एका हलवायाचे दुकान

व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवन यात तफावत असणे यात काही नवीन नाही. जो पेशा तसे वर्तन अशी अपेक्षा करणे म्हणजे एखाद्या सुरेल गवयाने पोटात जबरदस्त कळ आली तरी सुरेलपणानेच ओरडावे अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. पण गोड साखरेची चित्रे विकणार्‍या या हलवायाच्या खाजगी आयुष्यातली भाषा जरा पहा. त्यातून एकीकडे त्याचे गिर्‍हाईकाशी आर्जवाचे बोलणे सुरु आहे, आणि दुसरीकडे त्याची पोरे त्याला छळताहेत. तो परिस्थितीने गांजला आहे हे खरेच, पण त्याबरोबर बोलताबोलता आपल्या वागण्यातली विसंगती काही त्याच्या ध्यानात आलेली नाही. ' देवाची शपथ' वगैरे तो घेतो आहे, पण त्याबरोबर आपल्या पोरांवर डाफरतोही आहे! त्यातून गिर्‍हाईकाला मालाचा नमुना म्हणून साखरेच्या कावळ्याच्या पंखाचा तुकडा ही मजेदार वक्रोक्ति दिवाकरांनी येथे साधली आहे. साखरेची चित्रे इतकी जिवंत की आता ती नाचायला उडायला लागतील ही कवीकल्पना आणि पोरांना चुलीत घालून भाजून काढण्याची धमकी हा हलवाई एकाच श्वासात देतो आहे! लोकांच्या बोलण्यातली आणि वागण्यातली विसंगती हा दिवाकरांचा आवडता विषय. त्यातूनच साकारले ते हे 'हलवायाचे दुकान'

"... काय कारट्यांची कटकट आहे पहा! मरत नाहीत एकदाची! - हं, काय म्हणालेत रावसाहेब! आपल्याला पुष्कळशी साखरेची चित्रे पाहिजे आहेत? घ्या; आपल्याला लागतील तितकी घ्या. छे! छे! भावामध्ये आपल्याशी बिलकुल लबाडी होणार नाही! अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो की, माझ्याजवळ फसवाफसवीचा असा व्यवहारच नाही! - अगं ए! कोठे मरायला गेली आहे कोणास ठाऊक! गप्प बसा रे! काय, काय म्हणालात आता आपण? ही साखरेची चित्रे फार चांगली साधली आहेत? अहो, आपणच काय, पण या दुकानावरून जाणारा प्रत्येकजण असेच म्हणतो की, ही साखरेची केलेली पाखरे - झालेच तर ही माणसेसुद्धा! - अगदी हुबेहूब साधली आहेत म्हणून!- काय? मी दिलेले हे पाखरांवरचे रंग कदाचित् विषारी असतील? छे हो! भलतेच एखादे! हा घ्या. कावळ्याच्या पंखाचा एक तुकडा आहे, खाऊन पहा! अहो, निव्वळ साखर आहे साखर! फार कशाला? ही सगळी चित्रे जरी आपल्याच सारखी जिवंत होऊन नाचायला उडायला लागली - तरी देखील यांच्यात असलेला साखरेचा कण - एक कणसुद्धा कमी होणार नाही! रावसाहेब, माझे कामच असे गोड आहे! - अरेच्चा! काय त्रास आहे पहा! अरे पोरट्यानो, तुम्ही गप्प बसता की नाही? का या चुलीत घालून तुम्हा सगळ्यांना भाजून काढू? तुमची आई कोठे जळाली वाटते? - का हो रावसाहेब, असे गप्प का बसलात? बोला की मग किती चित्रे घ्यायचे ठरले ते...."