विडंबनाची आली खुमारी

 प्रेरणा: चित्त यांची अप्रतिम कविता "कोलांट्या घेतात मदारी"
http://www.manogat.com/node/8662


मात्राप्रेमींनी चू.भू.द्या.घ्या.


१...


तुला कशाला हव्या कटारी
शब्द तुझे आहेत दुधारी


चहा,शिकंजी अपेय पेये
उघड बियर ऐन दुपारी


नसेल निघत जर कळ थोडीशी
उरक कार्य तू इथे शिवारी


वाचून सुंदर गझल चित्तची
विडंबनाची आली खुमारी


चिडून जाऊन स्वतः वरती
मलाच माझी दिली सुपारी


प्रतिसादाची घेऊन आशा
मनोगतींच्या आलो दारी


 


२...


बुडून गेली गावे सारी
सुरू झाले दौरे सरकारी


जीवास वैतागे बळीराजा
पाश अमानुष सावकारी


निवडणुकांचे आले वारे
मते मागण्या आले भिकारी


कुणास देशील मते आता रे
हा खुनी अन तो फरारी


सर्व कोडगे लंपट नेते
ठेचा आता हे साप विषारी


बघून ह्यांची इथे चरित्रे
महाभूताला आली शिशारी


बदलण्यास तू नशीब स्वतःचे
फुंक क्रांतींची तूच तुतारी


   - अनिरुद्ध अभ्यंकर