'आव्हान'

दिनांक २७ फेब्रुवारी, महान क्रांतिकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचा हौतात्म्यदिन आणि महान क्रांतिकवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन.

वयाच्या १४व्या वर्षी 'वंदे मातरम' च्या जयघोषाखातर १५ आसूडांची शिक्षा प्रत्येक फटक्यागणीक 'वंदे मातरम' चा उदघोष करीत सहजपणे भोगणारे आझाद पुढे आयुष्यभर इंग्रज सरकारला आव्हान देत जगले आणि आव्हान देत धारातिर्थी पडले. स्वातंत्र्याचे वेड लागलेल्या आझादांनी आपण व आपले सहकारी यांची शक्ति किती, आपल्याकडे साधने किती, आपल्याला मान्यता किती याचा विचार कधी केलाच नाही. ते जगले ते एका आदर्श सेनापतीसारखे आणि मेले तेही एका सेना धुरंधरासारखे. आल्फ्रेड पार्क मध्ये शेकडो पोलिसांशी तब्बल २२ मिनिटे एकट्याने झुंज देत आझाद धारातिर्थी पडले. मृत्युनंतरही त्यांचा दरारा कायम होता, त्यांच्या मृतदेहाजवळ जायची हिंमत त्या फौजफाट्यात नव्हती. बराच वेळ शांततेत गेल्यावर देखिल हा योद्धा खराच गतप्राण झाला आहे की आपल्याला बेसावध ठेवून अचानक गारद कराण्यासाठी मेल्याचे नाटक करीत हे पोलिसांना समजायला वाव नव्हता. अखेर काही शिपायांना जरा जवळून गोळ्या झाडायला सांगीतल्या व  संपूर्ण खात्री झाल्यावर मगच पोलिस अधिकारी त्यांच्या देहाजवळ गेले. जांभळाच्या झाडाच्या बुंध्याला टेकून पाय पसरून बसलेल्या अवस्थेत आझादांचा मृतदेह विसावलेला होता. एका हातात स्वत:च्ये आयुष्य अखेरच्या काडतुसाने संपवत त्यांना इच्छामरण देणारे त्यांचे इमानी माउजर होते व दुसऱ्या हातात आपल्या मातृभूमितील मूठभर माती होती. एका वज्रनिश्चयि व ध्येयबद्ध सैनिकाचा मृत्यु कसा असावा याचा आदर्श हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांनी घालून दिला. त्यांच्या मृतदेहावर इंग्रजांनी झाडलेल्या गोळ्या ही जणु त्यांना दिलेली मनवंदनाच होती.

त्याच दिवशी क्रांतिकवी कुसुमाग्रज बरोबर १९ वे वर्ष संपवून वयच्या विशीत पदार्पण करीत होते; दिनांक २७ फेब्रुवारी १९३१. कदाचित 'अग्निसंप्रदायी कवी' ची बीजे या घटनांतुनच अंकुरली असावीत. ऐन विशीत हुतात्मा आझाद, हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा जतिनदास, हुतात्मा महावीरसिंग या व अशा अनेक तेजस्वी हुतात्म्यांचे बेभान हौतात्म्य पाहणाऱ्या कुसुमाग्रजांच्या लेखणीतून अजरामर क्रांतिकाव्ये साकारली. पैकी १९३८ च्या जुलै महिन्यात लिहिलेली 'आव्हान' ही कवीता निश्चितच हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या हौतात्म्याने स्फुरलेली असावी (आझादांचा जन्म जुलै महिन्यातलाच). हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या ७६ व्या हौतात्म्यदिनी त्यांच्या गौरवार्थ क्रांतिकवी कुसुमाग्रजांनी लिहिलेले हे शब्द

'आव्हान'

बलवन्ता, आव्हान
बलीचे बलवन्ता, आव्हान
असेच चालूदे चहुंकडुनी अखंड शरसंधान!

रक्ताने न्हाली
तनू ही रक्ताने न्हाली
आणि चाळणी जरी छातिची पिंजुनिया झाली!

काळजात उठती
कळा जरि काळजात उठती
बळी गिळाया घार-गिधाडे घोटाळत वरती!

लवहि न आशंका
परंतू लवहि न आशंका
समर पुकारित राहिल नित हा रणशाली डंका!