एका लग्नाची गोष्ट

राहुलची व माझी गेल्या वर्षी फ़ेब्रूवारीमधे इंटरनेटवर गाठ पडली. तो इंग्लंड मध्ये पी एच.डी. करत होता व मी मुंबईत फ़िजिओथेरापिस्ट. त्याचा नुकताच मुंबई दौरा झाला असल्यामुळे इतक्या लवकर पुन्हा तो प्रवास घडणे कठीण होते. पण ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी असतात! मग काय? एप्रिल मध्ये आमचा साखरपुडा झाला व डिसेंबर मध्ये लग्नाची तारीख ठरली.


मात्र इंग्लंडला परतल्यावर राहुल ला डिसेंबर खूप लांबचा वाटायला लागला. जून मध्ये एके दिवशी मला इ-मेल आले, 'मी २८ जुलै ला येत आहे.' दीड महिना! १ ऑगस्ट चा नवीन मुहूर्त निघाल.


भर पावसात आमची लगिन-घाई सुरू झाली. हॉल बुकिंग, साडी खरेदी, केटररर्स,दागिने, मेक-अप, मेहेन्दी, त्यात इंग्लंडचे चे शॉपिंग, केळवण, पत्रिका इत्यादी कार्यक्रम पार पडत होते.


२६ जुलै उजाडला. मी बहिणी बरोबर खरेदी साठी गाडीतून बाहेर पडले होते. मुसळधार पाऊस काही मुंबईला नवीन नव्हता. सांताक्रूजला आधीच पाणी साठले होते. पण ही तर दर पावसाळ्याची कथा आहे असा विचार करून आम्ही दुकाने धुंडाळत होतो. हळूहळू पणि वाढू लागले. गाडी पुढे नेणे शक्य नव्हते. ती एके ठिकाणी उभी करून आम्ही चालत घरचा रस्ता धरला...पण सर्वत्र शब्दशः 'डोक्यावरून पणी' जात असल्याचे कळत होते. आमच्या सारखे इतर लोकही अडकले होते. रात्र तिथेच गाडीत काढण्यावाचून आम्हाला पर्याय उरला नही.


पहाटे आम्ही पदयात्रा (जलयात्रा) चालू केली. मुंबईच्या रस्त्याची अवस्था बघून आम्हाला धक्का बसला! फुटलेल्या भीती, वाहून पडलेल्या गाड्या, माणसांचे लोंढे...मुंबईचे हे चित्र मला नवीन होते. एकदाचे घरी सुखरूप पोहोचलो. पप्पा देखिल आदल्या रात्री अडकले होते.


राहुलचा चारदा फोन येऊन गेला होता. तो सुद्धा काळजीत होता. आज तो यायला निघायचा होता. त्याचे २८ चे लंडन-मुंबई फ्लाईट रद्द करण्यात आले होते. पावसामुळे मुंबई विमानतळ बंद होते. तरी दिल्ली अथवा बंग़लूरला यायचा प्रयत्न तो करणार होता. पुढचे पुढे बघू. २९ च्या रात्री तो एकदाचा भारतात आला....दिल्ली ला का होईना! आलिटालियाने दिलेले पहाटे ४ चे मुंबईचे फ्लाईट न घेता आमच्या मित्राने बुक केलेल्या ८ च्या फ्लाईटने यायचे त्याचे ठरले. नंतर कळले की ४ चे फ्लाईट हैदराबादला डायव्हर्ट करण्यात आले!


आज ३० तारीख! आज राहुल येणार!! लग्न आता अगदी २ दिवसांवर!! तेवढ्यात बातमी आली, 'रनवे वर विमान घसरल्या मुळे मुंबई विमानतळ पुन्हा बंद करण्यात आले आहे'....आज तरी राहुल येईल का? साप-शिडीतल्या सोंगटी सारखी आमची अवस्था होती. शिडी चढून वर जातो तोच पुढे सापावरून खाली घसरतो! सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता.


अखेरीस ८ चे फ्लाईट १२ ला रवाना करण्यात आले. दुपारी, लग्नाच्या जेमतेम ३८ तास आधी नवरदेव एकदाचे मुंबईत उतरले! लगेच बोरिवली ला सूट खरेदी उरकली आणि पार्लर गाठले.


पावसाचे आनंदाश्रू काही केल्या थांबत नव्हते. एरव्ही ट्रीप वा ट्रेकिंगला हवाहवासा वाटणाऱ्या पावसाला, 'जरा दम घे रे बाबा' असे सांगावेसे वाटत होते.


रविवार -३१ जुलै. आज माझी मेहेन्दी व दोघांच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता. वीरादेसाई मार्गावर कम्बरेभर पणी होते. नातलगांचे फोन...यायचे कसे? स्टेशन पासून अंबोलीपर्यन्त येणे शक्य होते...मग घरून गाडी पाठवून पाहुण्यांना तिथून घरा पर्यंत आणण्यात आले. इतक्या पावसात गिरगांवातून मेहेंदी काढणारी आली! मेहेंदीच्या हातांनी मी भर पावसात पार्लर शोधत फिरत होते!!


