सांस्कृतिक राजधानीची पडझड ....

'लोकसत्ता' चा लेख चर्चेच्या प्रस्तावासाठी ठेवत आहे.


 


मुंबईनंतर पुणे हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महानगर म्हणून ओळखले जाते. राज्याची सांस्कृतिक राजधानी किंवा विद्येचे माहेरघर म्हणून पुणे आजही प्रसिद्ध आहे. दहा-पंधरा वर्षांत पुण्याचा विकास झपाट्याने झाला. पुण्यात उभ्या राहिलेल्या व नावाजलेल्या शिक्षणसंस्थांनी देशभरातील विद्यार्थ्यांना आकषिर्त केले. एक औद्योगिक शहर म्हणून पुण्याने लौकिक प्राप्त केला आहेच. आयटी क्षेत्रात पुण्याने विलक्षण झेप घेतली. अन्य शहरांच्या तुलनेत पुणे अधिक समृद्ध झाले.


एक्सप्रेस-वेमुळे मुंबई अधिक जवळ आल्याने कारखाने, उद्योग, व्यापारी कार्यालये यांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. पुणे ज्या वेगाने वाढले, त्या तुलनेने पुण्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. पुण्याची वाढती लोकसंख्या, सार्वजनिक वाहतूक, खाजगी वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, अपुरी पोलिस यंत्रणा आणि कायदा-सुव्यवस्था, अपुऱ्या नागरी सुविधा या साऱ्या बाबींकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही आणि सरकारची इच्छाशक्तीही दिसत नाही.


मुंबईपाठोपाठ परप्रांतीयांचा लोंढा पुण्याकडे वळू लागला आणि झोपडपट्ट्यांचा विळखाही वाढू लागला. कोंढवा, कात्रज, हडपसर, कोथरूड, पिंपरी-चिंचवडच नव्हे तर तळेगावपर्यंत निवासी वसाहती उभ्या राहिल्या. विकासाबरोबरच पुणे आणि पुणेकरांपुढे नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. खून, दरोडे, चोऱ्या आणि खंडण्या या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथे भाजपचे शहर अध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्येनंतर गुन्हेगारी आणि राजकारण या मुद्द्याकडे पुन्हा गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे.


लांडगे हे काही गुन्हेगार नव्हते. तीन वेळा ते महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते विरोधी पक्षनेते होते. भाजप गटाचे नेते होते. आपल्या घराबाहेर चालू असलेली भांडणे सोडविण्यासाठी ते बाहेर आले आणि त्यांच्याच डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात आणखी दोघांचा खून झाला. हल्लेखोरांनी तलवारींनी वार केले. या तलवारी अचानक कुठून आल्या, हे अद्याप गूढच आहे.


दोन घराण्यांच्या वैमनस्यातून लांडगे यांची हत्या झाली असेलही; पण महापालिका निवडणूक तीन महिन्यांवर आली असताना त्यांची हत्या होण्यामागे काही राजकीय काळेंबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांच्या डायरीत खतरकनाक गुंड म्हणून नोंद असलेल्या संदीप मोहोळची कोथरूड येथे पौंड फाट्याजवळ गेल्या महिन्यात गोळ्या घालून हत्या झाली होती. मोहोळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता आणि कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदावर त्याची नेमणूक झाली होती.


मध्यंतरी शिवसेनेचे माजी शहर अध्यक्ष रामभाऊ पारिख यांच्यावर ऍसिड हल्ला झाला; पण ते बचावले. त्यापूवीर् भाजपचे नगरसेवक सतीश मिसाळ यांची गँगवॉरमधून हत्या झाली; तसेच पिंपरी-चिंचवडचे अनिल हेगडे व संजय काळे या दोघा नगरसेवकांच्या हत्या झाल्या. राजकारणातील व सार्वजनिक जीवनातील हत्यांची मालिका बंद कधी होणार याचे उत्तर पुण्याच्या पोलिस कमिशनर यांनी द्यायचे आहे. व्होट बँक सांभाळण्यासाठी पुढारी लोक गुंडांची उघडपणे मदत घेतात. गुंडांना संघटनेत पदे देऊन त्यांना प्रतिष्ठा देण्यापर्यंत काही राजकीय पक्षांची मजल गेली आहे. तुम्ही काही करा; आम्ही तुमचे बघून घेतो, अशी राजकारणात वृत्ती फोफावू लागली आहे.


पोलिसांच्या दप्तरी खून, खुनाचे प्रयत्न किंवा खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले गुन्हेगार शुभ्र कपडे आणि पांढरे बूट घालून कोणाच्या आशीर्वादाने एअर कंडिशन्ड मोटारीतून सर्रास फिरत असतात हे पोलिसांना ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल?


पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर पोलिसांची संख्या वाढलेली नाही ही गोष्ट खरी आहे; पण पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही, हे तेवढेच सत्य आहे. दिवसाढवळ्या गजबजलेल्या रस्त्यांवर गोळ्या घालून किंवा लोकप्रतिनिधींचा त्यांच्याच घराबाहेर खून करण्याचे धाडस तरी कसे होते?


पुण्यात बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे चालू आहेत, फ्लॅट आणि बंगले विकत आणि भाड्याने उपलब्ध आहेत. गुन्हेगारांना लपायला पुणे सोयीस्कर बनले आहे. मुंबई व दिल्ली पोलिसांपासून बचाव करण्यासाठी पुणे सुरक्षित वाटू लागले आहे. आथिर्क देवघेवीतून सुपारी देण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. आपल्या मार्गात आड येणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी टोळ्यांचा उपयोग केला जात आहे.


पोलिसांना याबाबतची माहिती मिळत नसेल तर ते फार मोठे अपयश आहे आणि माहिती मिळूनही राजकीय दडपणांमुळे कारवाई होत नसेल तर ते आणखी गंभीर आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि मालकमंत्री अशा अजित पवार-कलमाडी यांच्या वर्चस्वाच्या लढाईपेक्षा पुण्याची शांतता महत्त्वाची आहे.


काळाबरोबरच पुण्याची ओळख पुसली जाईल काय? ही सांस्कृतिक राजधानी भग्न खिंडाराच्या रूपात आपल्या येण्याऱ्या पिढ्यांना दिसेल काय?