डॉ. विद्याधर ओक यांचे संशोधन: २२ श्रुतींचे मेलोडियम - ठाणे येथील कार्यक्रम आणि प्राथमिक आढावा

दि. १७ डिसेंबर २००६ रोजी सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे येथे एक संगीतविषयक पण नेहमीपेक्षा वेगळा कार्यक्रम झाला त्याची व त्या विषयाची थोडी माहिती येथे देत आहे.
हा लेख या विषयावरील प्राथमिक स्वरूपाचा लेख आहे. शक्य झाल्यास आणखी लिहिण्याचा विचार आहे.

पार्श्वभूमी
सुमारे महिन्या-दीड महिन्यापूर्वी सकाळी-सकाळी घाईच्या वेळी आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरचा एक कार्यक्रम ओझरता कानी पडला. डॉ. विद्याधर ओक यांचे २२ श्रुतीविषयक संशोधन व त्यांनी स्वत: निर्मिलेले वाद्य मेलोडियम आणि डॉ. गोविंद केतकर यांचे "स्वरांक" (बुद्ध्यंक असतो तसा) या नव्या संकल्पनेबद्दलचे संशोधन या दोन्हींचा थोडक्यात आढावा त्यात घेतलेला होता. हे दोन्ही विषय कोणाही संगीतप्रेमीचे कुतूहल जागृत करणारे होते.
नंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला लोकसत्तेत श्री. सदाशिव बाक्रे यांचे डॉ. ओक व त्यांचे संशोधन यावरील लेखवजा पत्र वाचनात आले त्यामुळे उत्सुकता वाढली.
या पार्श्वभूमीवर ठाणे येथील कार्यक्रमाची घोषणा ऐकली व त्याला हजर राहण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. ती सुदैवाने अंशत: का होईना सफल झाली.


कार्यक्रम
हा कार्यक्रम पूर्ण दिवसभर दोन सत्रात विभागून झाला.

सकाळी ८॥ ते ११ च्या दरम्यान २२ श्रुतींच्या गणिताबाबत माहिती/मार्गदर्शन व कार्यशाळा होती. हातगणक घेऊन यावे अशी स्पष्ट सूचना होती कारण डॉ. ओकांच्या गणितात ५व्या दशांश स्थानापर्यंतची आकडेमोड होती. काही  कारणाने मी या सकाळच्या सत्राला इच्छा असूनही हजर राहू शकलो नाही.

संध्याकाळी ४॥ ते ७ च्या दरम्यान मेलोडिअमची प्रात्यक्षिके झाली. त्यावेळी मी उपस्थित होतो. आपल्या तात्यांच्या भेटीचाही योग घडून आला. बाकी तपशील खाली दिले आहेत.


