नर्मदाई

सकाळी सात वाजता जीपने गरुडेश्वराचा पूल ओलांडला आणि ती उजवीकडे वळली. पुढं गरुडेश्वराचं मंदीर होतं आणि मंदिराखालीच घाट. आम्ही खरं तर रेस्ट हाऊसवर जाणार होतो; पण पुलाखालून वाहणारी नदी पाहताच जोडीदार मूडमध्ये आला. त्यानं जीपवाल्याला गाडी मंदिरापाशी लावण्यास सांगितली. मी त्याच्याकडं पाहू लागलो.

`चल, जरा पोहून घेऊ; रेस्ट हाऊसच्या साचलेल्या पाण्यापेक्षा इथंच छानशी आंघोळ होऊन जाईल.'

प्रवास सुरू करून आठ तास झाले होते. अंगं आंबली होती; त्यामुळं आंघोळ आवश्यकच होती. रेस्ट हाऊसवर कसं तेवढीच पटकन झाली असती. इथं ही सगळी पोहत बसणार. मला पोहता येत नाही. त्यामुळं असले छंद करणं शक्य नव्हतं. पुढचं गाव गाठायचं असल्यानं थोडी घाईही होती. माझ्या चेहऱ्यावर नाराजीची रेष उमटली असणार. तो म्हणालाच, `तू पोहू नकोस. काठावर बस आणि बूडबूड कर. आम्ही जरा पोहतो.'

माझी तयारी नव्हतीच; पण त्याच्या सुरात इतरांनीही सूर मिसळताच मी अल्पमतात गेलो आणि मान तुकवावीच लागली.

तासाभरानं आम्ही तिथून निघालो आणि मैलभर अंतर कापून एका टपरीवर गाडी थांबवली. कांदापोहे आणि चहा झाला आणि पुन्हा गाडीचे गियर टाकले. अर्ध्या तासानं धरणाची भिंत दिसू लागली. तिच्या अलीकडूनच आम्हाला पुन्हा नदी ओलांडायची होती. पण आता माझ्या मनात त्यांच्या पोहण्याचे उट्टे काढण्याचा विचार आला होता. मला माहित होतं की, त्या तिघांनाही गावात जाण्याची घाई असणार. मी म्हणालो,

`गाडी सरळ पुढं साईटवर घेऊया आणि थोडं काम पाहून मग मागं येऊन गावात जाऊ.'

बहुमत त्यांचं असलं तरी त्यांना माझं ऐकावंच लागणार होतं. कारण गावातला त्यांचा एकप्रकारचा मध्यस्थ मीच होतो. मला `नाराज' करून चालणार नव्हतं. त्यामुळं स्वतः थोडं नाराज होत त्यांनी होकार भरला.

धरणाच्या अलीकडं काही अंतरावर आम्ही थांबलो. काम वेगात आलं होतं. सहा महिन्यांपूर्वी मी आलो होतो तेव्हापेक्षा आता भिंत चारेक मीटरनं उंचावली होती. भिंत जिथं सुरू होते त्याच्या अलीकडं एक उंचवटा होता. तिथं थांबलं की मागं नदी दिसायची. तिच्याकडं पहात मी विचारात पडलो. आठवणी होत्या तिच्या वेगवेगळ्या रूपाच्या. इथं आलं की असं व्हायचं माझं. हा नेहमीचाच अनुभव होता. जोडीदारानंच मला त्या `ध्याना'तून बाहेर काढलं.

`काय विचार करतोयस?'

मी फक्त मान डोलावली. पण त्यानं हट्ट सोडला नाही.

`सांग मला काय विचार करतोयस त्याचा.'

`अरे काही नाही; या नदीची बदलती रूपं आठवत होतो.'

