कोबीची वडी/पानगा

  • अर्धा किलो हिरवा गार पानकोबी
  • २ मध्यम आकाराचे बटाटे, २/३ मध्यम आकाराचे कांदे.
  • पाव किलो मटारच्या शेंगांचे दाणे.
  • हिरव्या मिरच्या ६/७,कोथंबीर बारीक चिरून अर्धी वाटी,चवीपुरता आले
  • गोडेतेल एक वाटी
  • तांदळाचे व चण्याच्या डाळीचे पीठ - प्रत्येकी अर्धी वाटी
  • हळद, तिखट, हिंग,जीरे, मीठ, साखर चविनुसार
१ तास
४ जणांसाठी भरपूर

पूर्वतयारी:-

  • पानकोबी चिरून घ्यावा (भाजीसाठी चिरतो तसा).
  • बटाट्यांची साले काढून त्यांच्या जाडसर त्रिकोणी चकत्या करून पाण्यात भिजत ठेवाव्यात.
  • कांदे जाडसर लांब चिरून घ्यावेत.
  • हिरव्या मिरच्या व आले बारीक चिरून घ्यावे.
  • वाटाणे व चिरलेली कोथिंबीर धुऊन निथळत ठेवावी.

कृती:-

कोबी, कांदा, हिरव्या मिरच्या,आले व कोथिंबीर एका परातीत घेऊन त्यावर थोडे तेल (पाव भाग), तिखट, हळद, मीठ, हिंग, जिरे व साखर घालून भाज्यांचे अंगचेच पाणी सुटेपर्यंत चांगले एकजीव करून घ्यावे.
नंतर त्यात वाटाणे व बटाटे टाकून मिसळून घ्यावे.
दोन्ही पिठे (तांदूळ व चण्याच्या डाळीचे) टाकत हा गोळा कालवत राहावे.
उरलेले तीन भाग तेल अधून मधून चमचाभर टाकत राहिल्यास हे सर्व मिश्रण एकजीव होण्यास मदत होते.
ह्या पिठाचा सैलसर गोळा तयार होतो.

केळीच्या पानावर तेलाचा हात फिरवून त्यावर हा गोळा व्यवस्थित गोलाकार (केकच्या आकाराचा) थापून घ्यावा.
अलगदपणे पानासकट हा केक/वडी उचलून फ्रायपॅन (तव्यावर) ठेवून वरून तसेच आजूबाजूने तेलाचा हात फिरवून घ्यावा.
दुसऱ्या केळीच्या पानावर तेलाचा हात फिरवून ते पान वडीवर उपडे गुंडाळून घ्यावे.
मध्यम आचेवर हे मिश्रण शिजवत ठेवावे- वरून झाकण ठेवण्यास विसरू नये.
१२/१५ मिनिटांनी ही वडी चुलीवरून उतरवून उलटून घ्यावी (वरची कच्ची बाजू खाली...)
परत साधारण १०/१२ मिनिटे मंद आचेवर शिजवत ठेवावी.

वडी चुलीवरून उतरवल्यावर (केळीची पाने काढून टाकून) त्याच्या केक कापतो तसे त्रिकोणी काप करून दह्याबरोबर किंवा कच्चे तेल टाकून वाढावी.  

काल विष्णू मनोहरच्या पाककृतीत नंदा परांजपेंनी ही कृती वेगळ्या रितीने सांगितली व त्यात त्यांनी केळफुलाचा वापर केला होता. ही कृती बघून आईने खास मनोगतावरच्या खवय्यांसाठी, ती स्वतः करते ती कृती, लिहून काढली व माझ्या मागे लागून ती मनोगतावर प्रकाशीत करण्यास लावली.
हा पानगा पूर्वी मोठ्या पातेल्यात मळलेल्या पिठाचा गोळा १०/१२ केळीच्या पानांत गुंडाळून करीत असत. लाकडी कोळशांच्या शेगडीवर हे पातेले ठेवून वरून तव्यावर वाळू व कोळशांच्या विस्तव ठेवून व्यवस्थित शेकून घेत असत.
हल्ली मात्र हे सर्व प्रकार करणे शक्य नसल्याने गॅसच्या चुलीवर उलथवून घेण्याखेरीज इलाज नाही.

महत्त्वाचे मुद्दे:
ह्यात कुठेही पाण्याचा अंश लागू देऊ नये.
तेलाचा व पिठाचा वापर आपल्या आवडीनुसार कमी जास्त केला तरी चालेल.
मटार च्या शेंगा (हिरवे वटाणे)न मिळाल्यास किंवा आवडत असल्यास पोपटवालाचे दाणे घेतलेत तरी चालेल.
कडधान्यातले वटाणे वापरावयाचे झाल्यास भिजवून व वाफवून मग वापरावेत.

आई.