मॅट्रिक्स- रसग्रहण १

पांढरी शुभ्र पार्श्वभूमी. एक सोफा एक जुना टी.व्ही आणि दोन व्यक्ती बस्स!


गूढ निरव शांतता..


लॉरेन्स फिशबर्न चा धीर गंभीर आवाज...


"वास्तव म्हणजे नक्की काय?" ..आपल्या मनात विचार येतो-हा कसला प्रश्न?.... ह्यावर तोच उत्तर देऊ लागतो "जे तुम्ही पाहू शकता? स्पर्शू शकता ऐकू शकता चाखू शकता ते म्हणजे वास्तव का?"...


" तसे असेल तर वास्तव म्हणजे निव्वळ तुमच्या मेंदूने ग्रहण केलेल्या काही विद्युत लहरी"


सुरुवातीला अतिशय गुंतागुंतीचे, क्लिष्ट, प्रसंगी  अगम्य आणि असंबद्ध वाटणारे कथानक अचानक ह्या प्रसंगापासून उलगडायला चालू होते. 


काय आहे ही 'मॅट्रिक्स' भानगड? ह्या प्रश्नाने आपल्याला कथा नायका सारखेच झपाटून सोडलेले असते.. आणि एकदाचा मॉर्फियस आपल्याला ह्या पांढऱ्या पार्श्वभूमीवर घेऊन जातो. खरंच वास्तवाची व्याख्या नक्की काय? चला तर मग थोडे सुरुवातीपासून काय घडले ह्याची उजळणी करूया, म्हणजे बरेच संदर्भ लागतील... ह्या चित्रपटाचा कथानायक - 'थॉमस अँडरसन'.. संगणक कंपनीमध्ये काम करणारा एक तसा सामान्यच आज्ञावली लेखक... कामावर उशीरा येणे महत्त्वाच्या कामामध्ये दिरंगाई करणे अश्या कारणांमुळे बॉसची बोलणी खाणारा..पोटार्थी कर्मचारी..   परंतु खासगी आयुष्यात मात्र एक वेगळेच जीवन जगणारा. हे जग म्हणजे संगणक आणि महाजालाचे विश्व..इथं त्याची पूर्ण वेगळी ओळख आहे. इथं तो ओळखला जातो ते 'निओ' ह्या टोपण नावाने वावरणारा एक कुशल हॅकर म्हणून....निओ सारखेच अनेक लोक इथं वेगवेगळ्या टोपण नावांनी वावरतात.. एकमेकाला जवळून ओळखणारे पण प्रत्यक्षात पुरुष आहेत की स्त्री ह्याची सुद्धा माहिती नसणारे हे लोक आणि त्यांची ही टोपण नावांची दुनिया... 'मॉर्फियस' 'ट्रिनिटी' हि काही गाजलेली टोपण नावे...त्यांना कधीतरी प्रत्यक्षात भेटायला मिळावे ही निओची इच्छा..इथल्या बऱ्याचशा चावड्यांवर सध्या एकच विषय घोळतोय, 'मॅट्रिक्स' ही काय भानगड आहे?' बऱ्याच जणांना ह्याचे कुतूहल लागून राहिले आहे. अशातच निओशी मॉर्फियस कडून संपर्क साधला जातो आणि त्यांची एकदाची भेट घडते..


"मॅट्रिक्सची एका शब्दात व्याख्या म्हणजे - 'नियंत्रण' कुणीही कधीही कल्पना सुधा केली नसेल असे एक अद्भुत नियंत्रण" मॉर्फियस समजावू लागतो. पूर्वी कधीतरी माणसाने यंत्र निर्मितीमध्ये इतकी प्रगती केली यंत्रांना कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशीयल इंटिलीजन्स) देण्यात आली.  कृत्रिम आणी नैसर्गिक ह्यातल्या सीमा रेषा कधी पुसट होत गेल्या कळलेच नाही आणि ह्या यंत्रांना स्वतःची असे व्यक्तिमत्त्व येऊ लागले. तेव्हा माणसाच्या लक्षात ही चूक आली आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून यंत्राचा संहार सुरू केला.. परंतु तो पर्यंत प्रचंड बुद्धिमत्ता प्राप्त झालेल्या ह्या शक्तिशाली यंत्रांनीही त्याचा प्रतिकार सुरू केला ज्याची परिणिती एका अकल्पनिय अश्या युद्धामध्ये झाली... अर्थातच माणसाला यंत्रापेक्षा जास्त मर्यादा असल्याने त्याची हार होते आहे असे दिसू लागल्यावर शेवटचा उपाय म्हणून माणसाने यंत्रांचा ऊर्जेचा एकमेव स्रोत 'सूर्य' एक कृत्रिम ढग निर्माण करून बंद केला. 


बऱ्याचशा विज्ञान कथांमध्ये दिसणारे हे कथानक पूर्णं वळण घेते ते ह्या टप्प्यावर..‌ सर्व उपाय कुचकामी ठरल्यावर ऊर्जेची गरज भागवण्यासाठी यंत्रांनी काढलेली टूम म्हणजे ह्या चित्रपटाचा गाभा....


अस काय बरं केलं यंत्रांनी?..... पुढच्या भागात!


- वरुण