माझा खटला - ओरहान पामुक

यावर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार तुर्कस्थानचे लेखक ओरहान पामुक यांना जाहीर झाला. त्यांच्या एका लेखाचे [१] इंग्रजी भाषांतर 'द न्यूयॉर्कर' या साप्ताहिकात प्रसिद्ध झाले. त्याच लेखाच्या मराठी अनुवादाचा हा प्रयत्न -


इस्तंबूलच्या सिसली भागात, जिकडे माझा उभा जन्म गेला आणि माझी आजी ज्या तीनमजली घरात चाळीस वर्षे एकटी राहिली; बरोबर त्या घरासमोरच्या न्यायालयात या शुक्रवारी मी न्यायदेवतेसमोर गुन्हेगार म्हणून उभा राहीन. 'सार्वजनिक स्तरावर तुर्की अस्मितेला काळिमा फासणे' हा माझ्यावर ठेवण्यात आलेला आरोप आहे. फिर्यादी पक्षाचे वकील, मला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व्हावी अशी मागणी करतील. याच कोर्टात याच गुन्ह्याखाली ह्रँट डिंक नावाच्या एका तुर्की-अमेरिकन पत्रकाराला कलम ३०१ अन्वये शिक्षा ठोठावण्यात आली होती; या वस्तुस्थितीची जाणीव मला वास्तविक भेडसावायला हवी. पण तसे होत नाही. मला अजून थोडी आशा आहे. कारण माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला हा ठिसूळ पायावर उभा आहे, अशी माझ्या वकिलाप्रमाणेच माझीही खात्री आहे. त्यामुळे मी तुरुंगात जाईन असे काही मला वाटत नाही.


त्यामुळे माझ्यावरील खटल्याला एवढी प्रसिद्धी मिळालेली पाहून, मला खरं तर थोडंसं संकोचल्यासारखंच होतंय. कारण या शहरातील माझ्या ज्या ज्या मित्रांचा मी सल्ला घेतला, त्यांना कधी ना कधी याहून अधिक कठीण उलटतपासणीच्या दिव्यातून पार पडावे लागले आहे आणि केवळ एका पुस्तकामुळे किंवा काही लिखाणामुळे, अनेक वर्षे चौकश्या आणि खटल्यांचा पाठीमागे लागलेला ससेमिरा आणि तुरुंगवास यात खर्ची घालावी लागली आहेत. अर्थात या देशात; जिथे सैनिक, राजे आणि पोलीसगड्यांचा पदोपदी उदोउदो केला जातो आणि लेखकांना मात्र अनेक वर्षे कोर्टकचेऱ्या आणि तुरुंग यांच्या अग्निदिव्यातून पार पाडल्याशिवाय राजमान्यता मिळत नाही; तिथे माझ्यावर खटला भरण्यात आला यात आश्चर्य ते काय? माझे मित्र जेव्हा हसून "तू आता खराखुरा तुर्की लेखक झालास" असे म्हणतात, तेव्हा त्यांना काय म्हणायचेय हे मला अचूक कळते. परंतु, जेव्हा मी ते मला संकटात टाकणारे विधान केले तेव्हा मला असा 'सन्मान' अपेक्षित नव्हता.


