जेव्हा एखादा वकील आपल्या अशीलाला संशयाचा (गैर)फायदा मिळवून देतो त्यावेळी वकीलाने असे करायला नको होते असे सर्वसामान्यांना वाटते. त्यावर प्रत्युत्तर म्हणून संबंधित वकिलाकडून व्यवसाय-नीतीचा मुद्दा पुढे करून स्वत:च्या (कुणाला तरी न्याय नाकारणाऱ्या व समाजांत असुरक्षितेची भावना निर्माण करणाऱ्या) कृत्याचे समर्थन केले जाते. येथे प्रश्न असा निर्माण होतो की ही व्यवसाय-नीति कोणी ठरवली?
समाजांत समाजासाठी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाला आपल्या व्यावसायिक कर्तव्याकर्तव्याचा विवेक राहावा म्हणून अधिकृत व्यवसाय-नीति आवश्यक आहे. व्यावसायिक हा समाजांत व्यवसाय करून उपजीविका करीत असल्यामुळे ही व्यवसाय-नीति समाजाचे हित जपणारी असावी हे ओघानेच आले. त्यामुळे ती समाजांतील सर्व घटकांनी ठरवायला हवी. त्यांत समाजाच्या व्यावसायिकाकडून अपेक्षा प्रतिबिंबित व्हायला हव्यात. त्यासाठी ही नीति फक्त त्या त्या व्यवसायांतील माणसांनी ठरवून चालणार नाही कारण तसे झाल्यास त्यांत जाणता अजाणता समाजाला हानिकारक अशी व्यक्तिगत स्वार्थाला वाव देणारी कलमे येण्याची शक्यता आहे.
पत्रकारिता हाही हल्ली एक व्यवसाय झाल्यामुळे त्याचीही व्यवसाय-नीति समाजाचे हित-अनहित लक्षांत घेऊन ठरवायला हवी.
आपणांस काय वाटते?