दधिची

समाजासाठी प्रसंगी स्वतःच्या सर्वस्वाची होळी करणाऱ्यांच्या वाट्याला अनेकदा घोर उपेक्षा येते. मतलबी आणि भावनाशून्य अशा या व्यवहारी जगात,  समाजात असे त्यागी वरचेवर निर्माण कसे व्हावेत ?


दधिची.....


वादळवारं थोपवणारा
आदर्श जसा पहाडाचा
माणूस साधा नव्हताच तो
समाज सेवक हाडाचा



नाही निर्मिले पाश स्वतःचे
झुगारले सारे अनुबंध
फिरला पिसाट वाऱ्यासम तो
समाज करण्या एकसंध


स्वातंत्र्याच्या दिनी कधी
प्रश्नोत्तरे , हालहवाल
कुठे तरी एक फोटो
एक नारळ, एक शाल



यश त्याचं वाटून घेतलं
नंतर नव्हती कुठे वार्ता
खोल खोल ओढत होती
आता उपेक्षेची गर्ता


काय आले वाट्याला
काय होते अभिप्रेत
अनोळखी बाजूला कुणी
जेव्हा जळत होतं प्रेत



संस्था काढली नावाने
देणगी- निधिचे बी पेरले
वटवृक्ष होण्याआधीच
रोपाला वाळवीने घेरले


उभे जाळले आयुष्य पण,
कुणास आहे तमा तिची
समर्पणाला कसे मिळावे
एकामागून एक दधिची ?


                                 ..........अभिजित पापळकर


टीप: असुरांविरुद्ध लढताना इंद्राला 'वज्र'  हे अस्त्र देण्यासाठी आपल्या पाठीचा कणा अर्पण करुन बलिदान करणाऱ्या महान तपस्वी ऋषींचे नाव 'दधिची' होय.