गेल्या फेब्रुवारीत, एका स्विस वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मी "तुर्कस्थानात आतापर्यंत दहा लाख अर्मेनियन्स आणि तीस हजार कुर्दीश लोक मारले गेलेले आहेत", असं विधान केलं होतं. शिवाय, या गोष्टीवर चर्चा करणेदेखील माझ्या देशात निषिद्ध मानलं जातं असं मी पुढे म्हणालो होतो. पहिल्या महायुद्धात, ऑटोमन साम्राज्याविरुद्ध भूमिका घेतल्याचा कांगावा करून कित्येक अर्मेनियन लोकांना देशाबाहेर हाकलण्यात आले होते आणि त्यांच्यापैकी अनेकांना वाटेतच कंठस्नान घालण्यात आले, यावर इतिहासतज्ञांचे दुमत नाही. तुर्कस्थानाचे सरकारी प्रवक्ते मात्र - मरण पावलेल्यांचा आकडा बराच कमी आहे, हे हत्याकांड योजनाबद्ध नसल्याने त्याला वंशनिर्मूलनाचा प्रयत्न (जेनोसाईड) म्हणणे चुकीचे आहे, मारल्या गेलेल्या अर्मेनियनांमध्ये अनेक मुस्लिमदेखील होते या भूमिकेवर ठाम आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये मात्र, सरकारी दडपण झुगारून देऊन इस्तंबूलमधील तीन प्रतिष्ठित विद्यापीठांनी एकत्र येऊन एक शैक्षणिक परिषद भरवली. सरकारला अमान्य असा दृष्टिकोन बाळगणाऱ्या इतिहासतज्ञांना या परिषदेत मज्जाव नव्हता. तेव्हापासून, गेल्या नव्वद वर्षांत या विषयावर जी सार्वजनिक चर्चा झाली नव्हती तिला तोंड फुटले - कलम ३०१ च्या समंधाला भीक न घालता!


ऑटोमन राज्यात अर्मेनियन लोकांवर काय अत्याचार झाले, हे सामान्य तुर्की जनतेला कळू नये म्हणून सरकार जर इतकी दक्षता घेत असेल; तर हा विषयच त्यांच्या दृष्टीने निषिद्ध आहे असे म्हटले तर त्यात वावगे काय? आणि माझ्या उद्गारांनी उठलेला गदारोळ, हा एखाद्या निषिद्ध विषयाला तोंड फोडल्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियेलाच साजेसा होता. अनेक वृत्तपत्रांनी माझ्याविरुद्ध आघाडी उघडली. काही उजव्या गटाच्या स्तंभलेखकांनी (यातले सगळेच मुस्लिम मूलतत्त्ववादी नाहीत) तर माझे तोंड 'कायमचे' बंद करण्यात यावे, इथपर्यंत विधाने करण्याइतपत मजल मारली. जहाल राष्ट्रवादी संघटनांनी माझ्या या देशद्रोही कृत्याचा निषेध करण्यासाठी बैठका घेतल्या आणि माझ्याविरुद्ध आंदोलने केली. सार्वजनिकरीत्या माझ्या पुस्तकांची होळी करण्यात आली. माझ्याच 'स्नो' या कादंबरीच्या 'का' या कथानायकाप्रमाणे, राजकीय मतांपोटी आपल्या आवडत्या शहराला पारखे होण्याचा अनुभव मी घेतला. मला हा वाद वाढवायचा नसल्याने किंवा त्यासंबंधी अधिक काही ऐकायची इच्छा नसल्याने, मी पुढे काहीच बोललो नाही. जणू एका विचित्र प्रकारच्या शरमेने माझा ताबा घेतला होता, आणि मी सामान्य जनतेपासूनच नव्हे तर माझ्या स्वत:च्या शब्दांपासून तोंड चुकवण्याचा प्रयत्न करत होतो. मग एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या पुस्तकांना जाळण्याचा आदेश दिला, सिसलीमध्ये सरकारी वकिलांनी माझ्याविरुद्ध खटला दाखल केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची चर्चा होऊ लागली.


