग कसला? उलट आनंदच होतोय. नव्या भाषा शिकलास म्हणजे मला विसरशील अस थोडंच आहे? तुला एक सांगू का? आम्हा ब‍‍र्‍याचशा भाषांमध्ये नातं आहे. काहींशी जवळच, काहींशी लांबच. आणि आमच्यामध्ये शत्रुत्व तर अजिबातच नाही. ह्या सगळ्या तुम्हा माणसांच्या सुपीक डोक्यातल्या नापीक कल्पना. आता त्यातलं किती 'पिक' करायचं हे ज्याच त्यानं ठरवावं."
माझा आश्चर्यचकित चेहरा बघून ती हसली.
"तू चक्क पी.जे. मारतेस?"
"अरे, मग त्यात आश्चर्य करण्यासारखं काय? माझं शब्दशः: वय जरी खूप
असलं ना, तरी मनाने मी तुमच्याइतकीच तरुण आहे. आणि सतत
बदलत राहणं हेच तर माझ्या जिवंतपणाच लक्षण आहे. आता बघ,
शिवरायांच्या काळातली मी, टिळकांच्या काळातली मी आणि सध्या फर्गसनच्या बाहेर वैशालीमध्ये जी असते ती मी, आहे ना फरक?" 
"हो. खरय."
"मग.. काय म्हणते आहे तुझी नवी मैत्रीण? इटालियन रे.."
"मला आवडते. नादमधुर आहे. तिचा स्वभावच खूप वेगळा आहे."
"अरे, होईल सवय हळूहळू. माझा स्वभाव कळायलाही
तुला वेळ लागला होता. आता आठवत नसेल, लहान होतास ना. नवीन मराठी शिकण्यार्‍यांना विचार माझा स्वभाव कसा आहे ते. पण तुला एक गंमत सांगू? आमचे हे वेगवेगळे स्वभावच आम्हा सर्व भाषांची वैशिष्ट्ये आहेत. शेवटी आम्ही सर्व भाषा म्हणजे अभिव्यक्तीच एक माध्यम. तुम्ही जितक्या जास्त भाषा शिकाल, तितक्या नव्या अनुभवांच भांडार तुमच्यासमोर उघडलं जाईल. म्हणूनच गुरुदेवांनी बंगालीमधून जे व्यक्त केलंय, ते तसच्या तसं व्यक्त करायला मला नाही जमणार. त्यासाठी तुला तिलाच विचारावं लागणार. पु.लं.ची 'अपूर्वाई' तिला नाही जमणार. ग़ालिब म्हणजे काय ह्याच उत्तर हवं असेल तर उर्दूला पर्याय नाही."
"हो, म्हणून तर बंगाली शिकायचं म्हणतोय."
"अरे हो हो. जरा दमाने घे. आधी एक भाषा तर आत्मसात कर.
बरं एक सांग, माझं हे घर कसं वाटलं तुला?"
"मनोगत? मस्तच. इथेच तर तू मला भेटलीस.. ते ही इतक्या दिवसांनंतर. पण.."
"पण काय रे?"
"अग कधी कधी माणसं अनुभवांची देवाणघेवाण करायची सोडून वैयक्तिक पातळीवर उतरतात. मारामार्‍या सुरू होतात. मग वाटत, नकोच त्या चर्चा."
"अरे असं करून कसं चालेल? चार डोकी आली की मतभेद हे होणारच.
 पण काही चांगले अनुभवही आले असतील ना?"
"हो तर. इथेच तर माझी काही छान मित्र-मैत्रिणींशी भेट झाली.
त्यांच्याशी गप्पा मारायला, विचारांची देवाण-घेवाण करायला मस्त मजा येते."  "कसं बोललास. तू इथे आलास की मलाही छान वाटतं."
-------


मंडळी, ही होती माझी जीवाभावाची मैत्रीण, सखी - मराठी. (इथे आई हे नातं वापरलेलं नाही. हा चर्चेचा विषय होऊ शकेल). तिची माझी भेट घडवल्याबद्दल प्रशासक, मनोगती यांचे मन:पूर्वक आभार.
हॅम्लेट