नुक्तेच गवसले आहे...

रोहिणीताईंची क्षमा मागून....

नुक्तेच गवसले आहे

सालं सिटी लाईफ काय लाईफ आहे...
म्हणून गेलो खेड्यात एकदा धाडदिशी
एसेमेस वाचतावाचता बळीराजा म्हणाला
कल्यानला चालू हैत म्हनं डान्सबार आजूनबी
कित्त्ती छान, शांत खेडेगाव हो तुमचं
असलं म्हणणार होतो बरंच मनाशी जुळवून
'कजरारे..' च्या ठेक्यावर मिरवणुकीत नाचणाऱ्या मुलीसुद्धा आल्या नसत्या तर


भाकरी, मिर्चीचा खर्डा, भरल्या वांग्याची भाजी, घट्टसर दही
असलं मिळेल का रे काही, विचारलं ढाब्यावर
काय भिकेचे ढवाळे सायेब तुमाला
आवं आस्लं कोन खातंय का आता
चिकन हंडी बनवतो बगा पायजे तर आर्द्या तासात...


पाण्यात पाय सोडून बसावं म्हटलं गार
काळसर फेसाळ तवंग शेजारच्याच एमायडीसीचा दिसेपर्यंत
बूट काडू नका सायेब,
कालंच राऊन्डप फवारलंय मातीवर, पाय भाजत्याल...
वडाच्या हिरव्या सावलीचं कवतुक ओसरलेलं माझं
गाडीवरच्या कावळ्याच्या शिटांची नक्षी दिसतादिसताच


तिसऱ्या पेगला हिरचंदानी जवळ येत म्हणाला
तुज्या लालबागच्या बाबात काय दम नाय साला
आमच्या लोखंडवालामदला बाबाच ज्यादा पावरबाज
बिपाशा व्हती दर्शनाला परवा बॉस...
तूबी ये कवातर, वळख करून देल आपन साला
काय व्हाईट करून टाकायचे असतील तर तेपन बोलू बाबाले


सगळेच बसू रे एकदा फॅमिलीसकट
एकदा म्हणालो मी भावविभोर होऊन जरासा
पंध्रा वर्षांची दोस्ती आपली नाहीतर साली नुस्ती दारू पिण्यापुरतीच
'होय, आणि माझ्याकडंही काही इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन आहेत तुझ्यासाठी...' एक म्हणाला
'सहीही हवी आहे रे तुझी जरा गॅरंटर म्हणून...' दुसरा.


मग जरासा बसलो एकटाच
स्वतःचेच दोन जरासंधी भाग न्याहाळत
हरवल्याचा गहिवर माझा
आतून पोकळ होत चाललेला
सुरक्षित, संपन्न, सवयीचे सगळे माझे
आयुष्यच जसे पुन्हा गवसलेले...