महाराष्ट्राची राजभाषा कोणती ? हिन्दी की मराठी ?

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स दि. २१ फ़ेब्रुवारी २००७ मधील बातमी "बॉलिवूडच्या तालावर पोलिसांच्या स्पर्धा" { पृ. १२}

वरील बातमीवरून असे दिसते की ठाणे येथे दिनांक २१ फ़ेब्रुवारी २००७ ते २३ फ़ेब्रुवारी २००७ या कालावधीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे विषयगीत {theme song} म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. बिपीन बिहारी यांच्याकडून एक हिंदी गाणे लिहून घेण्यात आले. त्याला एक हिंदी भाषक संगीतकाराने संगीत दिले व एका हिंदी भाषक गायकाने ते गायले. हा सर्वच प्रकार महाराष्ट्राच्या शासनाला विशेषतः गृहखात्याच्या अधिकाराखालील महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाला लज्जास्पद आहे. हिंदी ही केंद्र शासनाची राजभाषा व संपर्क भाषा आहे. ती महाराष्ट्र शासनाची राजभाषा कधी पासून झाली? पोलीसदल म्हणजे सैन्यदल नव्हे. ते संबंधित राज्याच्या गृहखात्याच्या अधिकाराखाली असते. महाराष्ट्रशासनाची राजभाषा मराठी आहे. महाराष्ट्रराज्य पोलीस क्रीडा स्पर्धा या आंतर राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा नव्हत्या. त्यांचा आवाका महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. त्यामुळे या स्पर्धेचे विषयगीत [theme song] मराठीच असायला हवे होते. हा केवळ राजशिष्टाचार भंग नसून मराठी जनतेचा व भाषेचा अपमान आहे.

महाराष्ट्र शासनातील शिखरस्थ परप्रांतीय सनदी अधिकारी हेतूतः महाराष्ट्रात हिंदीचे स्तोम वाढवून {केवळ मुंबईच नव्हे तर } संपूर्ण महाराष्ट्र बहुरंगी आणि बहुढंगी [cosmopolitan] असल्याचा चुकीचा समज पसरवीत आहेत. महाराष्ट्र राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या दूरदर्शन वहिन्यांना महिती व मुलाखतीही ते हिंदीतून देतात. [मुख्यमंत्र्यांपासून काही मंत्रीही असेच करतात.] हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा महाराष्ट्र राज्य शासनाचा गैरसमज तर नाही ना?

या सर्वच प्रकाराची चौकशी होऊन संबंधिताना शासन झाले पाहिजे व भविष्यात परत असे होणार नाही याची काळजी घेतली पहिजे.