गोडी अपूर्णतेची.....!

खरंच काही गोष्टी अपुर्‍याच हव्या असतात.  त्यातली ती अपूर्णतेची हुरहुर मनाला जे समाधान देते ना…… त्याची सर पूर्णत्वाला नक्कीच नाही.

आपण एखादं स्वप्नं बघतो…..आणि ते पूर्ण होण्यासाठी धावपळ करतो.  स्वप्नं पूर्ण होतं.  ते समाधान असतंच पण…….! हा ‘पण’ च तर महत्वाचा आहे ना  .    ते समाधान किती वेळ टिकतं…..? एका स्वप्नाची पूर्ती झाली की  आपण पुन्हा दुसरं स्वप्नं बघायला लागतो……. का….?  तर पूर्ण झालेल्या स्वप्नात आपण जास्त वेळ रमूच शकत नाही.  आपल्याला अपुर्‍या असलेल्या स्वप्नातच रमायला आवडतं.  ते पूर्ण कसं होईल, त्याच्यासाठी काय काय करायचं……. ह्या विचारात आपण जास्त रंगतो. 

स्वप्न जर पूर्ण झालं तर ते मुळी स्वप्न रहातच नाही….. ते आता सत्य असतं  आणि प्रत्येक माणसाला  सत्यापेक्षा   स्वप्नातच रमायला  जास्त   आवडतं….. हो   की  नाही ?  'कौन बनेगा करोडपती' सारखे कार्यक्रम यशस्वी का होतात…..?  अहो…. प्रत्येकाला व्हायचं असतं  करोडपती.  माणसाच्या ह्याच स्वप्नाळू स्वभावाला हे लोक  encash करुन घेतात…….अजून काय.   

आपण जर स्वप्नं बघणंच सोडलं तर आयुष्यात दुसरं आहे काय?  स्वप्नं, आशा….. ह्या एकाच वेळी आपल्याला जगण्याची दिशा दाखवत असतात.  स्वप्नपूर्तीच्या अगदी जवळ आल्यानंतरची excitement  मात्र सगळ्यात जास्त enjoyable  असते.  खरं तर ह्याच पायरीवर जास्तीत जास्त वेळ मनाला रेंगाळायला आवडतं.  कारण दुसर्‍याच क्षणी पूर्ती होणार असते.  दिलकी धडकने तेज होने लगती है…! मनातली हुरहुर अगदी शिगेला पोचली असते.  आणि………. तो स्वप्नपूर्तीचा क्षण येतो.  मनाला नॉर्मलवर यायला थोडा वेळ लागतो.    आपलं स्वप्नं सत्यात उतरलंय हे स्विकारायला इतका वेळ लागणं साहजिकच असतं.    पण मग मात्र त्यातली excitement   निघून जाते. 

अहो, सत्यात किती वेळ रमणार कोणी…..रमण्यासाठी स्वप्नंच लागतं :)  अशी अपुरी स्वप्नंच जगण्याचा आधार बनतात.  म्हणूनच म्हणतात ना……… स्वप्नातल्या कळ्यांनो….. उमलू नकाच केव्हा….!