सांगतो मी तुम्हा ती कशी भेटली

आमची प्रेरणा प्रवासी यांची कविता शोध घेते नज़र का अशी वेंधळी?


सांगतो मी तुम्हा ती कशी भेटली
मी कसा गुंतलो ती कशी हासली


पाहिले मी तिला अन मला उमजले
ती मला  वाटली वेगळी वेगळी


रोजचे जाहले मी तिला भेटणे
मजसवे  वागली ती जरा मोकळी


रोजच्या सारखी गप्प ती राहिली
अन मला वाटले ती मला भाळली


भान होते कुणा? वेळ होती तशी!
मी जरा बहकलो ती जरा बहकली


भेटले जीव मग बंधने तोडुनी
रात्र ती रंगली! भेट ती वादळी!


शेवटी व्हायचे तेच झाले पहा
चूक माझी तिची भोवली भोवली


आज ठरलो जगाचे गुन्हेगार का?
(प्रीत कळते कुठे या जगा आंधळी!)


गाठ माझी तिची सात जन्मे अता
ती अता बांधते हो मला साखळी


ती सुखी! मी सुखी? अन कथा संपली
ही कशी वाटली हो तुम्हा मंडळी?


"केशवा" ही तुझी खोड जाणार ना
 वाकडे चालण्याची सवय लागली !!


केशवसुमार..