हळूहळू मंडळी जमू लागली. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. जवळ जवळ ८० लोक घरी जमले! आत्या, मामा, काका, मावश्या आणि मित्र मंडळ! नाच गाणे आणि जेवण झाले. सर्व आनंदात होते...पण उद्याची काळजी देखिल होती.


दुसऱ्या दिवशी गडबड नको म्हणून पप्पांनी ड्रायव्हरला घरीच थांबवून घेतले.


१ ऑगस्ट... लग्नाचा दिवस! पावसाचा जोर अजून कायम होता. टी.व्ही., रेडिओवर सतत 'सर्वत्र पाणी साठल्यामुळे लोकांनी बाहेर पडून आपला जीव धोक्यात घालू नये', अश्या सूचना दिल्या जात होत्या. हॉलवरून डेकोरेटर व केटररचा फोन आला. 'आम्ही पोहोचलो आहोत. दादरला काहीही पाणी साठलेले नाही. काळजी करण्याचे कारण नाही. तरीही तुम्ही लवकरात लवकर निघा.' आम्हाला सर्वांना धीर आला. 'आज लग्न आहे का?', असे फोन सारखे येत होते. २६ जुलै चे चित्र अजून सर्वांच्या डोळ्यासमोरच होते. भीती होती. त्यामुळे घराबाहेर पडताना दहादा विचार करणे साहजिकच होते.


राहुलने बुक केलेली गाडी नेमकी येणार नव्हती. त्याच्या शेजाऱ्यांनी आग्रह धरला की एवढ्या पावसात दादरला जाणे योग्य नाही तरी मुलीला घरी बोलवून लग्न करा. आम्ही राहुल आणि त्याच्या घरच्या मंडळीना घेऊन हॉलवर जायचे ठरले.


मी मैत्रिणींना सांगितले, आम्ही निघालो आहोत, पण तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका. 'पण तुझ्या लग्नाला आम्ही नाही यायचे..असे कसे होईल?', हे उत्तर ऐकून माझा उत्साह वाढला.


वांद्र्याला काकांकडे जाऊन देवाला नमस्कार झाला आणि आम्ही सर्व नवर्याच्या घरी पोहोचलो. माझे भाऊ तर चक्क हाफ पॅण्ट मध्ये निघाले! कुठेही काहीही प्रसंग येईल म्हणून ही तयारी!


नवरा-नवरी दोघे एकच गाडीत, एकही फ़ूल नसलेली लग्नाची गाडी-ट्रॅक्स, जीन्स, टी-शर्ट, हाफ़पॅण्ट घातलेले वऱ्हाडी आणि नवरदेव..अशी लग्न होतात किती?


खरं तर हायवेला काहीच पाणी नव्हते. ट्रेन देखिल सुरू होत्या. भटजी आले. आम्ही सर्वाना फोन करून येण्याबद्दल कळवले.


मंडप सजला. रुखवत मांडले. फोटोग्राफरची धावपळ सुरू झाली. माझ्या आग्रहावरून बायका नवावारी साड्या नेसल्या होत्या. पुरुष मंडळींसाठी पुणेरी पगड्या आणल्या होत्या. सर्व एकदम सुरळीत चालू होते. बाहेर पावसाने मांडलेल्या थैमानाचे आत काहीच चिन्ह दिसत नव्हते. दिल्ली, पुणे, ठाणे, नासिक, कल्याण, विरार, वसई,डोंबिवली, पनवेल, बोरिवली, गोवा, बंगलूर असे सर्वाकडून नातलग, मित्र मंडळी शुभेच्छा देण्यासाठी जमले. जवळ जवळ ३०० जण उत्साहाने आणि धैर्याने ह्या आनंद सोहळ्यात सहभागी झाले! दोन दिवसापूर्वी वाटणारी अनिश्चितता कुठेशी नाहीशी झाली होती.


माझी मैत्रीण यायला निघाली तर तिचा नवरा तिला जाऊ देई ना. 'तुला काही झाले तर?',अशी त्याला काळजी. पण तिने देखिल हट्ट धरला. बाहेर येऊन बघते तर रस्त्यावर काहीच पाणी नव्हते. तिने लगेच फोन करून चुकीच्या सूचना देणाऱ्याची कान उपटणी केली!


अशा रीतीने सगळे विधी यथासांग पार पडले. अनेक जण पावसामुळे येऊ शकले नाहीत.पण जे आले त्यांना हा सोहळा कायमचा लक्षात राहील!


दोन दिवसांनी माझा 'व्हिसा' आला आणि ८ ऑगस्टला आम्ही दोघे इंग्लंडला आलो. इकडे आमचे चिमुकले घर सजले. लग्नाला आता वर्ष होऊन गेले, पण माझ्या लग्नाची गोष्ट म्हटले की तो मुसळधार पाऊस आणि त्या बरोबरचे सारे चलचित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यावर हसू येते, मौज वाटते....एक ऍडवेन्चर असल्या सारखे वाटते.