धुसर …..

धुसर …..


माघातली सांजवेळ
मखमली किरणांचा नाजूकसा खेळ
पश्चीम क्षितिजी ढगांची लोकर
हट्टी थंडीची अनामीक थरथर
शेतं मात्र, उदास
वृध्द, सुरकुतलेली
जवानिच्या आठवणींतच
खोल हरवलेली
बाभळीचे झुंबे, तृणपुष्पांची राने
सारं काही लुटून नेलं
त्या विरक्त शिशिराने
आकाशाकडे, सहजच पाहीलं
आणि मन लगेच तिकडेच धावलं
विश्वासच बसेना, पटेना मनी
पण खरच होत्या तिथे 
पावसाळी ढगांच्या पलटणी
समोरचा डोंगर, धुक्यातून  डोकावला
बाभळीच्या अंगावरही काटा आला
कपाशीची फुलं उगीचच थरथरली
अन् पाऊलवाट जागीच बावरली
वाऱ्यालाही चढला, जोम नवा
पिंपळही झपाटला, लागताच ती हवा
लखलखत्या किरणांचा पंखा, उघडताच पश्चीमेने
बाजुच्या ढगांची लोकर, भिजली सोन्याने
इतक्यात एक अवखळ सर, गिरकी घेत आली
वृध्द शेत, शुष्क मातीत, थरथरली, झिरपली
कौलांनीही लहानांसमं, थेंब फुले जमवली
सळसळत  सळसळत
पिंपळ ओरडला “पाऊस पाऊस”
खालची देवबाभळ ओरडली
चल खोटारड्या मला थंडी वजत्ये
तुझी ही कसली हौस
पिंपळाने मग पानांच्या ओंजळीतले
कोवळे थेंब तिच्यावर ओघळवले
जणू तिला स्वप्नातून जागे केले
गिरक्या घेत, फेर धरत
थेंब येत होते अजून
पश्चीमही घेत होती आता
किरणांचा पंखा आवरुन
ढगां आड सारे, रंग आता दडले
काही क्षणात असे, नाट्य सारे घडले
अन् आषाढातले तारुण्य, मातीला परत मिळाले
एखाद्या आश्चर्या सारखा
पाऊस दाटून आला
अन भिजलेल्या मातिचा
सुगंध दरवळू लागला….


सुर्य, केव्हाच मावळला
अजूनही पाणी ठिबकतय
कौलावर ताशा वाजतोय
मातीचा सुगंध, सारं भारुन टाकतोय
आकाश मात्र निवळलय
एकिकडे शुक्राचा तेजस्वितारा
आणि बाकी आसमंत सारा,
सुगंधी, स्वप्नमय, धुसर
धुसर धुसर धुसर् धुसर् धुसर्……


(मंगेश पाडगावकरांच्या 'धुसर' या लेखावरुन स्वैर……)
सुधीर