माझे विरोधक फक्त वैयक्तिक द्वेष म्हणून माझ्याविरुद्ध नव्हते. माझ्यावरील खटला हा तुर्कस्थानात आणि बाहेरच्या जगातही चर्चिला जाणार हे मला माहीत होतं. याचं एक कारण म्हणजे, मी असं मानतो की एखाद्या राष्ट्राच्या इतिहासात जी कृष्णकृत्ये घडली आहेत, त्यांची चर्चा केल्यामुळे त्या राष्ट्राच्या अस्मितेला, अभिमानाला उणेपणा येत नाही. असा उणेपणा जर संभवत असेल, तर अशा विषयांवर चर्चाच न होऊ देण्यामुळे. दुसरं म्हणजे, आजच्या घडीला तुर्कस्थानात ऑटोमन साम्राज्यातील अर्मेनियन्सवरील अत्याचारांविषयी चर्चा करण्यास जी मनाई आहे, ती विचार आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे. परिणामी या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येणार नाहीत. मला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणारा पाठिंबा जरी दिलासादायक असला तरी, यामुळे मी आणि माझ्या देशात अंतर पडत चाललंय ही भावना मात्र कधी कधी मला त्रास देत होती.


युरोपियन समुदायात सामील होण्यास जो देश सरकारी धोरणानुसार कटिबद्ध  आहे, त्याच देशात युरोपात ज्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत अशा लेखकाला तुरुंगात का टाकण्यात येते आणि हे सारे नाटक (कॉनरॅड म्हणाला असता तसे) 'अंडर वेस्टर्न आईज' [२] का करण्यात आले, हे सांगणे कठीण आहे. निव्वळ असहिष्णू वृत्ती, अज्ञान किंवा मत्सर यांपोटी हा विरोधाभास जन्मलेला नाही. खरं तर, असे अनेक विरोधाभास (सध्याच्या तुर्कस्थानात) आहेत. माझे जहाल राष्ट्रवादी विरोधक मला जीवे मारण्याच्या धमक्या देत असताना तुर्कस्थानातील लोक सहृदय आहेत, इतर युरोपियनांप्रमाणे ते वंशनिर्मूलनाचा प्रयत्न करणे शक्यच नाही असा समज उरी कवटाळून बसलेल्या या देशाबद्दल मी काय मत बनवावे? एकामागून एका लेखकाला तुरुंगात टाकायचे आणि वर मात्र हितशत्रू तुर्कस्थानाची प्रतिमा जगभरात खोट्या बातम्यांनी कलंकित करीत आहेत, असे म्हणायचे यामागचे तर्कशास्त्र कोणते? तुर्कस्थानातील अल्पसंख्याकांविषयी तयार करण्यात आलेला अहवाल सरकारधार्जिणा नाही, म्हणून एका प्राध्यापकाला ठोठावण्यात आलेली शिक्षा आणि पाच इतर लेखक व पत्रकारांवर कलम ३०१ अन्वये दाखल करण्यात आलेले खटले, याबद्दल मी जेव्हा वाचतो; तेव्हा मला वाटतं की फ्लॉबर्ट आणि नेर्वाल हे पौर्वात्यशास्त्राचे दोन पितामह या घटनांना नक्कीच विचित्र [bizarreries][३] ठरवून मोकळे झाले असते.   


