जुने खोड
आकाश मोकळे
पाहत बसावे
एकटे हसावे
खोलीमध्ये
पानसुपारीची
सोसवेना हौस
वय भरघोस
वाढलेले
आधाराला काठी
एक मला हवी
लेक माझी नवी
तीच आता
म्हणे बालपण
नित्य हे जपावे
कसे हे जमावे?
सांग दैवा
खांद्यावर पंचा
तोच काय कोरा
कांजीचाच होरा
चाले त्याचा
राहिली ना कोठे
बोलण्याची सोय
म्हणतो मी 'होय'
आपोआप
असे जुने खोड
केवढे झिजले
केवढे थिजले
काय सांगू
-कापूसकोंड्या