आयुष्याची कोरी पाटी भरवीत जावे
रोज नव्याने गिरवीत जावे, वाचत जावे
कधी जरा जपुनी हसावे
कधी जरा खरे रुसावे
डोळ्यांच्या फांदीवरती अश्रूंनी झुलावे
या झुलण्याला, हसण्याला, रुसण्याला फुलवीत जावे
रोज नव्याने पहात जावी, नवी माणसे
कल्पनातून त्यांची घडावी, नवीन चित्रे
नव्या माणसाने नटावे
घेऊन काही रंग नवे
नभी उडावे वैचित्र्याचे लाख थवे
नव्या माणसाच्या रंगछटेला जरासे उडवीत जावे
ह्याचे त्याला त्याचे ह्याला सांगत जावे
एकाचे दोन कधी व्हावे
तर दोनाचे चार करावे
अफवांच्या लाटेला नव्याने उधाण यावे
या लाटेवरती चार गोष्टींने स्वार होऊन उधळीत जावे
आयुष्याची कोरी पाटी भरवीत जावे......