यॉर्कशायर रिपर

एखाद्या मुलीला किंवा महिलेला इमारतीच्या जिन्यांत एकटीला गांठून तिच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करून तिला लुटण्याच्या वाढत्या प्रकारांनी अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगांव भागांत गेला महिनाभर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या महिलेची पर्स, मोबाईल, गळ्यातील सांखळी अशा गोष्टींच्या चोरीसाठी विकास टाक नांवाचा १९ वर्षाचा  पोरगा हे निर्घृण कृत्य  करीत होता असे आता उघडकीस आले आहे. हांतातील हातोड्याने नेमका डोक्यावर नाजुक जागी घणाघात करून महिलांना एका फटक्यात जबर जखमी करण्याच्या तंत्राचा "विकास" त्याने केला होता. अशाच प्रकारे हल्ला करून पळ कांढतांना तो पकडला गेला. सुदैवाने त्याने जखमी केलेल्या महिलांना वेळेवर योग्य वैद्यकीय सहाय्य मिळाले व निदान त्यांचे प्राण तरी वांचले.


या घटनांवरून रामन राघव या क्रूरकर्म्याची आठवण झाली. कांही वर्षापूर्वी १९६८ साली त्याने खुनी हल्ल्यांचे सत्र सुरू करून मुंबईत नुसता धुमाकूळ घातला होता. रात्री अपरात्रीच्या वेळी एखाद्या निर्जन जागी झोपलेल्या माणसाला गांठून त्याच्या डोक्याचा पार चेंदामेंदा करून त्याला ठार करण्याचा सपाटा त्याने लावला होता. या क्रूर कामासाठी त्याने एक बोथट हत्यार बनवून घेतले होते. त्याला तो कनपटी म्हणायचा. त्याच्या हल्ल्याला बळी पडलेले बहुतेक लोक गोरगरीब असल्यामुळे चोरी हा त्यामागील उद्देश असणे शक्य नव्हते. तो सर्वस्वी अनोळखी लोकांची हत्या करीत असल्यामुळे वैयक्तिक वैमनस्याचा प्रश्नसुद्धा उद्भवत नव्हता व संशयाची सुई त्यावरून त्याचेकडे वळत नव्हती. पोलिसांना कसलाच सुगावा लागत नसल्यामुळे तो बरेच दिवस सांपडत नव्हता. शेवटी गस्तीवरील शिपायाकडून पकडले गेल्यावर आणि भरपूर चिकन खाऊ घातल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला, पण आपण ही अघोरी कृत्ये वरून येणाऱ्या (प्रत्यक्ष परमेश्वराच्या) आदेशावरून करीत आहोत असे ठणकावून सांगितले. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे न्यायालयीन चौकशीत आढळल्याने त्याला उपचारासाठी मनोरुग्णालयात पाठवले गेले. तिथेच त्याचा अंत झाला. रामन राघवला अटक होण्यापूर्वी त्याचेसंबंधी अनेक अफवांचे पीक आले होते. कोणी म्हणे तो मनांत येईल तेंव्हा मिस्टर एक्ससारखा अदृष्य होऊन जातो तर कोणी म्हणे तो उंदीर मांजर, कावळा चिमणी असे कोणी तरी बनून निसटतो.


