किती मुखवटे, किती चेहरे
किती खोटे, किती खरे
प्रयत्न केला शोधायचा जर
भीषण सत्य येईल समोर
त्या सत्याला सामोरं कधी जाता येईल का?
रोज भेटणारे, बेगडी हसणारे
भेटल्यावर ओढून ताणून प्रेम दाखवणारे
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
मोजण्यासाठी काही परिमाण आहे का?
कुणाचा जीव तुटतो आपल्यासाठी
कोण हळहळतो आपल्या दु:खासाठी
खोटा कळवळा कोण दाखवतो
संकट येता कोण पाठ फ़िरवतो
कधी खरं खरं आपल्याला कळेल का?
कशाला हवेत हे जमाखर्च
कशाला हवेत हे तर्क कुतर्क
समोर येईल त्याला म्हणावा आपला
बाकी सोडून द्यावा देवावर हवाला
असं काहीसं करता येईल का?
नाही देता आला पैसा जरी
द्यावा निर्भेळ आनंद परी
जीवन आपलं अमूल्य समजून
फुलवत जावं हास्य पसरुन
असं हसणारं फुल कधी बनता येईल का?
जयश्री