अर्थात, हे विचित्र नाट्य केवळ तुर्कस्थानापुरतेच सीमित नाही; तर ही जागतिक स्तरावरची नवीन वस्तुस्थिती आहे असं मला वाटतं. तिची तोंडओळख आपल्याला नुकतीच होतेय खरी, पण यावर उपाय काय याचाही विचार आपल्याला केला पाहिजे. गेल्या काही वर्षांत, भारत आणि चीनने लक्षणीय आर्थिक प्रगती साधली आहे. या दोन्ही देशांत मध्यमवर्गाचा झपाट्याने विस्तार होतो आहे. या नवमध्यमवर्गाच्या खाजगी जीवनाचे प्रतिबिंब नवीन कादंबऱ्यांतून पडल्याशिवाय, त्याचे खरे स्वरूप कसे आहे हे कळणे अवघड आहे. पण, माझ्या देशातील दिवसेंदिवस अधिकाधिक पाश्चात्य होत चाललेल्या प्रतिष्ठित आणि मध्यमवर्गाप्रमाणे, या वर्गालाही दोन वरवर अगदी भिन्न भासणाऱ्या कृतींनी त्यांच्या नव्यानेच प्राप्त झालेल्या संपत्तीचे आणि सामर्थ्याचे समर्थन करावे लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना यासाठी पाश्चात्य आचार-विचार, लकबी अंगिकाराव्या लागतील. अभिजन वर्ग पाश्चात्य संस्कृतीकडे झुकताना पाहून इतर देशवासीयही त्याच मार्गाकडे वळू लागतील (महाजनो येन गता: स पंथ:); आणि त्यांचे या कामी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या वर्गाला मग आपल्याकडे घ्यावी लागेल. पण जेव्हा इतर लोक त्यांच्यावर आपल्या परंपरेला त्याज्य मानण्याचा आरोप करतील, तेव्हा त्यांना अतिजहाल आणि जाज्वल्य स्वरूपाचा राष्ट्रवाद, एखाद्या हत्यारासारखा परजून प्रत्युत्तर द्यावे लागेल. फ्लॉबर्टसारख्या बाहेरून आलेल्या निरीक्षकाला हे सारे केवळ 'विचित्र' वाटेल, पण हा सारे विवाद म्हणजे राजकीय आणि आर्थिक सुधारणा आणि त्यापोटी जन्म घेणाऱ्या सांस्कृतिक आकांक्षांतील संघर्ष आहेत. एकीकडे जागतिक अर्थव्यवस्थेत सामील व्हायची धडपड आहे, तर दुसरीकडे लोकशाही आणि विचारस्वातंत्र्य यांना केवळ पाश्चात्यांनी लावलेले जावईशोध ठरवणारा आक्रमक राष्ट्रवाद आहे.


पौर्वात्य जगात नव्याने उदयाला आलेल्या या निष्ठुर सत्ताधाऱ्यांच्या खासगी जीवनाचे चित्रण सर्वप्रथम करणाऱ्यांमध्ये व्ही. एस. नायपॉल यांचे नाव घ्यावे लागेल. गेल्या वर्षी मे महिन्यात मी थोर जपानी लेखक केन्झाबुरो वी यांना भेटलो होतो. जपानी सैन्याने (दुसऱ्या महायुद्धावेळी) चीन आणि कोरियात जी नृशंस कृत्ये केली त्यांची खुलेआम चर्चा व्हावी, असे विधान केल्यामुळे त्यांच्यावरही जपानी जहालमतवाद्यांनी हल्लाबोल केला होता. चेचेन आणि इतर अल्पसंख्याकांविरुद्ध रशियन शासनाने स्वीकारलेले असहिष्णू धोरण, भारतात हिंदू राष्ट्रवाद्यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर केलेले हल्ले आणि चीनने फारसा कानोसा लागू न देता, चालवलेला युघुर[४] लोकांचा पद्धतशीर वंशसंहार; या साऱ्यांना याच विरोधाभासांतून खतपाणी मिळते आहे.


उद्याचे लेखक या नव्या सत्ताधारी वर्गाच्या खासगी जीवनाचे चित्रण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशावेळी त्यांच्या देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर असणाऱ्या निर्बंधांविरुद्ध त्यांना पाश्चिमात्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळेल अशी त्यांची नक्कीच अपेक्षा असेल. पण सध्या इराक युद्धाबद्दल उजेडात येणारी असत्ये आणि सी.आय.ए. चे छुपे तुरुंग यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांची प्रतिमा तुर्कस्थानात आणि इतरत्र इतकी मलिन झाले आहे, की माझ्यासारख्यांना पाश्चात्य लोकशाहीचे समर्थन करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.


संदर्भ/दुवे:


[१] मूळ इंग्रजी लेख
[२] अंडर वेस्टर्न आईज या कादंबरीविषयी अधिक माहिती
[३] फ्लॉबर्ट व bizarreries
[४] युघुर मानवी हक्क संघटना


* याच लेखकाचा 'द पामुक अपार्टमेंट्स' म्हणून लेख या दुव्यावर वाचता येईल.