सामर्थ्यशीला.....!!

परत एकदा  माझ्या आईची कविता इथे मनोगतींसमोर ठेवत आहे....


तूच चंचला अग्निबाला, दाहकते नित कारण तू,


तूच कमला, अलका, अचला लज्जित तनूचे धारण तू.


तुझ्या कटाक्षे  बाहूपाशे नर आकर्षित कारण तू,


तूच स्वामिनी, रूप मानिनी समर्पणाचे वारण तू.


तूच कामिनी, हंसगामिनी प्रेमाचे अभिसारण तू,


तूच जननी, संस्कारसारणी, वत्सलते भयनिवारण तू.


तूच चंडिका, मुंड मंडिका, मांगल्याचे तारण तू,


तूच शाश्वती दग्ध पार्वती, अशुभ - अमंगल हारण तू.


तूच वरदा, विश्वशारदा कलाकामिनी भारण तू,


तूच प्रेरणा, अन्नपूर्णा चैतन्याचे आभरण तू.


वंदित वचना, कवी-कल्पना, कवित्वाचे कारण तू,


वाग्विलासिनी, शब्दमोहिनी, स्फूर्तिचे नित धारण तू......


- प्राजु


कवयित्री : सौ. मंजुश्री गोखले.


काव्यसंग्रह : शिशिरसांज.