श्रुतींचे शास्त्र
हा खरे तर दुसऱ्या आणि मोठ्या लेखाचा विषय आहे.
शिवाय डॉ. ओकांनी सादर केलेले गणित येथे उद्धृत करण्यासाठी व करण्याआधी त्यांच्या अनुमतीची आवश्यकता आहे. अर्थात ती मिळवण्याचा प्रयत्नही करणार आहेच.
सध्या येथे काही प्राथमिक माहिती देत आहे.
मनोगतावर मी पूर्वी केलेले लिखाण आपण वाचले असेल अशी आशा करतो. त्यात नैसर्गिक स्वरपट (नॅचरल स्केल) व संस्कारित स्वरपट (टेम्पर्ड स्केल) याविषयी सविस्तर विवरण आहे. आठवणीसाठी येथे थोडीशी पुनरावृत्ती करतो.
शुद्ध-कोमल-तीव्र धरून सप्तकातील १२ स्वर आपल्या वापरात असतात. सध्याच्या काळात ते हार्मोनियम (बाजाची पेटी) वरून घेतले जातात. त्या स्वरांत टेम्पर्ड स्केल (याला ईक्वल टेंपरामेंट स्केल किंवा  ET scale असेही म्हणतात) वापरले जाते. यात दोन जवळच्या स्वरांच्या कंपनसंख्येत २ च्या १२व्या मुळाचे गुणोत्तर असते. हे सर्व स्वरांसाठी समान असते. शिवाय यामुळे कोणत्याही स्वरापासून सुरुवात करून (म्हणजे कोणत्याही पट्टीत) सापेक्षतेने पाहता तेच बारा स्वर मिळू शकतात.
परंतु जुन्या शास्त्राप्रमाणे हे टेम्पर्ड स्केलचे स्वर भ्रष्ट मानले जातात कारण ते नैसर्गिक स्वरपटाशी जुळत नाहीत.
आणखी एक त्रुटी म्हणजे काही रागांत यापेक्षा थोडे सरकलेले स्वर येतात. उदा. तोडी रागात गंधार उतरलेला किंवा हिंदीत "उतरा" (नेहमीच्या कोमल गंधारापेक्षा थोडा खालचा) घेतात तर पूरिया रागात रिषभ "चढा" (नेहमीच्या कोमल रिषभापेक्षा थोडा वरचा) लागतो.
[अशा स्वराचे हिंदी चित्रपटगीतांतले एक उदाहरण हवे असेल तर सचीनदेव बर्मन यांनी गायिलेले "सुनू मेरे बन्धू रे..." हे गाणे आठवा. त्यातील ओळीच्या शेवटाच्या "सुनु मेरे साऽऽऽथी रे" मधील "साऽऽ" हा स्वर असाच सरकलेला, बहुधा चढा कोमल निषाद किंवा उतरा शुद्ध निषाद, आहे असे वाटते. तज्ज्ञांनी अधिक माहिती द्यावी.]
असे अन्यही काही राग आहेत आणि त्यांत काही विशिष्ट स्वर चढे किंवा उतरे असावे लागतात. या गोष्टीचे ज्ञान सर्वच रसिकांना (व कित्येक होतकरू गायकांनासुद्धा) असतेच असे नाही पण शुद्धतेच्या दृष्टीने पाहिले तर असे स्वर हार्मोनियममध्ये मिळत नाहीत हे खरेच आहे.
हिंदुस्तानी संगीताच्या जुन्या शास्त्राप्रमाणे फक्त १२ स्वर नसून मूळ २२ श्रुती मानल्या जातात. याचेही ज्ञान किंवा जाण अनेक रसिकांना व गायकांना बहुधा नसते. सध्या ज्याचा आधार घेतला जातो त्या हार्मोनियममध्ये २२ श्रुती मिळत नाहीत हे उघड आहे.


या त्रुटींची जाणीव संगीतज्ञांना नव्हती किंवा नाही असे मात्र आपण समजू नये. सर्व ज्ञानी लोक हे पहिल्यापासून ओळखतात, मानतात व मान्य करतात. पण शेवटी एक सोय म्हणून हार्मोनियमचाच आधार घेणे रूढ झाले आहे. पूर्वी वर्षानुवर्षे आकाशवाणीमध्ये हार्मोनियमच्या साथीवर बंदी होती ती याचमुळे. पण काळानुसार हार्मोनियम तेथेही प्रवेशलेच. अशा रीतीने गेली १४० वर्षे या अशुद्ध स्वरांचा अपसंस्कार आपल्या सर्वांच्या कानावर व मनावर झालेला आहे. या सर्व परिस्थितीचा परिपाक म्हणजे आपण सगळे आता मूळ शुद्ध स्वर पार विसरून गेलो आहोत.
या परिस्थितीला उपाय म्हणून व हार्मोनियमवर घेतल्या गेलेल्या आक्षेपांना उत्तर देण्याच्या हेतूने काही तज्ज्ञांनी प्रयत्नही केले. याबाबतीत लगेच आठवण येते ती पं मनोहर चिमोटे यांनी निर्मिलेल्या "संवादिनी" या वाद्याची. अर्थात या वाद्यावरसुद्धा सर्व २२ श्रुती वाजवता येतात की नाही हे मला स्वत:ला माहीत नाही. संवादिनी वाद्य नैसर्गिक स्वरपटाशी जुळवलेले आहे व "संवादिनी" याच व्यावसायिक नावाखाली उपलब्ध आहे. पण त्याचा फारसा प्रसार झाला नाही. शिवाय अशी खास प्रकारे बनवलेली वाद्ये सर्वांनाच निष्णातपणे वापरता येतील असे वाटत नाही.