मी थोडक्यातच उत्तर दिलं आणि त्यानंही पुढं ताणलं नाही. आम्ही मागं फिरलो. गाडीनं धरणाला डावीकडं ठेवून त्याच्या भिंतीवरून वाहात येणारा प्रवाह ओलांडला आणि ती पुढं जंगलात शिरली. मग डावीकडं वळली. रस्ता कच्चाच होता. अलीकडंच तयार केला होता. गावं उठवायची असल्यानं. फोर-व्हील क्षमता असलेल्या गाड्याच जाऊ शकत अशी अशक्य वळणं आणि चढ-उतार त्यावर होते. असं पंधरा किलोमीटर अंतर आम्हाला कापायचं होतं. रस्त्याच्या एका बाजूला दरी, कधी ती डाव्या हाताला यायची तर कधी उजव्या. दुसऱ्या बाजूला वर सरकत गेलेलं जंगल. दिवस उन्हाळ्याचे असल्यानं झाडोरा विशेष दिसत नव्हताच. त्यामुळं जीपही तापू लागली होती. अधुनमधून नदीचं दर्शन व्हायचं. एकाद्या डोंगरावर पूर्ण उंचीवर गेलं की तिचं पात्र अगदी छोटं दिसायचं. खाली उतरू लागलं की ते विस्तारत जायचं. चालकाची सुकाणूशी कसरत सुरू होती. मार्ग काढणं म्हणजे काय याचा तो शब्दशः अनुभव घेत होता.

सव्वा तासानं आम्ही देवनदीत प्रवेश केला. आता तिथं पाणी नव्हतं, त्यामुळं पात्रातून जीप जात होती. एरवी जीप अलीकडंच थांबवायची आणि नदी ओलांडून गावात शिरावं लागायचं.

गाव उदास होतं. सगळीकडं हालचाल होती ती फक्त घरं उठत असल्याची.

वेशीवर असलेल्या शूलपाणेश्वर मंदिरापाशी जीप थांबली. आम्ही उतरलो. मंदिराच्या पाठीमागं दोनेकशे फुटांवर `ती' उभी होती: नर्मदाई! साधारण तीनशे फुटांचा तिचा विस्तार होता. तिची उभारणी झाल्याचा अनुभव काही मी घेतला नव्हता. चारही बाजूंनी भिंत शाकारलेली होती. बहुदा त्या भिंतीत तिथं मिळणाऱ्या प्रत्येक झाडाची एकेक फांदी असावी. छतातही तिथं मिळणाऱ्या प्रत्येक पानाचा आणि गवताचा सहभाग असणारं. गावकऱ्यांनी श्रमदान करून ते घर उभारलं होतं हे मात्र मला माहित होतं. तिच्या डोक्यावर एक झेंडा डोकं वर काढत असे. तिला ओळखण्याची खूण तो झेंडाच होता. तिथं आमच्यातील प्रत्येकानं एकदा तरी वास्तव्य केलं होतंच. तिच्या जिवंतपणाचं लक्षण म्हणजे तिचं अस्तित्व होतं. `ती' आहे याचा अर्थ अजून सारं काही संपलेलं नाही, असं सारेच मानायचे. गावकरीही आणि त्यांना उठवू पाहणारं सरकारही.  

ती उभी होती ते पाठिशी राईनीचं एक भरगच्च झाड घेऊन. हे झाड पाहताक्षणी लक्ष वेधून घ्यायचं. त्याचा घेर मोठा होता हे तर त्याचं कारण होतंच शिवाय त्या घेराचा आकारही. अगदी आखल्यासारखं ते झाड वर्तुळाकार फेर धरून होतं. फांद्या जमिनीपासून पाच फुटांपर्यंत होत्या. गेली चार वर्षं मी ते झाड तसंच पाहात होतो. उन्हाळ्यात त्याच्या सावलीत पहुडून वातानुकूलन यंत्रालाही लाजवेल असा गारवा मी अनुभवला होता. त्यामुळं ते झाड माझ्याच नव्हे तर तिथं येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेलं आहे हे मला ठाऊक होतं.

त्या झाडाशी नातं जुळायला कारणीभूत मात्र `ती' होती. तिथं गावकऱ्यांचं सारं काही होतं. कार्यकर्त्यांचंही. तिथं बसून कितिक ठराव झाले असतील याचि मोजदाद नव्हती. तिच्या समोरच रंगलेल्या नाचांनी अनेकांची मनं प्रसन्न केली होती. तिथं गाजलेल्या ढोलांचा आवाज अगदी भरून राहिलेला असायचा. आपल्या ऐक्याची ताकद दाखवण्यासाठी झालेल्या होळीचीही ती साक्षी होती. सारं काही ती साक्षीभावानंच होऊ देत असावी. पण एक होतं. ती होती, ही बाबच ती एकजूट टिकवून धरण्यास, त्यांचा निर्धार हर आव्हानासमोर तितकाच कडवा करण्यास जबाबदार होती. ती जबाबदारी तिच्यावर कोणीही लादलेली नव्हती. तीदेखील ती जबाबदारी आपलं कर्तव्यच असल्यासारखं मानून पार पाडत होती.

