मुंबई विद्यापीठ आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी
मुंबई विद्यापीठ हे १५० वे वर्ष साजरे करते आहे. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख मी मुंबई विद्यापीठाला व तेथे शिकणाऱ्या असंख्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अर्पण करतो.
जर तुम्हाला वाटत असेल की इंजिनिअरिंग चे विद्यार्थी साहित्यामध्ये कमकुवत असतील तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. पुढील शायरी वाचा, तुमचा हा गैरसमज नक्कीच दूर होईल...............
वो बाप हि क्या जिसकी बेटी नही
वो इंजिनिअर हि क्या जिसकी केटी नही.
एक बार में पास हुआ तो क्या किया,
बिना फेल हुये जिया तो क्या जिया
इंजिनिअर कॉलेजमें ईतने साल मरते है,
कभी कभी तो बाप और बेटे एक ही क्लास में पढते है.
वरील ओळी काही जणांना अजब वाटतील, पण ह्या आणि अशा कित्येक ओळी मुंबई विश्वविद्यालयाच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या जीवनात काही सुखाचे क्षण निर्माण करतात. प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टरला नापास होण्याची प्रथा या वर्षी देखिल ६५% हून अधिक विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. येथे मी विद्यार्थ्यांकडे भेदभाव न करता सुचीत करू इच्छितो की इंजिनिअरिंग चे विद्यार्थी हे बारावीला सरासरी ८०% गुण ( अपवाद फक्त बडे बाप के बेटे जे प्रवेश बाप की मेहनत की कमाई वर घेतात व नापास होऊन कॉलेजमधून बाहेर पडतात.) मिळवून प्रवेश मिळवतात. तरीही पास होणं अभावानेच आढळते. मग हे इंजिनिअरिंग आहे तरी काय. विद्यार्थी नापास का होतात? विद्यार्थी अभ्यास करत नाहीत हा मुद्दा मान्य न करण्यासारखा आहे, कारण जो विद्यार्थी बारावीला ८०% ते ९०% मार्क्स काढतो त्याला अभ्यास कधी व कसा करावा हे सांगण्याची गरज मला तरी नाही वाटत. मग दोष कोणाला द्यावा? मुंबई विश्वविद्यालयाच्या माजी इंजिनिअरिंग विद्यार्थी असल्या कारणाने मला हा लेख लिहावासा वाटतो.
विश्वविद्यालय :
१. विद्यार्थ्यांचे वर्ष हे जून महिन्यात सुरू व्हावे हि अपेक्षा असते, पण १५ ऑगस्टच्या अगोदर कॉलेजकडे कुत्रं देखिल फिरकत नाही. कॉलेज दरवर्षी १ ते २ महीने उशिरा सुरू होते, कारण लेट ऍडमिशन्स, कोर्टाची स्थगिती, मेडिकल एन्ट्रन्स आणि असेच बरेच काही. ऑगस्टमध्ये कॉलेज सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या सत्रासाठी परीक्षेला बसण्याची अपेक्षा केली जाते. फक्त दोन महिन्यांनंतर परीक्षेला बसण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून पुढील बाबींची पूर्तता परीक्षेपूर्वी करण्यास सांगण्यात येते.
अ. कमीतकमी पाच विषयाच्या प्रात्यक्षिक व त्याचे जरनल (त्या विषयाच्या टीचर-इन-चार्ज कडून सर्टिफाय केलेल्या असाव्यात) पूर्णं लिहून सबमिट करायचे असते. या सोहळ्याला सबमिशन असे नाव दिले गेले आहे. खरोखरच ते एखाद्या मिशन पेक्षा कमी नसते.
ब. प्रत्येक विषयाच्या कमीत-कमी तीन असाइनमेन्टस् त्या सुद्धा दिलेल्या वेळेत पूर्णं करून. असाइनमेन्टस् म्हणजे अश्या प्रश्नांचा संच जो विद्यार्थ्यांकडून अ-४ च्या कागदावर उत्तर लिहून पूर्णं केला जातो. प्रश्नाची संख्या हि प्रत्येक शिक्षकाच्या स्वभावावर अवलंबून असते, पण शक्यतो ती जास्तच ठेवली जाते. वर्गातले काही किताबी किडेच ते सोडवतात आणि इतर छपरी पोरे त्याची नक्कल उतरवतात. त्यामुळे इंजिनिअरिंग चे विद्यार्थी जर तुम्हाला ट्रेनमध्ये, बेस्टचा बसमध्ये अथवा रेस्टॉरंट मध्ये काही लिहिताना दिसले तर आश्चर्य करण्याचे काहीही कारण नाही. तुम्ही कधी ७:२७ च्या अंधेरी-बेलापूर लोकलने कधी प्रवास केला आहे का? जर नसेल तर एकदा करूनच पाहा. जे भेटेल त्याचा आधार घेऊन इंजिनिअरिंग चे विद्यार्थी त्यांचे असाइनमेन्टस् खरडताना दिसतील.
क. त्यानंतर क्रमांक लागतो तो म्हणजे क्रॅश कोर्स मालिका, काही स्टुडंट्स कोचिंग क्लासला जातात त्यांना पूर्वतयारी करायला लागते ( सर्वच गोष्टींची ), कारण बहुतेक कॉलेज त्यांच्या अभ्यासक्रमात खूपच मागे असतात.
२. परीक्षेचे वेळापत्रक कधीच नियमित नसते. हे कदाचित ऐकण्यास नवीन नसावे, परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर देखिल पुढे ढकलल्या जातात! सर्वात वाईट दृश्य म्हणजे परीक्षा प्रिपोन (वेळेअगोदर होण्याचे) होण्याचे.