अनेकांनी त्याला 'जॅक द रिपर'चा भारतीय अवतार ठरवले होते. या जॅक द रिपरने १८८८ साली लंड़नमध्ये पांच स्त्रियांचे खून केले होते असे मानले जाते. या पाचही बायका वाईट चालीच्या समजल्या जायच्या. त्यांचे खून रात्रीच्या काळोखांत शहराच्या सुनसान भागांत पण सार्वजनिक जागांवर करण्यात आले. आपल्या सावजांवर अचानक हल्ला करून ठार करतांना त्यांचेवर अत्यंत त्वेषाने वार करून त्यांच्या मृत देहाची अमानुषपणे चिरफाड केलेली होती. कुणाच्या शरीरातून तिचे हृदय, कुणाचे मूत्रपिंड तर कुणाचे गर्भाशय काढून नेले होते. हे सारे झटपट आटोपून झाल्यावर कसलाही पुरावा मागे न ठेवता, कुणालाही कळू न देता तो अत्यंत शिताफीने तेथून पसार व्हायचा. एका मागोमाग झालेल्या खुनांच्या या रहस्यमय मालिकेमुळे एकाच व्यक्तीने ते सारे केले असावेत असा अंदाज केला गेला. कदाचित प्रसार माध्यमातील कुणी तरी 'जॅक द रिपर' हे नांव त्या अज्ञात इसमाला ठेवले असेल. पण तो माणूस प्रत्यक्षात कधीच पोलिसांच्या हांती लागला नाही. त्यामुळे या खुनांचे गुपित तसेच गुलदस्त्यांत पडून राहिले. कदाचित हे खून वेगवेगळ्या लोकांनी केले असणेही शक्य आहे, त्याचप्रमाणे एकाच जॅकने इतर कांही लोकांचे खून वेगळ्या पद्धतीने केले असणेही अशक्य नाही.


या खुनांना जगभर अमाप प्रसिद्धी मिळाली, त्यावर आधारित शेकडो पुस्तके लिहिली गेली, अजून लिहिली जात आहेत, कथा, कादंबऱ्या, नाटके, सिनेमे निघाले, रिपरालॉजिस्ट या नांवाची गुन्हेगारतज्ञांची एक शाखासुद्धा निर्माण झाली. याहू किंवा गूगल वर 'जॅक द रिपर' हे शब्द टाकले तर दहा वीस लाख तरी संदर्भ सांपडतात. 'जॅक द स्ट्रिपर' यासारखे त्याचे अनुकरण करणारे अनेक महाभाग जन्माला आले. त्यातल्याच एकाला 'यॉर्कशायर जॅक' हे नांव दिले गेले. 'पीटर सटक्लिफ' नांवाची ही व्यक्ती लीड्स ब्रॅडफोर्ड भागांत १९७५ ते १९८१ पर्यंत वावरत होती व आपली दुष्कृत्ये करीत होती. लीड्स येथे होऊन गेलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नामावळीत आपलेही नांव त्याने (काळ्या कुट्ट अक्षरांनी) ठळकपणे लिहून ठेवले आहे. हुवे बदनाम तो क्या नाम न हुवा? लीड्सच्या वास्तव्यात मीही त्याचे नांव ऐकले व त्याच्याबद्दलची थोडी माहिती कांनावर आली.