डावीकडं खाली शंभर-एक फुटांवर नदी होती. किनाऱ्यावर काही मुलं खेळत होती. मंदिराच्या पाठीमागं पोलिसांचे तंबू होते.

गावातील घरं काढून घेण्याची प्रक्रिया सुरूच होती. आम्ही होतो त्या भागात आता केवळ तीन घरं होती आणि `ती' होती. गावात एक चक्कर मारून आम्ही परतलो. थोडं लोकांशी बोलणंही झालं.

आम्ही आधी मंदिरात शिरलो. मला माहिती होतं की किमान तीन वरिष्ठ अधिकारी गावात आहेत. ते मंदिरात असावेत हाच माझा अंदाज होता. तो खराही ठरला. आम्हाला पाहताच त्यांच्यातले जिल्हा पोलीस प्रमुख पुढं आले. सोबत होते एक विशेष महानिरिक्षक आणि एक सचिव. आमच्या गप्पा सुरू झाल्या. चर्चेचा विषय वळला तो पाठीमागच्या टेकाडावर दिसणाऱ्या घरांकडं. 

`आम्हाला घाई नाही ती घरं काढण्याची. पहिलं प्राधान्य असेल ते इथली घरं हलवण्याला...' ते सांगू लागले. आम्ही ऐकू लागलो.

`इथं सगळंच शांततेत चाललं आहे असं दिसतंय. तरीही तुम्ही इथं कसे?' माझ्या जोडीदारानं विचारलं.

`शांतता आहे म्हणूनच तर आलो. लोकांना काय म्हणायचं आहे ते याचवेळी नीट समजून घेता येतं.' त्यांच्यातल्या एकानं उत्तर दिलं.

`काय-काय समजून घेता आलं?' मी थोडा खवटपणा केला. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

`खरं तर तुम्ही ज्याला शांतता म्हणताय ती का आहे हे समजून घ्या, म्हणजे आम्ही काय समजून घेतलंय ते कळेल.' ते म्हणाले. माझा डाव साध्य झाल्यासारखाच होता. त्यांना मला डिवचायचं होतं आणि ते डिवचले गेले होते. त्यामुळं मी गप्प बसलो.

अर्धा-एक तास आम्ही बोलत होतो. आता त्यांच्यात थोडी अस्वस्थता आली होती. काही क्षण गेले आणि सर्वात आधी आम्हाला सामोरे आले होते, ते अधिकारी पुढं आले.

`पुढं कुठं जाणार आहात?'

इतर कोणी काही बोलायच्या आत मी उत्तरलो, `छे, छे! कुठंच नाही. इथंच. मग परत कॉलनीत.'

त्यांनी मग त्यांच्या वरिष्ठांकडं मोर्चा वळवला. `साब, खाना...' त्यांनी घास घेण्याची खूण करत त्यांना विचारलं. माझ्या लक्षात आलं की आमचं बोलणं आता संपवावं याचीच ती खूण आहे. त्यांच्या साहेबांनी मान डोलावलीही, तोवर आम्ही उठलो.

आमचा निरोप घेण्यासाठी ते बाहेर आले. आमच्या पोटात कावळे ओरडू लागले होते, त्यामुळे कॉलनीकडं जायची घाई आम्हालाही होती.

`परत कधी निघणार आहात?' त्यांनी विचारलं.

`नक्की नाही. तुमच्यावरच अवलंबून आहे.' मी उगाच टोला टाकला.

`आम्ही कोण तुम्हाला रोखणारे?' हसत-हसत ते म्हणाले. मीही तो विषय तिथंच संपवला.

आम्ही निघालो. दुपारी साडेतीनच्या सुमारास कॉलनीत पोचलो; आधी पोटपूजा केली आणि मग ताणून दिली.

