मसालेदार भात

  • २ वाट्या तांदूळ
  • दोन मुठी मटारदाणे, २ मध्यम आकाराची गाजरे, १ मध्यम आकाराचा कांदा
  • आले, लसूण-२ पाकळ्या, कढीलिंब-७/८ पाने, ४ सुक्या लाल मिरच्या, कोथिंबीर
  • तीळ २ टे. चमचे, चण्याची डाळ ४ टे. चमचे, धने व जिरे - प्रत्येकी १ टे. चमचा,
  • दाणे वा दाण्याचे कूट - २ चमचे, ओले वा किसलेले सुके खोबरे - २ चमचे
  • तेल ४-५ चमचे, मीठ, फोडणीचे साहित्य
३० मिनिटे
२ जणांसाठी भरपेट

दोन वाट्या तांदळाचा भात शिजत ठेवावा. शिजवताना भात मोकळा होण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घालावे. भाताचा गोळा व्हायला नको.

मटारदाणे धुवून घ्यावे. गाजरे धुवून बारीक तुकडे करावेत. अर्धा कांदा पातळ उभा चिरावा. उरलेला कांदा जाड चिरावा. कोथिंबीर धुवून निवडून घ्यावी.

कोरड्या तव्यावर वा भांड्यात  धने व जिरे, चण्याची डाळ व सुक्या लाल मिरच्या, तीळ, दाणे, खोबरे वेगवेगळे भाजून घ्यावे. हे भाजलेले जिन्नस एकत्र करून मिक्सर/ब्लेंडरमध्ये बारीक दळावे. ही पूड बाजूला काढून ठेवावी व मिक्सरच्या त्याच भांड्यात लसूण, आल्याचे तुकडे, जाड चिरलेला कांदा व निवडलेली कोथिंबीर थोडे पाणी घालून वाटावी. 

कढईत वा जाड बुडाच्या भांड्यात तेल तापत ठेवावे. त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की हळद व कढिलिंब घालून त्यावर पातळ उभा चिरलेला कांदा घालून परतावा. त्यावर मटारदाणे व गाजर घालून परतावे. शेवटी मिक्सरमधील कांदा-आले-लसूण- कोथिंबिरीचे ओले वाटण घालून परतावे. शेवटी हे मिश्रण व भाताला पुरेल एवढे मीठ घालावे. त्यात एक कप पाणी घालून मटार-गाजर शिजेपर्यंत झाकण घालून ठेवावे.  मटार व गाजर फार मऊ होईपर्यंत शिजवू नये.

ह्या मिश्रणात दळलेला कोरडा मसाला घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. कोरडा मसाला घातल्यावर मिश्रण फार कोरडे झाल्यास वरून अर्धा कप पाणी घालावे. हे मिश्रण भाजीच्या ग्रेवी एवढे ओले असायला हवे.

परातीत वा मोठ्या ताटात भात काढून तो मोकळा करून घ्यावा त्यावर वरील मिश्रण ओतून ते भाताला सारखे लागेल अशा पद्धतीने ढवळावे. मिश्रणातील मीठ कमी वाटत असल्यास वरून थोडे मीठ घालावे.

हा मसालेदार भात गरमगरम खावा. आवडत असल्यास वरून तुपाची धार घ्यावी.

पाककृतीमध्ये केवळ मटार आणि गाजर लिहिले असले तरी मी हा भात वांगी, तोंडली, फरसबी, फुलकोबी, बटाटे घालूनही करून पाहिला आहे. एक वा अनेक भाज्या घालूनही हा भात करता येईल. भाजी कोणतीही घातली तरी भात चविष्ट होतो.

तिखट आवडत असल्यास मिरच्यांचे प्रमाण वाढवावे.

 

मी स्वतः