एका आडदांड आणि रंगेल बापाचा पण लहानपणी अगदीच शामळू वाटणारा हा लाजरा बुजरा मुलगा इतर चार मुलांसारखा शाळेत गेला, पण इतरांशी फटकून एकटाच वेगळा राही. इतर मुलेसुद्धा नेहमी त्याची टिंगल टवाळी करीत. अभ्यासांत फारशी प्रगति करणे न जमल्यामुळे शाळेला राम राम ठोकून तो नोकरीला लागला. त्याने अनेक कारखान्या व गिरण्यांमध्ये काम केले पण कोठेच स्थिरावला नाही. त्याच्या अनेक नोकऱ्यांपैकी एकीत त्याने दफनभूमीत थडग्यांसाठी खड्डे खणण्याचे काम सुद्धा केले होते. कदाचित तेंव्हाच तो मनाने निर्ढावला असेल. एक ट्रक विकत घेऊन मालवाहतुकीचे काम त्याने केले. एका मुलीच्या प्रेमांत पडला आणि तिच्याबरोबर चक्क लग्नाची गांठसुद्धा बांधली. पण म्हणावा तसा त्याचा सुखी संसार झाला नाही. पत्नीचे गर्भपात होऊन तिला अपत्य होण्याची आशा उरली नाही. लहानपणापासून सहन करीत आलेल्या अनेक दुःखांची, अपमानांची, दुर्दैवी घटनांची टोचणी त्याच्या मनात सलत असेल पण मनांतील घालमेल त्याने उघड केली नाही. लपून छपून कोणावर तरी निर्घृणपणे हात चालवून मनातील सारा राग काढायचा, सगळ्या तेजाबाचा निचरा करायचा अजब मार्ग त्याने धरला. 'जॅक' या नांवाने पोलिसांना पत्रे पाठवून त्यात त्याने आपणच ही कृत्ये करीत असल्याची फुशारकी सुद्धा मारली. ही एक प्रकारची मानसिक विकृतीच म्हणावी लागेल. कुणाच्या मते हे दुसऱ्याच कोणा विक्षिप्त माणसाचे काम होते. वैयक्तिक किंवा आर्थिक लाभ नसल्याने कोणाला पीटरचा सुगावा लागला नाही. इतके भयानक गुन्हे सफाईने करून सुद्धा कोणालाही फारसा संशय येऊ न देता एक सर्वसामान्य कुटुंबवत्सल गृहस्थ असल्याचे नाटक तो यशस्वीपणे वठवीत राहिला. शेवटी जेंव्हा तो पकडला गेला त्या वेळी त्याला ओळखणाऱ्या लोकांना आश्चर्य वाटले."देवानेच या हत्या करण्याची बुद्धी आपल्याला दिली, इतकेच नव्हे तर त्याच्याच इच्छेने आपण पोलीसांच्या तपासातून आजवर सहीसलामत वाचलो, पोलीसांनी तर माझी चौकशी केली होती, त्यांना सगळे माहीत असायला हवे होते." अशा थाटाचे जबाब त्याने दिले.


१९७५ साली त्याने आपल्या पहिल्या सांवजाला लीड्स येथील एका गल्लीतील घरासमोर गांठून तिच्यावर सुरीने जबरी हल्ला केला. पण एका शेजाऱ्याला जाग येऊन त्याने आवाज दिल्याने आपले काम अर्धवट सोडून पीटर लगेच तिथून निसटला. पुढील पांच वर्षांत त्याने तेरा जणींना यमसदनाला पाठवले आणि सात जणींना गंभीररीत्या जखमी करून त्यांना सज्जड दम भरला आणि  आपले जीवन नकोसे केले. सुरुवातीच्या काळांत बळी पडलेल्या कांहीजणींचे चारित्र्य संशयास्पद होते पण नंतर कांही निष्पाप महिलांवर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या अघोरी कृत्यांचे रसभरीत वर्णन इथे करण्याचा माझा उद्देश नाही. एका गुन्हेगाराच्या निष्ठुरपणे वागण्यामुळे या अवधीत तेथील जनजीवन कसे पार विस्कळित झाले होते याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे.


या गुन्हेगाराच्या तपासाच्या एका कारवाईसाठी त्या काळी चाळीस लक्ष पौंड स्टर्लिंग खर्च झाले. रिपरला पकडण्यासाठी पंचवीस हजार पौंड रकमेचे बक्षीस लावले होते. अडीचशे डिटेक्टिव्ह त्यासाठी तीन वर्षे सतत राबले. हजारो इतरांनी त्यांना मधून मधून मदत केली. एकंदर एकवीस हजार मुलाखती घेतल्या गेल्या. संगणकाचा वापर सुरू होण्यापूर्वीच्या त्या काळात याचा परिणाम फक्त ढीगभर कागद गोळा होण्यात झाला. त्यांचा एक दुसऱ्याशी संबंध जोडणे दुरापास्त होऊन बसले. खुद्द पीटरला नऊ वेळा तपासणीसाठी बोलावून घेतले होते. पण पठ्ठ्याने जरा सुद्धा दाद लावून न दिल्याने दर वेळी पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याला संशयातीत इसम समजून त्याच्यावर साधी पाळत सुद्धा ठेवली गेली नाही. चाळीस संशयित व्यक्तींची जी यादी बनवली होती तीत पीटरचे नांव नव्हते. या पोलीस तपासाच्या कामाची (किंवा त्यातील हलगर्जीपणाची) चौकशी करण्यासाठी ब्रिटीश सरकारने एक समिती नेमली. तिने दीडशे पानांचा अहवाल देऊन तपासातील कल्पनादारिद्र्य, तपास करणाऱ्यांचा अडेलतट्टूपणा वगैरेवर ठपका ठेवला.


