मीच शब्दांना पुन्हा ही
कुंपणे न घालणार
मीच डोळ्यांना नव्याने
झापडे न लावणार।
माझ्या अंतरी उमले
आग जी विखार तोच
उमटेल अक्षरात
अंतरंग ते तसेच।
नसेलही नसो त्याला
कवितेचे रूप मूर्त
असेल मात्र मोकळा
थेट मांडलेला अर्थ ।
वाट माझी उजळेल
प्रकाशात निखाऱ्यांच्या
येईल येवो पहाट
पसाऱ्यात किरणांच्या।
दंश मी मांडेन इथे
काळजास डसणारे
प्राण मी ठेवीन इथे
कण कण झिजणारे।
भुलवाया सुंदरता
चातुर्य न मजकडे
मिळतील फक्त इथे
आर्त उसासे बापडे।
तरीही म्हणेन हेच
आज मला गाऊ द्या
काळरात्रीच्या अंताला
दुःख मांडत जाऊ द्या....
संपदा
(१८.९.०६)