डॉ. ओकांचे संशोधन
डॉ. विद्याधर ओक हे एम.बी.बी.एस, एम. डी (फार्मॅकोलॉजी), असून त्यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या मुख्य सेवाकाळात बरोज़-वेलकम, ग्लॅक्सो-वेलकम, वोकहार्ट व निकोलस-पिरामल या कंपन्यांत अत्त्युच्च पदे भूषविली आहेत.
हल्लीच्या काळात त्यांनी या विषयाचा ध्यास घेऊन सखोल अभ्यास केला आणि मूळ शुद्ध स्वर कोणते, श्रुती कोणत्या, त्यांचे एकमेकांशी गणिती नाते काय आहे, असले पाहिजे, यावर काही निष्कर्ष काढले. मग या ग्रांथिक किंवा गणिती अभ्यासावर न थांबता हे स्वर, या श्रुती, वाद्यातूनसुद्धा निघाल्या पाहिजेत या जिद्दीने त्यांनी हार्मोनियमवर संस्कार करून मेलोडियम हे नवे वाद्य बनवले आहे.
तसे मेलोडियम हे नाव नवे नाही. १८४४ साली अलेक्सान्द्र व पुत्र यांनी हार्मोनियम हे वाद्य बनवले. बेर्लिओझ नावाच्या संगीततज्ज्ञाने यालाच मेलोडियम हेही नाव दिले. नंतर १९३८ मध्ये हाराल्ड बोडं याने ओस्कार फ़ीर्लिंगच्या सहाय्याने याच नावाचे एक इलेक्ट्रॉनिक वाद्य नव्याने बनवले.
अर्थात डॉ. ओकांचे मेलोडियम या दोन्हीहून वेगळे आहे.
सा आणि प हे अचल स्वर + (उतरा व चढा कोमल + उतरा व चढा शुद्ध) * (रे,ग,म,ध,नी) मिळून अशा २२ श्रुती डॉ. ओकांनी दिल्या आहेत.
[या श्रुती
"चतुष्चतुष्चतुष्चैव षड्जमध्यमपंचमम्
द्वैद्वै निषादगांधारौ त्रिस्त्र: रिषभधैवता:"
या जुन्या शास्त्राहून वेगळ्या आहेत असे सकृद्दर्शनी वाटते. पण डॉ. ओकांनी आजच केलेल्या खुलाशाप्रमाणे त्यांनी दिलेल्या श्रुती या जुन्या शास्त्राशी जुळणाऱ्याच आहेत.] 
सगळ्या श्रुती सहसा कोणत्याही रागात येत नाहीत. बहुधा याचा फायदा घेऊन व हार्मोनियम वाजवण्याचा हल्लीच्या बहुतेक वादकांना असलेला सराव पाहून त्यांनी हार्मोनियममध्येच काही बदल करून मेलोडियम हे नवे वाद्य बनवले.
मेलोडियमला प्रत्येक चल स्वर उतरा किंवा चढा करण्यासाठी खिट्ट्या आहेत, त्या वापरून त्या-त्या रागाला अनुकूल असे स्वर आधी लावून घ्यायचे असतात. मग तो राग नेहमीच्या पद्धतीने वाजवल्यावर हवे ते सूर उमटतात. वरून पाहिल्यास वाद्य हार्मोनियमसारखे भासते पण (१) संपूर्ण स्वरजुळवणी नैसर्गिक स्वरपटाला अनुसरून असल्यामुळे आणि (२) प्रत्येक चल स्वर उतरा किंवा चढा कऱणे शक्य झाल्यामुळे त्याची कामगिरी बदलून जाते.
हे वाद्य एखाद्या विशिष्ट पट्टीसाठी बनवावे लागते आणि त्या पट्टीसाठी सुसंगत असे स्वरच त्यातून उमटतात. सा, म व प यांच्या विशिष्ट गणिती नात्यामुळे वाद्याची मूळ पट्टी सोडून आणखी दोन पट्ट्यांत ते नीट व अचूक सुरेलपणे वाजवता येते.
पण त्याच वाद्यावर इतर पट्ट्यांत वाजवण्याचा प्रयत्न केल्यास निघणारे स्वर डॉक्टरसाहेबांच्या गणिती शुद्धतेच्या व्याख्येप्रमाणे त्यांचे समाधान होईल असे  नसतात.
असे असले तरी ९९% सामान्य लोकांना सूक्ष्म स्वरज्ञान नसल्यामुळे एवढा (ओकांच्याच शब्दांत) "बेसूर"पणा सहज खपून जातो.
विविध गायकांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये जुळवलेले मेलोडियम बनवता येणे सहज शक्य आहे.
डॉ. ओकांनी या वाद्याचे स्वामित्वहक्क (पेटंट) घेतले आहेत त्यामुळे सध्या तरी फक्त तेच या वाद्याची निर्मिती करू शकतात. वाद्याच्या प्रत्येक स्वराची जुळवणी (ट्यूनिंग) ते स्वत:च करतात. मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्यास अजून २-३ महिने तरी लागतील असे कळते. किंमत हार्मोनियमपेक्षा काही प्रमाणात अधिक असणे साहजिक आहे.
या वाद्याच्या सहाय्याने यापुढे तरी आपले संगीत जुन्या शुद्ध स्वरूपात ऐकायला व शिकायला मिळावे अशी अपेक्षा आहे.