३. मुंबई विद्यापीठात कोणालाच एखाद्या विषयाचा एखाद्या शाखेसाठी असलेला निश्चित पाठ्यक्रम माहीत नसतो. विद्यार्थी अंधारात तीर मारल्यासारखे कोचिंग क्लासने दिलेल्या अथवा सीनिअर विद्यार्थ्याच्या नोटस् वापरत असतात.
४. विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करायला क्वचितच वेळ मिळतो. आणि केटी परीक्षा व रेग्युलर परीक्षा यांमध्ये खूपच कमी टाइम-गॅप असतो, कधी कधी तो नसतोही.
५. दुसरा एक बकवास विभाग म्हणजे विद्यापीठाचा एक्झॅम सेल विभाग. तुमची परीक्षा नापास झाला आहात? आणि तुमचा पेपर पुनर्तपासणी साठी दिला आहात? तर १००% चान्सेस आहेत की तुमचा पुनर्तपासणी निकाल तुम्हाला केटी परीक्षेनंतरच मिळेल. आजच्या हायटेक जमान्यात देखील विद्यापीठाचे स्वतःचे पोस्टल डिपार्टमेंट आहे. येथे मुद्दा असा आहे की पुनर्तपासणीसाठी विद्यापीठ एका पेपरकरता विद्यार्थ्याकडून रु.५०० घेते, या किमतीमध्ये विद्यापीठ एक चांगल्या प्रतीची कुरिअर सर्व्हिस वापरू शकते.
६. विद्यापीठाचे नियम प्रत्येक सत्रासाठी बदलत असतात, त्यामुळे मोर्चा, रॅली अटेंड करणे हा सर्वांसाठी कॉमन टाईमपास आहे. (व्हि. जे. टी. आय. चे गेट माझ्या समोरच तोडले गेले होते, त्याची आठवण झाली.)
७. विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका या नेहमी चुकांनी भरून असतात. अशावेळेस विद्यार्थ्यांना मार्काची भरपाई हि केवळ त्याने चूक निदर्शनास आणून दिली, अथवा नीटशी ऍडजस्टमेंट करून उत्तर मिळवण्यास यश मिळवले तरच मिळते. तीन तासांत विद्यार्थ्याने प्रश्नांची उत्तरे द्यावयाची असतात का प्रश्नपत्रिका काढणाराच्या चुका शोधायच्या असतात?
८. जरी नियमानुसार विद्यापीठाने परीक्षा उरकल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करावयाचा असला तरी, एकही निकाल वेळेवर लागत नाही..... जवळपास सर्वच निकाल तीन महिन्यांनंतरच लागतात! इतर विद्यापीठाचे बी. ई. चे विद्यार्थी जॉब मिळवत असतात तेव्हा मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी निकालाची वाट बघत असतात.
१. थोड्या अथवा काहीच सुविधा नसलेल्या कॉलेजांना अभियांत्रिकी कॉलेज चालवण्याचे लायसेन्स दिले जाते, त्यांच्या कार्यपद्धतीवर कोणाचेच नियंत्रण नसते. ( बहुतेक कॉलेजेस हे राजकारण्यांच्या मालकीचे असतात ज्यांच्यासाठी हे कॉलेज म्हणजे पैशाची झाड असतात ).
२. अभ्यासक्रम हा नियमितपणे कधीच रिव्यु केला जात नाही. विद्यार्थी त्यांच्या सीनिअर्सना महत्वाचा वाटलेला अभ्यासक्रम वापरत असतात जो कधी कधी अनुपयोगी ठरतो.
३. उत्तरपत्रिका ह्या अनक्वालिफाईड प्रोफेसरकडून तपासल्या जातात - बऱ्याचदा त्या विषयाचा त्याला गंधही नसतो! त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका याचा संबंध तुमच्या मतांनुसार कधीच लागत नाही.
प्रोफेसर:-
हा प्राणी मुख्यत्वे करून नुकतीच इंजिनिअरिंग ची डिग्री मिळवलेला पण कोणत्याही कंपनीत नोकरी न मिळवू शकलेला असतो. काहीजण त्यांमध्येच समाधान मिळवून दिवस ढकलतात. जवळपास सर्वच कॉलेजचे प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना ओझे देण्यात मोठा आनंद मानतात. त्यांच्या हातात २५ गुण असतात. ( जे विद्यार्थ्यांना त्यांच्या टर्मवर्क साठी द्यायचे असतात असे गृहित धरले जाते. )आणि विश्वास ठेवा, जर हे २५ गुण प्राध्यापकाकडून देण्याऐवजी घेतले गेले तर एकही विद्यार्थी हूं का चू करत नाही जसे काही ते मार्क्स त्याच्यासाठी नसतातच मुळी.
पालक :-
पालकांनी त्यांच्या पाल्याच्या परफॉर्मन्स बद्दल नेहमीच धीर धरला पाहिजे........... खासकरून मुंबई विद्यापीठाबाबतीत तरी. विद्यार्थ्याची नेहमीच चूक असते असं नाही त्यामध्ये घरातून त्यांच्या दु:खात भर टाकली जाते. पालकांना समजायला हवेय की केटी हा मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या जीवनातला महत्वाचा भाग आहे,...... जरी त्याची आवड असो वा नसो.
महत्वाची सूचना:-
इतर विद्यापीठ क्लास देताना फक्त शेवटच्या वर्षाचे गुण ( म्हणजे ७ व ८ वे सत्र ) विचारात घेतात. मुंबई विश्वविद्यालय सत्र क्र. ५, ६, ७ आणि ८ चे ऍव्हरेज गुण पकडतात !!! (मला ऐकिवात आले आहे की हि पद्धत आता बदलली आहे... कमनशीब आमचे.)
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या खराब निकालाबद्दल त्यांना दोष देणे हे चुकीचे ठरते.
........प्रसिक