जावे त्यांच्या वंशा....

           पुणे-मुंबईत रोज गाडीवरून, लोकलमधून प्रवास करणाऱ्या,नोकरी करून, घर संसार सांभाळूनही नीटनेटके राहण्यार्या सर्व स्त्रियांना माझा साष्टांग नमस्कार! मी मुंबईला २ वर्षे राहिले आणि हे सर्व पाहिलेही आहे.मग आता अचानक हा विषय कसा काय?तर त्याचं असं झालं.....
           गेले काही दिवस माझ्या शेजारणी मला म्हणत होत्या 'अगं, किती साधी आहे तुझी हेअरस्टाईल? कधीही आपले बांधलेले असतात. जरा बदल कर आता.' ही गोष्ट काही मी पहील्य़ांदा ऎकली नव्हती. गेले २५ वर्षे मी बरीच बदलले असले तरी केस कापण्याची माझी हिंमत झाली नव्हती. घरात आईबाबांचे 'मुलींचे केस मोठेच असले पाहिजेत' हे विचार पक्के असल्यामुळे आणि आनुवंशिक देणगीमुळे माझे केस 'खूप लांब, दाट आणि काळे' या प्रकारात मोडत. मोठे झाल्यावर, हट्ट करून पाहिला की मला केस कापायचे आहेत. यावर 'नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय करायचे ते कर' असे उत्तर मिळे. आणि आमचे नशीब असे की २२ वर्षे हे उत्तर ऎकल्यावर, नवराही असा मिळाला की त्याने आधीच सांगितले की मला तुझे केस खूप आवडतात त्यामुळे कापण्याचा प्रश्न कायमचाच मिटला. आता दोष तरी कुणाला देणार? आमचा प्रेम-विवाह. आता एव्हढी प्रस्तावना जरा जास्तच आहे.पण जित्याची खोड....              

        थोड्यादिवसांपूर्वी आमचे हे ३-४ आठवड्यांसाठी बाहेरगावी गेले. मग काय, रिकामं डोकं. मी खरंच केस कापायचे का यावर विचार करायला लागले. इंटरनेट वर बरीचशी चित्रे पाहिली विविध केशरचनांची.माझ्या त्या सर्व मैत्रिणींनी आपले सल्ले दिलेच.चेहऱ्याला काय शोभून दिसेल हे पाहिले.ते तरी सोपे आहे का, माझा चेहरा म्हणजे गोलमटोल.मग शेवटी मी एक केशरचना ठरवली आणि 'हे' घरी परत येणार त्या दिवशी सकाळी सलूनमध्ये गेले. तिथेही मी ज्या मुलीकडून केस कापण्यास बसले, तिलाही विचारले की मला काय चांगले दिसेल.
               मनाचा धीर करून मी डोळे मिटले आणि माझ्या केसाला कात्री लागली. ३० मिनिटांनी, मला त्या मुलीने विचारले 'कसा वाटत आहे 'कट'? मला तरी तो आवडला होता. ती म्हणाली २० डॉलर. मी गोंधळून तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली 'झाले'. तिने फक्त केस कापण्य़ाचे काम केले होते. ते सरळ करणे, 'सेट' करणे ही कामे वेगळी होती. त्यासाठी २५ डॉलर!!! मी नकार देऊन घरी परत आले आणि घरी आल्यावर कळले की माझे केस भुतासारखे झाले होते,फुगले होते. नाईलाजाने मी परत सलूनमध्ये गेले आणि अजून २५ डॉलर देऊन केस सरळ करून आले. आता जरा ते ठीक दिसत होते. मी घाईघाईने 'यांना' आणण्यास विमानतळावर गेले.खूप दिवसांनी भेटण्य़ाचा आनंद वेगळाच असतो ना?आणि त्यातही माझ्या नवीन 'अवताराबद्दल' काय ऎकायला मिळते याची उत्सुकता होतीच.आणि मला तो हेअरकट आवडल्याचा इशारा दूरूनच मिळाला. :-)) मला एकदम छान वाटत होते. सकाळपासून सगळा वेळ सलूनमध्येच गेल्यामुळे, जमेल तशी घराची आवरा-आवर करून ठेवली होती. पण स्वैपाकास काही वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्या रात्रीचे जेवण बाहेरच. पण खूप दिवसांनी भेटल्याने 'या'नीही फारसा बाऊ गेला नाही.