या काळांत यॉर्कशायरमधील सामान्य जनतेचा पोलिसांच्या यंत्रणेवरील विश्वास मात्र पार उडाला. ओव्हरटाईमचा भत्ता कमावायचे हे एक साधनच बनले आहे म्हणून त्याचा छडा लागत नाही आहे असे कोणाला वाटले. याच काळात स्थानिक पोलीस यंत्रणेची पुनर्रचना करून वेस्ट यॉर्कशायर पोलिस ऑथॉरिटी बनवण्यात आली होती. पण त्यापेक्षा आपले पूर्वीचे सिटी पोलीसच बरे होते असेही  कांही लोकांना वाटले. धोक्याच्या सूचना देणाऱ्या उपकरणांची जोरदार विक्री होऊन ती करणाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. अपरात्री पायी चालत जाण्यापेक्षा लोक टॅक्सीने जाऊ लागले व टॅक्सीड्रायव्हरांचा धंदा वधारला. कांही टॅक्सी ड्रायव्हर एकट्या गिऱ्हाईकाला रस्त्यात सोडण्याऐवजी मानवतेच्या भावनेतून त्याच्या घराच्या दरवाज्यापर्यंत त्याला सुखरूप पोचवू लागले. तर कांही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी या संधीचा गैरफायदा उठवून आपला वाईट हेतू साधून घेतला आणि तो गुन्हा रिपरच्या नांवावर खपवला. प्रसारमाध्यमातील लोकांना तर एक सोन्याची खाण सापडली. गुन्हे घडायला लागल्यापासून त्यांना मोठी सविस्तर प्रसिद्धी मिळाली. न्यायालयात खटला उभा राहिल्यावर तर त्याला ऊत आला. दूरचित्रवाणीवर त्याचे खास वृत्तांत येऊ लागले.
 
महिलांनी तर या प्रकाराची धास्तीच घेतली. अगदी आवश्यक असल्याशिवाय त्या घराबाहेर पडेनाशा झाल्या. त्यांच्यासाठी जवळ जवळ रात्रीचा कर्फ्यू लागू झाला. त्यामुळे कुणाला शिक्षण सोडावे लागले तर कुणाला नोकरी. त्यांनी मोठ्या संख्येने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली, आपापली स्वसंरक्षकदले बनवली. पांचशे महिलांनी भडक चित्रपट दाखवणाऱ्या एका चित्रपटगृहावर मोर्चा नेला आणि तेथील पडद्यांची नासधूस केली. अशा प्रकारे एका अज्ञात भीतीने, असुरक्षिततेच्या, असहाय्यतेच्या भावनेने लीड्सचा सारा परिसर ग्रस्त झाला होता. पीटर सटक्लिफच्या पकडले गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.


पीटरला पकडणे, त्याच्यावर खटला चालवून त्याला शिक्षा करणे व त्या सुमारास बायकांचे खून पडणे थांबणे हा सगळाच बनाव होता, खरा कर्ता करविता कोणी वेगळाच होता आणि तो नामानिराळा राहिला असा शोध नुकताच कोणा संशोधकाने लावला आहे म्हणे. त्याचेकडे लक्ष द्यायला आता कुणाला वेळ आहे? समाजावर अचानक होणारे आघात आणि त्यांची अनामिक भीती आता नव्या स्वरूपात येत आहेत. बेछूट गोळीबार, बॉंबस्फोट, आत्मघातकी हल्ले वगैरेंच्या. 


(लीड्सच्या चिप्स या माझ्या ब्लॉगवरील लेखमालिकेतील १३ वा भाग)