मेलोडियमची प्रात्यक्षिके
संध्याकाळच्या सत्रात झिंझोटी, मारवा, पूरियाधनाश्री, चंद्रकंस, इ. प्रामुख्याने श्रुतिभेद दाखवणाऱ्या रागांचे गायन वादन झाले. यात मेलोडियमची साथ किंवा एकल वादन होते. श्री मुकुंद मराठे यांचे सुरेख निवेदन (थोडे गायनही) होते. वेदश्री ओक, भूपाल पणशीकर, वरदा गोडबोले (एखाद-दुसऱे नाव विसरल्यास क्षमस्व) यांचे गायन झाले. सर्वात गौरवाने उल्लेख करायचा तर डॉ. ओकांचे सुपुत्र श्री. आदित्य ओक यांचे मेलोडियम वादन हे कमालीचे कौशल्यपूर्ण होते. त्यांचा वाद्यावरून चपळाईने चालणारा हात सर्वांची वाहवा मिळवून गेला. स्वत: डॉ. विद्याधर ओक यांचे मेलोडियम वादन तर झालेच. दोघांही ओक पितापुत्रांचे बोलके चेहरे वादनातील स्वरवैविध्याला पुरेपूर प्रतिबिंबित करत होते त्यामुळे अधिकच मजा आला.
आता यात हार्मोनियमपेक्षा वेगळे काय जाणवले या मूळ प्रश्नाचा विचार केल्यास एकेक रागातले चढे-उतरे स्वर आमच्या अनभ्यस्त कानांना वेगळेपणाची (पूर्ण जाणीव नसली तरी निदान) चुणूक दाखवून गेले. पण एकूणात सामान्य श्रोत्यांना श्रुतिभेद तंतोतंत कळले असावेत असे काही वाटले नाही. कदाचित हे समजायला बराच वेळ व सराव आवश्यक असेल. डॉक्टरसाहेब म्हणतात त्याप्रमाणे १४० वर्षांचे (अप)संस्कार १-२ दिवसात कसे पुसले जाणार?

लेखाचा पुढचा टप्पा
कोणत्याही संशोधनाला सर्वांची आणि विशेषत: तज्ज्ञांची मान्यता मिळण्याआधी अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. माझ्या समजुतीप्रमाणे डॉ. ओक अशा सर्व प्रश्नांचा मुकाबला करायला सज्ज व सिद्ध आहेत.
माझ्याही मनात डॉ. ओकांच्या या संशोधनाविषयी कित्येक प्रश्न आहेत आणि
शक्य होईल तेव्हा/तसा त्यांच्याशी संवाद साधून मी त्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करेन.
त्यानंतर जमल्यास या लेखाचा आणखी एक भाग लिहावा आणि त्यात माझे प्रश्न व डोक्टरसाहेबांनी दिलेली उत्तरे सादर करावीत असा विचार आहे.


____________________________________
तळटीप १:
मी आंतरजालावर थोडाफार शोध घेऊन पाहिला पण त्यावर डॉ. ओकांचे संशोधन वा त्यांचे मेलोडियम याविषयी संदर्भ मिळाला नाही. त्यांचे चिरंजीव श्री. आदित्य ओक यांच्याशी बोलल्यावर माझी अशी धारणा झाली की याविषयीची माहिती अजून आंतरजालावर योग्य त्या स्वरूपात आलेली नसावी. प्रत्यक्ष डॉ. विद्याधर ओकांनी लवकरात लवकर हे सर्व संशोधन जालावर प्रकाशित केले तर फारच उत्तम होईल. त्यांनीच ते करणे योग्यही ठरेल. पण हे होईपर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याचे निदान निर्देशन जालावर असावे या माफक उद्देशाने मी हा लेख येथे लिहिला आहे.
स्वत: राजा आपले सिंहासन ग्रहण करेपर्यंत त्या आसनाचे रक्षण करण्याचा हा एक प्रयत्न समजावा.

टीप २: श्रीमती
वरदा गोडबोले यांनी गायिलेली पूरियाधनाश्री रागातील चीज आपले आवडते (किंवा संदर्भानुसार नावडते) मनोगती श्री. तात्या अभ्यंकर यांनी बांधलेली होती याचा विशेष उल्लेख करू इच्छितो.