दोनेक तासांच्या विश्रांतीनंतर उठून आम्ही फोन करण्यासाठी बाहेर पडलो. मुख्य बाजारात आलो. फोन हुडकत असतानाच तो दिसला. आधी कधीही आमची आणि त्याची भेट झाली नव्हती. बोलणं झालं होतं ते फोनवरच. त्याच्या वेषावरून मला शंका होती की हा तोच असावा. फोन असलेल्या दुकानातच तो बसला होता.

पुढं होत मी त्याचं नाव घेतलं. त्यानं माझ्याकडं पाहिलं. क्षणभरात त्यालाही ओळख पटली असावी. फोनवर आम्ही इतका संवाद साधलेला होता की, खूप जुने मित्र असल्यासारखे आम्ही भेटलो. मी माझ्या जोडीदारांची आणि त्याची ओळख करून दिली.

`केंव्हा आलात? बरं झालं तुम्ही भेटलात ते. मोठी घडामोड आहे.' तो म्हणाला.

आमचे चेहरे प्रश्नचिन्हांकीत झाले. काय घडलं असावं, हाच प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. तरीही मी म्हणालो, `सकाळीच आलो. गावात गेलो होतो. काय हालचाल?'

`अरे, आपली नर्मदाई आज पाडली सरकारनं.'

मी उडालोच. तीच स्थिती माझ्याबरोबरच्या प्रत्येकाची होती. दुपारीच आम्ही तिला डौलानं उभी असलेली पाहिली होती. झेंडाही फडकत होता. तिचं असणं कसं महत्त्वाचं होतं याची आवर्तनं प्रत्येकाच्या मनात होऊन गेली होती. आणि हा सांगतोय की ती आता नाहिये?

`काय सांगतोयेस? केंव्हा?'

`आत्ताच, तासापूर्वी पाडून पूर्ण झाली.' मग त्यानं त्या तीनही अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि प्रत्यक्ष त्यांच्या नजरेखाली ही कारवाई झाली ते सांगितलं.

`केंव्हा सुरू केलं पाडायला?'

त्यानं वेळ सांगितली; आम्ही गावातून निघालो तीच वेळ होती ती.

गेल्या चार-पाच वर्षातल्या तिनं पाहिलेल्या घडामोडी नदीच्या एकेका वळणासारख्याच होत्या. त्या प्रत्येक घडामोडीत तिचं एक स्थान होतं. ती त्या घडामोडींची मूक साक्षीदार होतीच, पण नुसती साक्षीदारही नव्हती. त्या घडामोडींची प्रेरणाही होती. बोलताबोलता त्याचा आवाज कातर झाला. नर्मादाईविषयी दूरवर राहूनही आम्हाला इतकं काही वाटायचं तर त्याची स्थिती आमच्यापेक्षा अधिकच कातर असावी यात नवल नव्हतं.

तिच्याबरोबरच राईनीचं ते झाडही पाडून टाकण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं गेलो तेंव्हा ते पठार भुंडं दिसत होतं. रया गेलेलं. तिथून पाहताना मंदीरही उदास वाटत होतं. त्याची ती जोडिदारच होती अखेर.

ती पाडली गेली असेल तेंव्हा आम्ही कदाचीत जेवणच करत असू. तिथून आम्हाला खुबीनं बाहेर काढताना त्यांनीही `खाना' हाच बहाणा केला होता. आमची दांडी गुल केली होती.

ती पडल्यानंतर गाव उठायला वेळ लागला नाही.

अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींची साक्षीदार असलेली नर्मदाई पाडताना कोणालाच साक्षीदार होऊ न देण्यात सरकार यशस्वी झालं होतं. दुसऱ्या दिवशी एका सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देणारं एक वृत्त आलं होतं: अनधिकृतपणे उभारण्यात आलेली एक झोपडी पाडण्यात आल्याचं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं होतं. तिच्या `हौतात्म्या'ची ही अशी बेदखलच झाली होती. त्या गावाप्रमाणंच.

आजही तिचा विचार मनात आला की ती पाडली गेली त्याचा `साक्षीदार' होता आलं नाही, यापेक्षा आपली दांडी सहज उडाली याचीच आठवण येते; हसूही येतं, हळवंही व्हायला होतं!