अज्ञान

 इथे असलेल्या कवितेवरून आलेली असह्य ढासउबळ


अज्ञान


माझी दृष्टी क्षीण होईल तेंव्हाच
तू अधिक सुंदर दिसायला लागशील,
माझी दृष्टी जेंव्हा चांगली होती
तेंव्हाच मी तुला म्हणालो होतो बघ...
(तू फेकलेले लाटणे
कसल्या चपळाईने चुकवायचो मी तेंव्हा...)

कानात आता कापसाचे बोळे कशाला
माझ्या श्रवणयंत्राच्या बॅटरीबरोबरच
तुझा राक्षसी तानाही आता दुबळ्या झाल्यात (थँक्स गॉड!)
गुणगुण तेंव्हाच वाढते कानातली
बीपीची गोळी मी विसरतो घ्यायची जेंव्हा...


अंगावर जेंव्हा आले शहारे,
तू म्हणालीस, माझ्या नजरेचाच स्पर्श ना रे?
व्हायरल फ्लू, डेंग्यू तर नाही?
कालपासून कणकण वाटत्येयच नाही तर...


पार्कात बसलो होतो लग्नाआधी,
म्हणालीस 'लुक, डोंट टच', आठवते का?
'टच, डोंट लुक' म्हणतेस आता तुझ्या अमृतांजनी आवाजात
कशाला विषाची परीक्षा बघा पण?


'दोघांनाही चालतील याच गोळ्या' डॉक्टर म्हणाला परवा
शेकायची पिशवीही एकच आपली
कवळी मात्र मागू नको हो माझी
तुझ्यामाझ्या अद्वैताचे प्रतिक
आहेच एकच बाटली आपली
इसबगोलची....