ट्यूलिप्सच्या गावा...

ऍमस्टरडॅमची आणि आमची परत गाठभेठ होईल, असं वाटलं नव्हतं...पण ट्यूलिप्सची शेतं आणि बागा आम्हाला खुणावत होत्या.आमची मागल्या वेळची भेट ओल्या पावसात चिंब भिजलेली होती.क्रिकेट तिरंगी सामन्यांचे निमित्त होते,पण तेव्हा ट्यूलिप्सचा हंगाम नव्हता.ही नाजूक फूलं मार्च एंड ते मे या काळात बहरतात.कॉकेनहॉफ हे ट्यूलिप्सचे नंदनवन!ऍ' डॅम पासून तासदीड तासाच्या अंतरावर...दरवर्षी इथे लाखो ट्यूलिप्सची लागवड होते,आणि इतरही कितीतरी प्रकारची फुले!अनेकविध प्रकारचे ऑर्किड्स सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात.


आपल्या हिंदी चित्रपटांच्या कृपेने (यश चोप्रा आणि मंडळी) ही ट्यूलिप्सची शेतं आपण ८०च्या दशकातच पडद्यावर पाहिली आहेत.(हो ताटवे नव्हे चक्क शेतंच आहेत ती..) तीच प्रत्यक्षात पहायला मिळणार,नव्हे एक दिवस त्यांच्या सहवासात रहायला मिळणार या कल्प्ननेनेच मनातल्या मनात रंगोत्सव करून झाला,इंटरनेटवरील साईटवर चित्रे पाहून झाली,देखा एक ख्वाब...,ये कहाँ आ गये हम इ.इ. गाणी dvd वर चारसहा वेळा पाहून झाली.प्रथमच त्यातल्या अमिताभकडे दुर्लक्ष झाले आणि फक्त फुलांकडेच डोळे भरुन पाहिले. ट्यूलिप्सच्या भेटीलागी जीवा आस लागून राहिली होती.


सक्काळी नऊ वाजताच आम्ही हाग हून कॉकेनहॉफला पोहोचलो.वाटेत अनेक प्रकारची फूलं दिसत होतीच.वसंताला 'ऋतुराज' का म्हणतात? याचे प्रत्यक्ष उत्तरच वाटेवरच्या रस्त्यारस्त्यांवर मिळत होते.रंगीत फुलांच्या सुंदर सुंदर रांगोळ्याच जणू रस्त्याच्या दोबाजूला होत्या.मोठ्या मोठ्या वृक्षांवरती कोवळी कोवळी नवी पालवी होती‌. सगळी कडे एक सुखद उबदारपणा होता. गप्पा, गाणी,भेंड्या आपसूकच मंदावल्या आणि गाडीचा वेग ही कमी झाला.ट्यूलिप्सची शेतं आमच्या दृष्टीपथात आली होती. डोळ्यातच काय पण कॅमेऱ्याच्या डोळ्यातही तो रंगोत्सव माईना.'नयनसुख' चा अर्थ मला कॉकेनहॉफने सांगितला. खरोखरच आपण काही शब्द इतके वापरतो की वापरुन,वापरुन त्यातला अर्थ झिजून गुळगुळीत होतो, आणि त्याची खरी ओळखच होत नाही.


इथे मात्र मला,आम्हा सर्वांनाच वेगळी अनुभूती मिळाली. जिकडे पहावे तिकडे नजरेच्या टप्प्यात रंगीबेरंगी फुलेच फुले!एका ओळीत,एका रांगेत शिस्त्तीत वाढलेली,तरीही कृत्रिम वाटत नव्हती.मध्येच एखादे फूल वळण,वेलांटी घेत दुसऱ्या दिशेनेही गेले होते,पण ते या अखंडतेच्या सौंदर्यात भरच घालत होते̱. धरतीचा हिरवा शालू इथे रंगीत झाला होता. लाल,पिवळा,केशरी,जांभळा,पांढरा अशा ट्यूलिप्सच्या हजारो,लाख्खो फुलांचा कशिदा होता तो.तहानभूक सग्गळं काही हा रंगोत्सव भागवित होता.


याच बागेत जुनी पवनचक्की आहे ती आतून,बाहेरुन,वर चढून सर्व बाजूंनी पाहिली.'हॉलंड हा पवनचक्क्यांचा देश आहे' असे भूगोलाच्या पुस्तकातले वाक्य आठवणीतून वर तरंगत होतेच.वाटेत आम्हाला अनेक आधुनिक पवनचक्क्या दिसतही होत्या पण आम्हाला जायचे होते जुन्या पवनचक्क्या पहायला... पण ट्यूलिप्स आणि इतर फुलांच्या मोहात इतके मनापासून रमलो होतो.कमीतकमी ५,६ तास तरी ही बाग पहायला हवेतच.


या पवनचक्कीच्याच खालच्या बाजूला एक जण हॉलंडचे प्रसिद्ध लाकडी बूट करवतीने लाकूड कापून तयार करत होता ते पहायला आणि विकत घ्यायला बरीच गर्दी जमली होती.'युरो' प्रत्येक वेळी रुपयांत मोजला तर साधा पाव खाणं पण मुश्किल होईल!त्यामुळे युरोचे धर्मांतर न करताच ट्यूलिप्सचे कांदे खरेदी केले.(आता हे कांदे लागून माझ्या फ्रांकफुर्ट च्या गच्चीत ट्यूलिप्स येणार कधी?आणि मुळात येणार का? हे प्रश्न मला त्या उन्मनी की कायशा अवस्थेत पडले नाहीत.इतके ट्यूलिप्सचे संमोहन होते. नंतर त्या कांद्यांची फुले कधीच झाली नाहीत हा भाग अलाहिदा!)


आता पवनचक्क्या पहायच्या होत्या,आणि चीजचा कारखाना..


 


(क्रमशः)