चालू कसा

आठ दिवसापूर्वी भारतात परत आलो आणि  रस्त्यावर चालताना वाटले


चालू कुठे कसा मी येथे मुळी न जागा
रस्त्यात वाहनांच्या दिसतात फक्त रांगा
दिसतात चालताना रस्त्यात लोक चार (?)
परि चालतात त्याना बसती शिव्याच फार
'कैसे मधेच घुसता ?पथ काय बापजाद्या
आंदण आहे दिलेला ?'दोळे तपासुनी  घ्या"
अर्धाअधीक रस्ता तोडून ठेवलेला
होता दुरुस्त जागा मिळणार चालण्याला
ऐसी मनात आशा नच शक्य पूर्ण होणे
रस्ता कितीजणांचे लागे सदैव देणे
त्या तीन चाकि रिक्षा ट्रक आणखीच मोठे
संख्या किती तयांची ते राहणार कोठे
फळभाजी हातगाड्या करण्यास सोय तुमची
करण्या दुरुस्ति चपला आणि वाहनांची
मिळण्या चहा फराळास्तव खाद्यवस्तु
चाय्नीज मिळेल जागा नच चालण्या परंतु
महनीय व्यक्तिमत्वां नगरात स्वागताचे
अतिभव्य फलक मध्ये रस्त्यात लावलेले
जणु सर्व जनप्रवाह त्यासाठि थांबलेला
जरि तेच वाचण्याला नच वेळही कुणाला
तैसी सिलिन्डरांची ही माळ लाललाल
किति सोय ही जनांची होई तिन्ही त्रिकाळ
गायीगुरे म्हशीही त्या मात्र संथ शांत
घोडेहि दौडतात रस्त्यात या प्रशांत
पाहू जिथेजिथे मी सर्वत्र धूळधूर
अन फलक प्रदुषणाचा लाजून होइ चूर
मन्दीर चर्च दर्गे रस्त्यात मांडतात
भावीक भक्त सगळे तेथेच भांडतात
जरि चालण्यास रस्ता आहे पुरा निकामी
मोर्चे सभा मिरवणुका याना सदा इनामी
कधि ती गणेशमूर्ती ताबूत वा कधीचे
कधि ही जयंति अथवा कधि लग्नही कुणाचे
यासाठि मार्ग बन्द हा आज तो उद्याही
आहेत जागि रस्ते या सूचनेत ग्वाही