शुभ दीपावली - चला किल्ला करुया.

मित्रांनो, आपणां सर्वांना दीपावली अभिष्ट चिंतन !


दसरा झाला आणि दिवाळीची तयारी सुरू झली. नवीन कपडे खरेदी झाली, फराळाचे पदार्थ करून झाले, घराला दिव्याच्या माळा लावल्या; हि सर्व तयारी करत असताना गप्पा-गप्पां मधे शाळेतले दिवस आठवले - आणि दिवाळीचा किल्ला. खरंच काय धम्माल यायची. आज खूप वर्षांनी किल्ला करायची इच्छा झाली. या वर्षी किल्ला करायचा होता तो अपार्टमॆंट मधल्या चिमूकल्यांसाठी. सर्वच चिमूकली २-५ वयोगटातली, आणि एक-दोन दादा-ताई ७-८ वर्षांचे. म्हणजे किल्ला, गड, डोंगर, खंदक, युध्ध सारे काही नवीनच यांना. ह्यांचे विश्व म्हणजे 'ससा-कासवाची शर्यत', 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक', 'सिंडरेला ची गोष्ट' आणि छोट्या छोट्या 'नर्स्ररी ह्राईम्स'.
आमच्या लहानपणीचा किल्ला म्हणजे शिवाजी महाराज - मावळे, भारत-पाकिस्तान अथवा भारत-चिन युद्ध. इतिहासातील भीन्न कालातील गोष्टी एकाच डोंगरावर एकाच वेळी; हायस्कूलात गेल्यावर थोडी फार प्रगती म्हणजे चित्रांत बघून राजगड, तोरणा, प्रतापगड यांची प्रतिक्रुति, मग देखावेही वढले, विमानतळ, रेल्वे, ईलेक्ट्रीक सिग्नल ई. ... या सर्व पार्श्वभूमीवर  २ ते ५ मधल्या मुलांसाठीचा किल्ला करणे हे एक चॅलेंज होते. कल्पना सुचली की सर्वांना समजेल असा एक फॅंटसी किल्ला करायचा. 
हिरोजी इंदुलकरांना नमस्कार करुन सुरुवात केली. हा किल्ला कसा असेल, किती मोठा असेल, कुठे करायचा, कशाचा करायचा हे सगळे विचार सुरू झाले. अपार्टमेंट मधे मोकळी जागा नव्हती,  मोठाल्ले दगड माती आणणेही शक्य नव्हते. घराच्या गॅलरीत किल्ला करणे सर्व द्रूष्टीनी सोपे जाणार होते. फॅंटसी किल्ला करायचा ठरल्याने एक फायदा म्हणजे कल्पनाशक्तीला भरपूर वाव असतो.
एका बेटावरील डोंगरावर फॅंटसी किल्ला  करायचा असे ठरले. डोंगराचा विस्तार, उंची त्या वरील किल्ल्याची उंची, देखावे हे सारे विचारात घेतले. महासागराचा आभास करण्यसाठी निळ्या रंगाचे प्लॅस्टीक शीट वापरले तर डोंगराचा आभास करण्यासाठी गोणपाटाचा उपयोग केला.


पॅकिंग च्या फोमचे निरनिराळ्या उंचीचे तुकडे घेऊन त्याची पिरॅमिड सारखी रचना करून ते ऊभे केले.



मध्यभागी एक मोठा चौकोनी खोका ठेवला व ह्या सर्वांवर गोणपाटाचे कापड अंथ्ररुन डोंगर-दरयांचा आभास केला. गोणपाटाच्या चुण्याना टाचण्या पिना लाऊन डोंगरच्या सोंडा केल्या.


   


गोणपाटाचा व मातीचा रंग सारखाच असल्यामुळे डोंगराचा आभास करण्यात अडचण आली नाही. 



गोणपाटावर डिंकाचा फवारा मारुन मातीचा शिडकावा केला. पाहता पाहता हुबेहुब डोंगर दिसु लागले. परंतु या अश्या खोट्या डोंगरावर हळिव पेरुन उगवणे शक्य नव्हते. मग एक प्रयत्न असा केला की हिरव्या रंगाचा ऑइल पेंट लावला. परंतु तो प्रयोग इतका यशस्वी झाला नाही. मग हिरव्या रंगाच्या रांगोळीच्या अलगद शिडकाव्याने हिरवळीचा भास केला. हा प्रयोग एकदम छान जमला, आणि कल्पना आली की पांढरी रांगोळी वापरून मस्त स्नो फ़ॉल करता येईल.
किल्याच्या भिंती करण्यासाठी थर्माकोल शिट चा वापर केला. गुगल वरुन स्टोन वॉल आणि ब्रिक वॉल ची इमेजेस मिळवून बुरुज आणि तटबंदी साठी प्रींटाउट काढले. हे प्रींटाउट थर्माकोल च्या दोनही बाजूंना चिटकवून तटबंदी तयार केली. बुरूज आणि किल्ल्यासाठी उदबत्ती चे पुडे, पेपर टॉवेल चे रोल, नाणी पॅक करायचे रोल ई. चा वापर केला. तयार झालेले बुरूज आणि तटबंदी गडावर लावून हद्द ठरवली - प्रवेश द्वार केले.


   


 


किल्ला (बाले किल्ला) साठी सिन्डरेला च्या कॅसल सारखे स्ट्र्क्ट्चर प्रमाण म्हणून धरले. वेगवेगळ्या उंचीचे आणि व्यासाचे बुरूज उभे केले आणि त्यावर शंक्वाकृती छपरे लावली.




चिमूकल्यांसाठीचा किल्ला ! मग देखावे म्हणून 'ससा-कासवची शर्यत', 'ऒल्ड-मॅक डोनल्ड चे फ़ार्म', 'हम्टी-डम्प्टी सॅट ऑन अ वॉल', 'जॅक ऍन्ड जिल', 'चल रे भोपळ्या...', सिम्बा-नाला आणि जंगलातले प्राणी हे सारे काही आले. डोंगराच्या दोन्ही बाजूला निळे कापड लावून समुद्र केला. वाळू पसरवून चौपाटी केली. दादानी विमानं ठेवून विमान तळ केले.  पहाता पहाता दिवाळी चा किल्ला तयार होऊ लागला.  किल्ला केल्यामुळे  'किल्ला' म्हणजे काय हे मुलाना थोडे फ़ार समजले.





 


किल्ला पाहून आजोबा म्हणले, "अरे तो ससा पडला आहे. त्याला निट उभा ठेव." तर मनू म्हणला "नाही आबा! तो झोप्ला आहे, आणि काशव जिंक्ले."