             पण खरी गंमत दुसऱ्या दिवशी सुरू झाली. केस बांधले की वाकडे होतील म्हणून तसेच मोकळे सोडले होते. सकाळचे जेवण कसेबसे उरकले पण रात्री एक कमेंट मिळालीच. 'बाकी सगळं ठीक आहे, पण जेवताना केस तेव्हढे खाऊ नका.' :-( मी तोंडावर येणाऱ्या केसांना बाजूला सारत जेवण उरकले. अहॊ प्रेयसीचे गालांना स्पर्श करीत भुरभुरणारे केस पाहण्यात आनंद मानणारे फक्त सिनेमातच, संसारात कुठे? दोन दिवसांत त्या मोकळ्या केसांनी काय-काय प्रकार केले काय सांगू? किराणा मालाच्या पिशव्या दोन्ही हातात घेऊन चालताना वारा आला तर आपण फक्त प्रार्थना करू शकतो की केस डोळ्यावर येऊ नयेत आणि जरी आले तरी रस्ता ओलांडताना एखादी गाडी जोरात येऊ नये.ऑफिसात काम करताना, जेवताना,मीटिंगमध्ये,भांडी घासताना,कणीक मळताना,घरात जिकडे-तिकडे मला केसच दिसू लागले.आणि बाकीच्या बायकांना बोलताना आपल्या केसांशी खेळ करताना मी पाहिलेले आहे स्वतः: करताना ते मुळीच विलोभनीय वाटत नव्हते. तरीही मी दिलेले ५० डॉलर वसूल करणार होते, आताशी पहिले २ दिवस संपले होते.

             माझ्या या प्रयोगातील महत्त्वाची चाचणी तर अजून बाकीच होती. दिवस ३- मी केस धुतले!!!! एरवी पण एवढा त्रास न देणारे केस आता हट्टी झाले होते. प्रत्येक केस मन मानेल तसा भटकत होता. पुन्हा एकदा ते फुगले होते. डोक्याचं घरटं झालं होतं. कामावर जाणं तर गरजेचं होतं. मी वैतागाने ओले केस बांधून ऑफिसला गेले.संध्याकाळी नवरोजींना पटवून एका स्टोअरमध्ये घेऊन गेले. मी त्या मुलीने केस कसे 'सेट' केले हे पाहिले होते. तसेच करण्यासाठी मला एक गोल कंगवा,हेअरड्रायर, स्ट्रेटनर, केस सरळ व्हावे म्हणून एक कसलंस सोल्यूशन घ्यायचं होतं. शिवाय टिप्स द्यायला मैत्रिणी आहेतच. हे सगळं सामान किती रुपयांचं याची तर आठवण पण नकॊ. घरी आल्यावर पुन्हा एकदा स्वैपाकास सुट्टी देऊन केसांचा काय तो आजच निकाल लावायचा या निर्धाराने मी आरशासमोर गेले.

             पाणी, सोल्यूशन लावून हळूहळू मी हेअरड्रायर, स्ट्रेटनर( केसांची इस्त्री)ने केसांना वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण माझे दोन हात मला कमीच पडत होते. वैतागाने यांना मी हेअरड्रायर हातात धरायला सांगितला. माझं नशीब चांगले होते की माझी अवस्था केविलवाणी होती माहीत नाही पण मला चक्क होकार मिळाला. मग चार हात आणि ३ शस्त्रे यांनी २ तास माझ्या केसांशी लढाई केली. आणि चक्क आमची 'जीत' झाली. :-)) मला हवा तसा आकार केसांना आला होता. आजच्या दिवसासाठी तरी माझी या त्रासातून सुटका झाली होती. आता माझा हा उत्साह किती दिवस टिकणार हे माहीत नाही. पण रोज रोज असे केसांचे आणि नवऱ्याच्या पोटाचे हाल मला परवडणार नव्हते. माझा प्रयोग माझ्या खिशालाही चांगलाच महाग पडला होता. मी आता मूळपदावर येत आहे. 'लवकरात लवकर केस वाढू दे. पुन्हा कध्धी, कध्धी कापणार नाही!!' हीच देवाकडे प्रार्थना.

              तर मंडळी,तुम्हाला कुणी सुंदर मुलगी, तिचे सुंदर केस सांभाळत आरामात फिरताना दिसली तर (मनातल्या मनात) नक्की कौतुक करा. त्या कष्टांची मला तरी आता चांगलीच कल्पना आली आहे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे.

-अनामिका.